घरक्रीडाभारतीय महिलांनी ऑस्ट्रेलियाला बरोबरीत रोखले

भारतीय महिलांनी ऑस्ट्रेलियाला बरोबरीत रोखले

Subscribe

ऑलिम्पिक हॉकी चाचणी स्पर्धा

वंदना कटारिया आणि गुरजीत कौर यांच्या गोलमुळे भारतीय महिला हॉकी संघाने ऑलिम्पिक चाचणी स्पर्धेत बलाढ्य ऑस्ट्रेलियाला २-२ असे बरोबरीत रोखले. हा भारतीय महिला संघाचा या स्पर्धेतील दुसरा साखळी सामना होता. याआधी शनिवारी झालेल्या पहिल्या सामन्यात भारताने यजमान जपानचा २-१ असा पराभव केला होता. ऑलिम्पिक पात्रता फेरीआधी जागतिक क्रमवारीत दुसर्‍या स्थानी असणार्‍या ऑस्ट्रेलियाला बरोबरीत रोखणे ही भारतीय संघाची आत्मविश्वास वाढवणारी कामगिरी आहे.

रविवारी झालेल्या या स्पर्धेच्या दुसर्‍या सामन्याची जागतिक क्रमवारीत दहाव्या स्थानी असणार्‍या भारताने आक्रमक सुरुवात केली. ऑस्ट्रेलियानेही दमदार खेळ केल्याने सुरुवातीच्या काही क्षणांतच दोन्ही संघांना पेनल्टी कॉर्नर मिळाले, पण कोणालाही गोल करता आला नाही. या सामन्याच्या १४ व्या मिनिटाला ऑस्ट्रेलियाला पेनल्टी मिळाली. केटलीन नॉब्सने याचे गोलमध्ये रूपांतर करत ऑस्ट्रेलियाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. दुसर्‍या सत्रातही ऑस्ट्रेलियाने अप्रतिम खेळ करत भारताच्या बचावफळीवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र, भारताची गोलरक्षक सविताच्या उत्कृष्ट खेळामुळे त्यांची आघाडी वाढू शकली नाही. मध्यंतरापर्यंत ऑस्ट्रेलियाने आपली आघाडी कायम ठेवली.

- Advertisement -

तिसर्‍या सत्रात मात्र भारतीय संघाने पुनरागमन केले. सामन्याच्या ३६ व्या मिनिटाला भारताच्या वंदना कटारियाने गोल केला आणि सामन्यात १-१ अशी बरोबरी केली. पण ही बरोबरी काही मिनिटेच राहिली. ४३ व्या मिनिटाला उत्तम सांघिक कामगिरी करत ऑस्ट्रेलियाने पुन्हा आघाडी मिळवली. त्यांचा हा गोल ग्रेस स्टुअर्टने केला. यानंतर भारताला गोल करण्याची संधी मिळेल असे वाटत नव्हते. मात्र, सामना संपायला १ मिनिट बाकी असताना भारताला पेनल्टी कॉर्नर मिळाला. या संधीचे सोने करत गुरजीत कौरने गोल केला. त्यामुळे हा सामना २-२ असा बरोबरीत संपला. भारताचा तिसरा आणि अखेरचा साखळी सामना मंगळवारी चीनविरुद्ध होईल.

पुरुष संघाचा पराभव

- Advertisement -

ऑलिम्पिक चाचणी स्पर्धेतील दुसर्‍या सामन्यात भारतीय पुरुष संघाला पराभवाचा सामना करावा लागला. त्यांचा न्यूझीलंडने १-२ असा पराभव केला. कर्णधार हरमनप्रीत सिंगने दुसर्‍या मिनिटाला गोल करत भारताला आघाडी मिळवून दिली. त्यांनी ही आघाडी ३ सत्रे कायम राखली. मात्र, अखेरच्या सत्रात जेकब स्मिथ (४७ वे मिनिट) आणि सॅम लेन (६० वे मिनिट) यांनी गोल केल्याने न्यूझीलंडने हा सामना २-१ असा जिंकला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -