घरक्रीडासिंधू, प्रणितची उपांत्यपूर्व फेरीत धडक

सिंधू, प्रणितची उपांत्यपूर्व फेरीत धडक

Subscribe

जपान ओपन बॅडमिंटन स्पर्धा

भारताचे आघाडीचे बॅडमिंटनपटू पी.व्ही.सिंधू आणि साई प्रणित यांनी जपान ओपन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. एच.एस.प्रणॉयला मात्र पराभवाचा सामना करावा लागला आहे. पहिल्या फेरीत किदाम्बी श्रीकांतचा पराभव करणार्‍या प्रणॉयला डेन्मार्कच्या रॅस्मस गेमकेने ९-२१, १५-२१ असे सरळ गेममध्ये पराभूत केले.

जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानी असणार्‍या सिंधूने जपानच्या अया ओहोरीवर ११-२१, २१-१०, २१-१३ अशी मात केली. तासाभराहूनही अधिक वेळ चाललेल्या या सामन्याच्या पहिल्या गेममध्ये सिंधूला चांगला खेळ करता आला नाही. ओहोरीने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करत ५-१ अशी आघाडी मिळवली. तिने पुढेही दमदार खेळ सुरू ठेवत मध्यंतराला आपली आघाडी ११-५ अशी वाढवली. यानंतर सिंधूने चुका करण्यास सुरुवात केली. तिचे बरेचसे फटके नेटला लागत होते. त्यामुळे ओहोरीने पहिला गेम २१-११ असा मोठ्या फरकाने जिंकला.

- Advertisement -

दुसर्‍या गेममध्ये मात्र सिंधूने उत्कृष्ट पुनरागमन केले. तिने या गेमच्या मध्यंतराला ११-६ अशी आघाडी घेतली. ओहोरीला मध्यंतरानंतरही आपला खेळ उंचावण्यात अपयश आले, तर सिंधूने आक्रमण सुरू ठेवत दुसरा गेम २१-१० असा जिंकला. तिसरा आणि निर्णायक गेम अटीतटीचा होईल अशी अपेक्षा होती व सुरुवातीला तसेच झाले. या गेमची दोन्ही खेळाडूंनी चांगली सुरुवात केल्याने ८-८ अशी बरोबरी होती. यानंतर सिंधूने सलग ३ गुण मिळवत मध्यंतराला ११-८ अशी आघाडी मिळवली. यानंतर सिंधूने ओहोरीला अवघे ५ गुण मिळवू दिले आणि हा गेम २१-१३ असा जिंकत आगेकूच केली.

पुरुष एकेरीच्या दुसर्‍या फेरीत साई प्रणितने जपानच्या कांटा सुनयानाला २१-१३, २१-१६ अशी धूळ चारली. त्याने पहिल्या फेरीत जागतिक क्रमवारीत ११ व्या स्थानी असणार्‍या केंटा निशिमोटोला पराभूत केले होते. त्याचा पुढील फेरीत टॉमी सुगिर्तोशी सामना होईल.

- Advertisement -

सात्विकराईराज-चिरागची आगेकूच

पुरुष दुहेरीत भारताची जोडी सात्विकराईराज रणकिरेड्डी आणि चिराग शेट्टीने चीनच्या हुआंग काय झिंग आणि लिऊ चेंग या जोडीवर १५-२१, २१-११, २१-१९ अशी मात करत उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. मिश्र दुहेरीत सात्विकराईराज आणि अश्विनी पोनप्पा यांच्यावर मात्र स्पर्धेबाहेर होण्याची नामुष्की ओढवली. त्यांचा थायलंडच्या जोडीने १६-२१, १७-२१ असा सरळ गेममध्ये पराभव केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -