घरक्रीडाधोनीच्या जागेसाठी राहुल योग्य!

धोनीच्या जागेसाठी राहुल योग्य!

Subscribe

गौतम गंभीरचे मत

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी मागील वर्षी इंग्लंडमध्ये झालेल्या एकदिवसीय विश्वचषकानंतर क्रिकेट खेळलेला नाही. त्याला वगळून भारतीय संघ व्यवस्थापन युवा यष्टीरक्षक-फलंदाज रिषभ पंतला संधी देण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, पंतला क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत धावांसाठी झुंजावे लागले आणि त्याने यष्टींमागेही काही चुका केल्या. त्यामुळे त्याला संघातून वगळण्यात आले. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये मागील काही सामन्यांत त्याच्या जागी सलामीवीर लोकेश राहुलने यष्टिरक्षणाची धुरा सांभाळली आणि सर्वांनाच प्रभावित केले. तसेच मागील चार एकदिवसीय सामन्यांत पाचव्या क्रमांकावर खेळताना त्याने ८०, नाबाद ८८, ४ आणि ११२ धावा केल्या. त्यामुळे धोनीच्या जागेसाठी राहुलच योग्य आहे, असे मत भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरने व्यक्त केले.

धोनीच्या जागेसाठी राहुलच योग्य आहे. यष्टीरक्षक म्हणून तो नक्कीच धोनीइतका चांगला नाही. मात्र, टी-२० क्रिकेटचा विचार केला, तर राहुल उपयुक्त खेळाडू आहे. तो यष्टिरक्षण करु शकतो आणि तिसर्‍या किंवा चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यात सक्षम आहे. आयपीएल झाले नाही, तर धोनीचे पुनरागमन अवघड आहे. अखेर तुम्ही भारताचे प्रतिनिधित्व करणार असता, त्यामुळे सर्वोत्तम कामगिरी करणार्‍या आणि भारताला सामना जिंकवून देऊ शकणार्‍या खेळाडूलाच संघात स्थान मिळाले पाहिजे, असे गंभीर म्हणाला.

- Advertisement -

राहुलने टी-२० क्रिकेटमध्ये आतापर्यंत ४२ सामन्यांत ४६ च्या सरासरीने आणि १४६.१० च्या सरासरीने १४६१ धावा केल्या आहेत. खासकरुन त्याने मागील काही सामन्यांत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. मागील ११ टी-२० डावांमध्ये त्याने ६ अर्धशतके केली असून दोनवेळा ४० हून अधिक धावा केल्या आहेत. तसेच यावर्षीच्या सुरुवातीला न्यूझीलंडविरुद्ध पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत त्याने मालिकावीराचा पुरस्कार पटकावला होता. त्यामुळे टी-२० विश्वचषक झाल्यास रोहित शर्मासह राहुलच भारताच्या डावाची सुरुवात करण्याची शक्यता आहे.

आयपीएलविना धोनीचे पुनरागमन अवघड!
करोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाची आयपीएल स्पर्धा पुढे ढकलण्यात आली. करोनाचा प्रादुर्भाव अजूनही कमी होत नसल्याने ही स्पर्धा इतक्यातच होण्याची शक्यता कमी आहे. आयपीएलविना धोनीला भारतीय संघात पुन्हा स्थान मिळवणे अवघड जाईल, असे गंभीरला वाटते. निवृत्त व्हायचे की, नाही हा त्याचा वैयक्तिक निर्णय आहे. मात्र, यावर्षी आयपीएल झाले नाही, तर धोनीचे पुनरागमन अवघड आहे. तो मागील सहा महिने ते एक वर्ष क्रिकेट खेळलेला नाही. मग कशाच्या आधारावर त्याला भारतीय संघात निवडणार?, असे गंभीर म्हणाला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -