घरक्रीडाकर्णधार करुणरत्नेचे शतक; श्रीलंकेची न्यूझीलंडवर मात

कर्णधार करुणरत्नेचे शतक; श्रीलंकेची न्यूझीलंडवर मात

Subscribe

कर्णधार दिमुथ करुणरत्नेने केलेल्या अप्रतिम शतकाच्या जोरावर श्रीलंकेने पहिल्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडवर ६ विकेट राखून मात केली. या विजयामुळे श्रीलंकेने २ कसोटी सामन्यांच्या या मालिकेत १-० अशी आघाडी मिळवली. तसेच हा सामना जिंकल्यामुळे आयसीसी जागतिक कसोटी स्पर्धेत त्यांनी ६० गुणांची कमाई केली. कर्णधार करुणरत्नेचे हे कसोटी कारकिर्दीतील नववे, तर कसोटी सामन्याच्या चौथ्या डावातील पहिलेच शतक होते.

गॉल आंतरराष्ट्रीय स्टेडियम येथे झालेल्या या कसोटी सामन्यात न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना २४९ धावा केल्या, ज्याचे उत्तर देताना श्रीलंकेने पहिल्या डावात २६७ धावांची मजल मारत १८ धावांची आघाडी मिळवली होती. न्यूझीलंडने त्यांच्या दुसर्‍या डावात २८५ धावा करत श्रीलंकेसमोर सामना जिंकण्यासाठी २६८ धावांचे आव्हान ठेवले. याचा पाठलाग करताना श्रीलंकेचे सलामीवीर करुणरत्ने आणि लाहिरू थिरीमाने यांनी उत्कृष्ट फलंदाजी केली. या दोघांनीही अर्धशतके झळकावली. त्यामुळे चौथ्या दिवसअखेर श्रीलंकेची बिनबाद १३३ अशी धावसंख्या होती. पाचव्या दिवशी पुढे खेळताना त्यांनी पहिली १० षटके संयमाने फलंदाजी केली.

- Advertisement -

मात्र, या डावाच्या ६१ व्या षटकात थिरीमानेचा संयम सुटला. ऑफस्पिनर विल सॉमरविलच्या गोलंदाजीवर स्विप मारण्याच्या नादात थिरीमाने ६४ धावांवर पायचीत झाला. त्याने या धावा १६३ चेंडूत ४ चौकारांच्या मदतीने केल्या. त्याने आणि करुणरत्नेने पहिल्या विकेटसाठी १६१ धावांची भागीदारी केली. तिसर्‍या क्रमांकावर आलेल्या कुसाल मेंडिसने पहिल्या ४ चेंडूत १ चौकार आणि १ षटकार लगावला. पण पुढच्याच षटकात तोही एजाज पटेलच्या गोलंदाजीवर स्विप मारताना बाद झाला.

करुणरत्नेने मात्र आपली दमदार फलंदाजी सुरू ठेवली. या डावाच्या पटेल टाकत असलेल्या ६६ व्या षटकात चौकार लगावत त्याने आपले कसोटी कारकिर्दीतील नववे आणि न्यूझीलंडविरुद्धचे दुसरे शतक पूर्ण केले. यानंतर त्याने धावांची गती वाढवण्याचा प्रयत्न केला. मात्र, १२२ धावांवर तो माघारी परतला. त्याला टीम साऊथीने यष्टीरक्षक वॉटलिंगकरवी झेलबाद केले. पुढे अँजेलो मॅथ्यूज (नाबाद २८), कुसाल परेरा (२३) आणि धनंजय डी सिल्वा (नाबाद १४) यांनी चांगली फलंदाजी करत श्रीलंकेला विजय मिळवून दिला. पहिल्या डावात ३९ आणि दुसर्‍या डावात शतकी खेळी करणार्‍या करुणरत्नेलाच सामनावीराचा पुरस्कार मिळाला.

- Advertisement -

संक्षिप्त धावफलक –

न्यूझीलंड : २४९ आणि २८५ पराभूत वि. श्रीलंका : २६७ आणि ८६.१ षटकांत ४ बाद २६८ (दिमुथ करुणरत्ने १२२, लाहिरू थिरीमाने ६४, अँजेलो मॅथ्यूज नाबाद २८; टीम साऊथी १/३३, ट्रेंट बोल्ट १/३४, विल सॉमरविल १/७३, एजाज पटेल १/७४).

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -