घरक्रीडाआयपीएलमध्ये मुंबईचे आणखी खेळाडू असले पाहिजेत!

आयपीएलमध्ये मुंबईचे आणखी खेळाडू असले पाहिजेत!

Subscribe

इंडियन प्रीमियर लीगने (आयपीएल) टी-२० क्रिकेटला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे. आयपीएलमुळेच अनेक प्रतिभावान खेळाडू भारताला मिळाले आहेत. तसेच या लीगला प्रसिद्धी मिळाल्यानंतर आता भारताच्या अनेक राज्यांमध्ये विविध टी-२० स्पर्धांचे आयोजन केले आहे. त्यातीलच एक स्पर्धा म्हणजे टी-२० मुंबई लीग. मागील वर्षी सुरू झालेल्या या स्पर्धेच्या दुसर्‍या मोसमाला १४ मेपासून सुरुवात होणार आहे. मागील वर्षी ६ संघांमध्ये झालेल्या या स्पर्धेत यंदा २ आणखी संघांचा समावेश करण्यात आला आहे. ही स्पर्धा ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमवर होणार असून, प्रत्येक दिवशी २ साखळी सामने होणार आहेत. महान क्रिकेटपटू सुनील गावस्कर हे या स्पर्धेचे आयुक्त म्हणून काम करणार आहेत. ही स्पर्धा म्हणजे भारताच्या कोणत्याही राज्यात होणारी सर्वोत्तम स्पर्धा आहे, असे गावस्कर म्हणाले. तसेच आयपीएलमध्ये सध्याच्या घडीला इतर राज्यांच्या तूलनेत मुंबईचे कमी खेळाडू असल्याने मुंबईने हे चित्र बदलण्यासाठी काही बदल केले पाहिजेत असे त्यांना वाटते.

भारताच्या विविध राज्यांमध्ये टी-२० स्पर्धा होतात. मात्र, माझ्या मते टी-२० मुंबई लीग ही सर्वोत्तम लीगपैकी एक आहे. या स्पर्धेमुळे अनेक चांगले खेळाडू पुढे आले, जे भारतासाठीही खेळू शकतील. शिवम दुबेला आयपीएल संघाने करारबद्ध केले, सूर्यकुमार यादवला मोठी किंमत मिळाली. मला खात्री आहे या स्पर्धेतून अजून अनेक खेळाडू पुढे येतील, ज्यांना आयपीएल संघ करारबद्ध करतील. मला असे वाटते की पुढील वर्षी ही स्पर्धा आयपीएलच्या लिलावाआधी झाली तर खूप फरक पडेल. सध्या तुम्ही पाहिलेत तर आयपीएलमध्ये आंतरराष्ट्रीय खेळाडू वगळता मुंबईचे फारसे खेळाडू खेळताना दिसत नाहीत.

- Advertisement -

मात्र, मुंबई हे भारतीय क्रिकेटमधील सर्वात प्रभावी राज्य म्हणून ओळखले जाते. मुंबईमध्ये खूप स्पर्धा होतात. या स्पर्धांमध्ये युवा खेळाडूंना अनुभवी खेळाडूंसोबत खेळण्याची संधी मिळते, पण तरीही टी-२० क्रिकेटच्या बाबतीत इतर राज्यांच्या तुलनेत मुंबई मागे पडताना दिसत आहे. यावर्षी आयपीएलमध्ये पंजाबचे १५ खेळाडू होते. या संघाला सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेची बाद फेरीही गाठता आली नाही. त्यामुळे हे चित्र बदलण्यासाठी मुंबईने काही बदल करणे गरजेचे आहे, असे गावस्कर म्हणाले.

मुंबई लवकरच पुन्हा भारतीय क्रिकेटवर अधिराज्य गाजवेल
मुंबईला रणजी करंडकाच्या मागील काही मोसमांत चांगली कामगिरी करता आली नसली, तरी यात लवकरच बदल होईल आणि मुंबई पुन्हा एकदा भारतीय क्रिकेटवर अधिराज्य गाजवेल, असे मत भारताचा महान क्रिकेटपटू आणि टी-२० मुंबई लीगचा ब्रँड अँबेसेडर सचिन तेंडुलकरने व्यक्त केले. मला वाटते ही स्पर्धा इतकी चांगली होईल की इतर राज्यांतील खेळाडूंनाही यात खेळण्याची इच्छा होईल. याचप्रकारे अनेक वर्षे मुंबई रणजी संघाकडे पाहिले जायचे. जर इतर राज्यांतील खेळाडूंना संधी दिली, तर त्यांनाही मुंबईच्या संघातून खेळायला आवडले असते. मुंबईची खेळण्याची पद्धतच वेगळी होती.

- Advertisement -

मी खूप भाग्यवान होतो की माझ्या कारकिर्दीच्या सुरुवातीला मला अनेक महान खेळाडूंसोबत खेळण्याची संधी मिळाली, ज्यांनी मला वेळोवेळी मार्गदर्शन केले. या स्पर्धेत युवा खेळाडूंना भारतासाठी, रणजी करंडकात आणि अनेक वर्षे क्लब क्रिकेट खेळलेल्या खेळाडूंसोबाबत खेळण्याची संधी मिळेल. त्यांच्या अनुभवाचा युवा खेळाडूंना खूप फायदा होईल. मुंबईने रणजी करंडकाच्या मागील काही मोसमांत चांगली कामगिरी केली नसली तरी सुधारणेला वाव असतोच. त्यामुळे दूरदृष्टी ठेऊन विचार करणे गरजेचे आहे. जर आपण तसे केले, तर मला खात्री आहे की मुंबई लवकरच पुन्हा भारतीय क्रिकेटवर अधिराज्य गाजवेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -