घरक्रीडाचुका सुधारण्यासाठी शेवटची संधी!

चुका सुधारण्यासाठी शेवटची संधी!

Subscribe

भारताचा अखेरचा साखळी सामना आज श्रीलंकेशी

क्रिकेट विश्वचषकात शनिवारी अखेरचे दोन साखळी सामने होणार असून, भारतीय संघासमोर श्रीलंकेचे आव्हान आहे. विराट कोहलीच्या भारतीय संघाने याआधीच उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे, तर दिमुथ करुणरत्नेच्या श्रीलंकेला उपांत्य फेरी गाठण्यात अपयश आले आहे. हा श्रीलंकेचा या विश्वचषकातील अखेरचा सामना असणार आहे. त्यामुळे त्यांचा या स्पर्धेचा शेवट विजयाने करण्याचे लक्ष्य असेल. दुसरीकडे भारताला उपांत्य फेरीच्या तयारीसाठी ही अखेरची संधी असल्याने ते मागील सामन्यांत झालेल्या चुका सुधारण्याच्या उद्देशाने मैदानात उतरतील. तसेच भारताने हा सामना जिंकल्यास आणि शनिवारीच होणारा दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा सामना ऑस्ट्रेलियाने गमावल्यास कोहलीचा संघ गुणतक्त्यात अव्वल स्थानी पोहोचेल.

यंदाच्या विश्वचषकात भारताने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. केवळ यजमान इंग्लंडला त्यांचा पराभव करण्यात यश आले आहे. भारताने मागील सामन्यात बांगलादेशवर मात करत उपांत्य फेरीतील स्थान पक्के केले. या सामन्यात सलामीवीर रोहित शर्माने शतक झळकावले. हे त्याचे या स्पर्धेतील विक्रमी चौथे शतक होते. त्याला लोकेश राहुलने अर्धशतकी खेळी करत चांगली साथ दिली. मात्र, या सामन्यातही भारताच्या मधल्या फळीला चांगली कामगिरी करता आली नाही. युवा रिषभ पंतने चौथ्या क्रमांकावर फलंदाजी येत ४८ धावांची खेळी केली, ही आनंदाची बाब.

- Advertisement -

मात्र, अनुभवी महेंद्रसिंग धोनीला पुन्हा एकदा अखेरच्या षटकांमध्ये फटकेबाजी करता आली नाही. त्यामुळे श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात सलामीवीर मयांक अगरवालला एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळू शकेल आणि तसे झाल्यास राहुलला चौथ्या क्रमांकावर खेळावे लागेल. राहुलने सुरुवातीच्या दोन सामन्यांत मधल्या फळीत फलंदाजी केली होती. मात्र, शिखर धवनला दुखापत झाल्यामुळे त्याला सलामीवीराची भूमिका पार पाडली.

तसेच बांगलादेशविरुद्ध केदार जाधवच्या जागी संधी मिळालेल्या दिनेश कार्तिकला फारसे चेंडू खेळायला मिळाले नाहीत. त्यामुळे श्रीलंकेविरुद्ध कार्तिकऐवजी अष्टपैलू रविंद्र जाडेजाला संघात स्थान मिळू शकेल. भारताचे फिरकीपटू युजवेंद्र चहल आणि कुलदीप यादव यांना या स्पर्धेत सातत्यपूर्ण कामगिरी करता आलेली नाही. बांगलादेशविरुद्ध केदार संघात नसल्याने हार्दिक पांड्याला १० षटके टाकावी लागली. त्याने ३ विकेट्स तर घेतल्या, पण त्या मोबदल्यात ६० धावा खर्ची केल्या. त्यामुळे जाडेजाला संघात घेणे भारतासाठी फायदेशीर ठरू शकेल.

- Advertisement -

दुसरीकडे श्रीलंकेला या स्पर्धेत ८ सामन्यांपैकी तीनच सामने जिंकता आले आहेत. त्यांनी वेस्ट इंडिजविरुद्ध मागील सामन्यात त्रिशतकी धावसंख्या उभारली. युवा फलंदाज अविष्का फर्नांडोने शतकी खेळी केली आणि त्याला कुसाल परेराने चांगली साथ दिली. गोलंदाजीत अनुभवी लसिथ मलिंगाने ३ विकेट्स घेत श्रीलंकेच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यामुळे भारताला हा सामना जिंकण्यासाठी सर्वोत्तम खेळ करावा लागेल हे निश्चित.

प्रतिस्पर्धी संघ

भारत – विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, लोकेश राहुल, रिषभ पंत, महेंद्रसिंग धोनी (यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक, केदार जाधव, हार्दिक पांड्या, रविंद्र जाडेजा, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मयांक अगरवाल.

श्रीलंका – दिमुथ करुणारत्ने (कर्णधार), कुसाल परेरा (यष्टीरक्षक), अविष्का फर्नांडो, लाहिरू थिरिमाने, कुसाल मेंडिस, अँजेलो मॅथ्यूज, धनंजय डी सिल्वा, इसुरु उदाना, जेफ्री वॅनडर्से, कसून रजिथा, लसिथ मलिंगा, थिसारा परेरा, जीवन मेंडिस, मिलिंडा सिरीवर्धने, सुरंगा लकमल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -