घरक्रीडाIPL 2024: RCBच्या विजयाने मुंबई इंडियन्सला धक्का; बंगळुरूची पॉइंट टेबलमध्ये मोठी...

IPL 2024: RCBच्या विजयाने मुंबई इंडियन्सला धक्का; बंगळुरूची पॉइंट टेबलमध्ये मोठी झेप

Subscribe

गुजरातने आरसीबीला विजयासाठी 148 धावांचे लक्ष्य दिले होते. हे लक्ष आरसीबीने केवळ 13.4 षटकात पूर्ण केले. आरसीबीचा चालू हंगामातील 11 सामन्यांमधील हा चौथा विजय ठरला.

नवी दिल्ली: इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या 17 व्या हंगामातील सामना क्रमांक-52 मध्ये, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) ने गुजरात टायटन्स (GT) चा चार गडी राखून पराभव केला. शनिवारी (4 मे) चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात आरसीबीने दणदणीत विजय मिळवला. परंतु आरसीबीच्या विजयामुळे मुंबई इंडियन्सला मोठा धक्का दिला आहे. मुंबई इंडियन्सचा संघ आता पॉइंट टेबलमध्ये शेवटच्या स्थानी पोहोचला आहे. (IPL 2024 RCB win shocks Mumbai Indians Big leap for Royal Challengers Bangalore in the points table)

गुजरातने आरसीबीला विजयासाठी 148 धावांचे लक्ष्य दिले होते. हे लक्ष आरसीबीने केवळ 13.4 षटकात पूर्ण केले. आरसीबीचा चालू हंगामातील 11 सामन्यांमधील हा चौथा विजय ठरला. दुसरीकडे, गुजरात टायटन्सचा हा एकूण सामन्यांमधील सातवा पराभव ठरला. या विजयामुळे आरसीबी संघ गुणतालिकेत सातव्या स्थानावर आला आहे. प्ले ऑफमध्ये पोहोचण्याच्या या संघाच्या आशा अजूनही कायम आहेत.

- Advertisement -

कोहली आणि फाफ डू प्लेसिस विजयाचे हिरो

आरसीबीच्या विजयाचे हिरो होते विराट कोहली आणि कर्णधार फाफ डू प्लेसिस. दोघांनी 5.5 षटकांत 92 धावांची सलामी दिली. कोहलीने 27 चेंडूत 42 धावा केल्या, ज्यात 4 षटकार आणि 2 चौकारांचा समावेश होता. तर डु प्लेसिसने अवघ्या 23 चेंडूत 64 धावांची खेळी केली. डु प्लेसिसने आपल्या खेळीत 10 चौकार आणि तीन षटकार मारले. मात्र, सलामीची भागीदारी तुटल्यानंतर विकेट्सची झुंबड उडाली आणि आरसीबीने 25 धावांत 6 विकेट गमावल्या. त्यानंतर दिनेश कार्तिक आणि स्वप्नील सिंगने 35 नाबाद धावा जोडल्या आणि आरसीबीला लक्ष्य सहज गाठता आले. 15 धावा केल्यानंतर स्वप्नील नाबाद राहिला आणि कार्तिक 21 धावा करूनही नाबाद राहिला. गुजरातकडून आयरिश वेगवान गोलंदाज जोशुआ लिटलने चार बळी घेतले.

नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजीला आलेल्या गुजरात टायटन्सचा संपूर्ण संघ 19.3 षटकांत 147 धावांत गारद झाला. गुजरात टायटन्ससाठी शाहरुख खानने सर्वाधिक 37 धावा केल्या, ज्यात पाच चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. तर राहुल तेवतियाने 35 आणि डेव्हिड मिलरने 30 धावा केल्या. आरसीबीकडून मोहम्मद सिराज, विजयकुमार वैशाक आणि यश दयाल यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.

- Advertisement -

या सामन्यासाठी आरसीबीने आपल्या संयोजनात कोणताही बदल केलेला नाही. दुसरीकडे, गुजरात टायटन्समध्ये दोन मोठे बदल झाले. मानव सुथारला पदार्पणाची संधी मिळाली. किरकोळ दुखापत झालेल्या साई किशोरच्या जागी सुथारचा प्लेइंग-11 मध्ये समावेश करण्यात आला होता. अजमतुल्ला ओमरझाईच्या जागी आयरिश वेगवान गोलंदाज जोशुआ लिटल या सामन्यात खेळायला आला.

गुजरातचा धुव्वा 

इंडियन प्रीमियर लीगच्या इतिहासात गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात आतापर्यंत 5 सामने खेळले गेले आहेत. या कालावधीत गुजरात टायटन्सने दोन सामने तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने तीन सामने जिंकले. चालू मोसमात दोन्ही संघ दुसऱ्यांदा आमनेसामने आले आहेत. यापूर्वी 28 एप्रिल रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर दोन्ही संघांमध्ये सामना झाला होता, ज्यामध्ये आरसीबीने 9 विकेट्सने विजय मिळवला होता.

गुजरात टायटन्सचे प्लेइंग-11: ऋद्धिमान साहा (यष्टीरक्षक), शुभमन गिल (कर्णधार), साई सुदर्शन, डेव्हिड मिलर, शाहरुख खान, राहुल तेवतिया, रशीद खान, मानव सुथार, नूर अहमद, मोहित शर्मा, जोशुआ लिटल.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे प्लेइंग-11: विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विल जॅक, ग्लेन मॅक्सवेल, कॅमेरॉन ग्रीन, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), स्वप्नील सिंग, कर्ण शर्मा, मोहम्मद सिराज, विजयकुमार वैशाख, यश दयाल.

(हेही वाचा: IPL 2024 : खराब कामगिरीवरुन ग्रॅम स्मिथ आणि शेन वॉटसनची मुंबईच्या थिंक टँकवर टीका)


Edited By- Prajakta Parab

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -