घरक्रीडालिव्हरपूल, मँचेस्टर सिटीचा विजय

लिव्हरपूल, मँचेस्टर सिटीचा विजय

Subscribe

अँड्र्यू रॉबर्टसन आणि साडियो माने यांनी अखेरच्या काही मिनिटांमध्ये केलेल्या गोलमुळे लिव्हरपूलने इंग्लिश प्रीमियर लीगच्या सामन्यात अ‍ॅश्टन विलाचा २-१ असा पराभव केला. त्यामुळे लिव्हरपूलच्या संघाने आपली अपराजित राहण्याची मालिका कायम ठेवली आहे. हा लिव्हरपूलचा अकरा सामन्यांतील दहावा विजय होता, तर त्यांचा एक सामना बरोबरीत संपला होता. दुसरीकडे गतविजेत्या मँचेस्टर सिटीलाही आपला सामना जिंकण्यात यश आले. त्यांनी साऊथहॅम्पटनवर २-१ अशी मात केली. सध्या गुणतक्त्यात अव्वल दोन स्थानांवर असणार्‍या या संघांमध्ये पुढील रविवारी सामना होणार आहे. लिव्हरपूलचे सध्या ३१, तर मँचेस्टर सिटीचे २५ गुण आहेत.

लिव्हरपूल आणि अ‍ॅश्टन विला यांच्यातील सामना सुरुवातीपासूनच चुरशीचा झाला. सामन्याच्या पहिल्याच मिनिटाला विलाच्या एल गाझीने गोलवर फटका मारला, पण तो लिव्हरपूलचा गोलरक्षक अ‍ॅलिसनने अडवला. मात्र, विलाला गोलसाठी फार वाट पहावी लागली नाही. २१ व्या मिनिटाला जॉन मगिनच्या पासवर ट्रेझगेटने गोल केला आणि विला संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. यानंतर २८ व्या मिनिटाला लिव्हरपूलच्या रॉबर्टो फर्मिन्होने गोल केला, पण व्हीएआरमध्ये तो ऑफसाईड असल्याचे आढळल्याने हा गोल रद्द करण्यात आला. त्यामुळे विला संघाने मध्यंतरापर्यंत आपली आघाडी कायम ठेवली.

- Advertisement -

मध्यंतरानंतर लिव्हरपूलने आक्रमक खेळ करण्याचा प्रयत्न केला. मात्र, विलाच्या भक्कम बचावामुळे त्यांना गोल करण्यासाठी बरीच मेहनत करावी लागली. लिव्हरपूलला काही संधी मिळाल्या, पण त्यांना त्याचे गोलमध्ये रूपांतर करता आले नाही. अखेर ८७ व्या मिनिटाला साडियो मानेच्या अप्रतिम क्रॉसवर रॉबर्टसनने गोल केला आणि लिव्हरपूलला १-१ अशी बरोबरी करून दिली. ९० मिनिटांनंतर अतिरिक्त वेळेत साडियो मानेने गोल करत लिव्हरपूलला हा सामना २-१ असा जिंकवून दिला.

मँचेस्टर सिटीने साऊथहॅम्पटनवर २-१ अशी मात केली. पूर्वार्धात जेम्स वॉर्ड-प्रॉसने गोल करत साऊथहॅम्पटनला १-० अशी आघाडी मिळवून दिली. त्यांना ही आघाडी ७० व्या मिनिटापर्यंत राखण्यात यश आले होते. मात्र, स्टार स्ट्रायकर सर्जिओ अगुव्हेरोने गोल करत मँचेस्टर सिटीला बरोबरी करून दिली. ८६ व्या मिनिटाला कायेल वॉल्करने गोल करत मँचेस्टर सिटीला २-१ अशी आघाडी मिळवून दिली. ही आघाडी त्यांनी अखेरपर्यंत राखत सामना जिंकला.

- Advertisement -

(अन्य निकाल : बोर्नमथ १-० मँचेस्टर युनायटेड, वेस्ट हॅम २-३ न्यूकॅसल, आर्सनल १-१ वोल्व्हस, शेफील्ड युनायटेड ३-० बर्नली, ब्रायटन २-० नॉर्विच, वॉटफोर्ड १-२ चेल्सी).

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -