घरक्रीडाविराट कोहली होगा अब सबका बॉस! टेस्ट रँकिंगमध्ये फक्त एक पाऊल मागे!

विराट कोहली होगा अब सबका बॉस! टेस्ट रँकिंगमध्ये फक्त एक पाऊल मागे!

Subscribe

भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार विराट कोहलीच्या कसोटी मानांकनामध्ये सुधारणा झाली असून त्याने रँकिंगमध्ये दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. आता तो पहिल्या स्थानावरच्या स्टीव्ह स्मिथपेक्षा फक्त एका गुणाने मागे आहे.

दक्षिण आफ्रिकेला पुण्यात झालेल्या कसोटी सामन्यामध्ये एक डाव आणि १३६ धावांनी नमवणाऱ्या टीम इंडियाच्या विजयामध्ये महत्त्वाचा वाटा राहिला होत कर्णधार विराट कोहलीचा. कर्णधार म्हणून पहिल्या ५० सामन्यांपैकी सर्वाधिक विजय मिळवणाऱ्या खेळाडूंच्या यादीमध्ये आता विराट कोहली तिसऱ्या स्थानी आला आहे. मात्र, आता लवकरच विराट कोहली सबका बॉस होणार आहे. म्हणजेच, टेस्ट रँकिंगमध्ये तो अव्वल स्थानी झेप घेण्यापासून अवघं एक पाऊल मागे आहे. नुकतेच आयसीसीने टेस्ट रँकिंग जाहीर केली असून या यादीमध्ये पहिल्या स्थानावर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथ आहे. त्याच्या नावापुढे एकूण ९३७ गुणांची नोंद आहे. पण त्याच्या पाठोपाठच टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली असून त्याच्या नावापुढे ९३६ गुणांची नोद आहे. त्यामुळे नजीकच्या काळात कोहली ‘सबका बॉस’ होणार आहे!

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीमध्ये विराट कोहलीने टोलवलेल्या नाबाद २५४ धावा भारताच्या विजयामध्ये मोलाच्या ठरल्या. भारताने ही कसोटी जिंकत कसोटी मालिका देखील खिशात घातली. आता या मालिकेमधला शेवटचा सामना रांचीमध्ये होणार असून त्या सामन्यातच कोहली स्मिथला मागे टाकत अव्वल स्थानी झेप घेण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

हेही वाचा – विराट कोहलीला बघायचाय छत्रपती शिवरायांचा ‘हा’ किल्ला!

याच मालिकेमध्ये पहिल्या सामन्यानंतर विराट कोहलीची ९०० अंकांच्या खाली घसरण झाली होती. जानेवारी २०१८नंतर पहिल्यांदाच विराट कोहली ९०० अंकांच्या खाली गेला होता. मात्र, दुसऱ्या सामन्यानंतर हे गुण ९३६ झाल्यामुळे कोहलीने दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. ऑगस्ट २०१८मध्ये कोहली पहिल्या स्थानावर होता. मात्र, त्यानंतर त्याच्या गुणांची घसरण झाली होती.

दरम्यान, भारताचा फिरकी गोलंदाज रवीचंद्रन अश्विन याने देखील टेस्ट रँकिंगमध्ये वरच्या स्थानावर झेप घेतली आहे. पुण्यात झालेल्या सामन्यामध्ये अश्विनने ६ विकेट्स घेतल्यामुळे त्याच्या मानांकनामध्ये सुधारणा होऊन १०व्या स्थानावरून त्याने ७व्या स्थानापर्यंत मजल मारली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -