घरठाणेविठ्ठलवाडी ते कल्याण-नगर महामार्गची निविदा जाहीर

विठ्ठलवाडी ते कल्याण-नगर महामार्गची निविदा जाहीर

Subscribe

उल्हासनगर । विठ्ठलवाडी येथून जुन्या पुणे लिंक रस्त्यावरून थेट कल्याण अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावर जाण्यासाठी उन्नत मार्गाची उभारणी केली जात असून त्यासाठीची निविदा नुकतीच मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या वतीने जाहीर करण्यात आली आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे अवघ्या काही महिन्यात हा रस्ता मार्गी लागला आहे. या मार्गामुळे 40 मिनीटे ते एक तासांचा प्रवास फक्त पाच मिनिटांवर येणार आहे. दोन रेल्वे मार्गिका ओलांडून वालधुनी नदीला समांतर या मार्गाची उभारणी केली जाणार असून या कामासाठी 642 कोटी 98 लाखांची मंजुरी मिळाली आहे.

कल्याण लोकसभा मतदारसंघात सध्याच्या घडीला कल्याण पूर्व, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर या शहरातले प्रवासी वाहन चालक भिवंडी, ठाणे आणि मुंबईत जाण्यासाठी कल्याण शहरातून प्रवास करतात. त्यामुळे कल्याण शहरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. यावर उपाय म्हणून खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी एमएमआरडीए प्रशासनापुढे जुन्या पुणे लिंक रस्त्यावरून विठ्ठलवाडी ते थेट कल्याणच्या अहमदनगर राष्ट्रीय महामार्गाला जोडण्यासाठी उन्नत मार्गाची संकल्पना मांडली होती. एमएमआरडीएने तात्काळ त्याला मंजुरी देत त्याचे सर्वेक्षण करून भूसंपादन सुरू केले होते. या मार्गाच्या उभारणीसाठी आवश्यक जागाही संपादित करण्यात आली. आता या मार्गाच्या उभारणीसाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) माध्यमातून निविदा जाहिर करण्यात आली आहे. त्यामुळे लवकरच कामाला सुरूवात होणार असून हा मार्ग पूर्ण झाल्यास त्याचा मोठा फायदा प्रवाशांना होणार आहे.

- Advertisement -

असा आहे उन्नत मार्ग
कल्याण अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावर पाम्स वॉटर रेसॉर्ट ते कल्याण बदलापूर रस्त्यावर जगदीश दुग्धालय ते जुना पुणे लिंक रस्त्यापर्यंत वालधुनी नदीला समांतर हा उन्नत मार्ग उभारला जात आहे. हा मार्ग कल्याण कर्जत रेल्वे मार्ग, कल्याण बदलापूर राज्यमार्ग आणि पुढे कल्याण कसारा रेल्वे मार्ग ओलांडून जाणार आहे. अहमदनगर मार्गावर 800 मीटरच्या तर पुणे लिंक रस्त्यावर 700 मीटरच्या दोन येणार्‍या जाणार्‍या मार्गिका असतील. संपूर्ण मार्गाची लांबी 1900 मीटर असेल. तर एकूण मार्गात 3400 मीटरचे बांधकाम होईल. कल्याण बदलापूर राज्यमार्गावर उतरण्यासाठी मार्गिका असतील. त्याच्या आरेखन आणि बांधकामासाठी एमएमआरडीएने निविदा मागवली आहे. सुमारे अडीच किलोमीटरचा हा मार्ग कल्याण शहरात होणारी कोंडी फोडण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -