घरठाणेडोंबिवलीत मासळी विक्रेत्यांचा बंद

डोंबिवलीत मासळी विक्रेत्यांचा बंद

Subscribe

बाहेरून येणार्‍या विक्रेत्यांना विरोध

डोंबिवली शहरात बाहेरून येवून व्यवसाय करणार्‍या मासळी विक्रेत्यांच्या विरोधात स्थानिक मासळी विक्रेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. बाहेरील मासळी विक्रेत्यांना व्यवसाय करण्यास मनाई करावी, यासाठी स्थानिक मासळी विक्रेत्यांनी बाजार बंद पुकारला होता. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. डोंबिवली शहरात पश्चिमेला स्टेशनजवळ एकमेव मासळी मार्केट आहे. मात्र सर्वात मोठा मासळी बाजार उमेश नगर रेतीबंदर रोडवर भरत असतो. बुधवार, शुक्रवार आणि रविवारी भरणार्‍या या बाजारात कायम मोठी गर्दी उसळत असते. याशिवाय जुनी डोंबिवली, कोपर , नवापाडा, दत्त नगर, पाथर्ली, सोनारपाडा आदी भागात ठिकठीकाणी स्थानिक मासळी विक्रेते आपला व्यवसाय करीत असतात.

गेल्या कोरोना काळापासून वसईतील मासळी विक्रेत्या कोळी महिला डोंबिवलीत येवून व्यवसाय करीत आहेत. ताजी मासळी बाजारापेक्षा स्वस्त मिळत असल्याने स्थानिक ग्राहकांचा त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र त्यामुळे स्थानिक मासळी विक्रेत्यांच्या व्यवसायावर परिणाम होत आहे. बाहेरून येणार्‍या मासळी विक्रेत्यांमुळे आपला व्यवसाय होत नाही, अनेकदा आणलेला मासळीचा माल विक्री अभावी पडून राहतो. आर्थिक नुकसान होत असते असा स्थानिक मासळी विक्रेत्यांचा दावा आहे. याउलट वसईहून येणार्‍या मासळी विक्रेत्या कोळी महिलांनी आम्ही काय परप्रांतीय आहोत काय? असा सवाल केला आहे. आम्ही देखील स्थानिक भूमिपुत्रच आहोत आम्ही स्वतः मासळी पकडून ताजी ताजी आणतो, ग्राहक स्वतः आमच्याकडे येवून मासळी खरेदी करतात, आम्ही परप्रांतीय मासळी विक्रेत्यांसारखे घरोघरी जावून मासळी विक्री करीत नाही. व्यवसाय करण्याचा आमचं देखील हक्क आहे. या वेगवेगळ्या भूमिकांमुळे आता स्थानिक आणि बाहेरील मासळी विक्रेते असा वाद निर्माण झाला आहे. याच वादातून शुक्रवारी डोंबिवलीतील मासळी विक्रेत्या महिलांनी बाजार बंद पुकारल्याने मत्स्यप्रेमी मंडळींना मासे मिळू शकले नसल्याने गैरसोय झाली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -