घरक्राइमछताचे प्लास्टर पडून भाऊ-बहिण जखमी; मुंब्र्यातील घटना

छताचे प्लास्टर पडून भाऊ-बहिण जखमी; मुंब्र्यातील घटना

Subscribe

ठाणे : ठाणे परिसरात छत किंवा इमारतीच्या पडझडीच्या घटना घडतच आहेत. मुंब्र्याच्या मेहक इमारतीमधील 203 या सदनिकेत छताचे प्लास्टर पडून भाऊबहिण किरकोळ जखमी झाल्याची घटना गुरुवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास घडली.

इब्राहिम शेख (9) आणि अनुप शेख (7) अशी दोघांची नावे असून कळवा छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात प्राथमिक उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले. इब्राहिम याच्या डोक्याला तर, अनुप हिच्या उजव्या हाताला दुखापत झालेली आहे. ही घटना घडली तेव्हा घरात चौघे जण होते, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली.

- Advertisement -

हेही वाचा – खड्ड्यांमुळे ठाणेकरांचे वांदे; अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा, संजय केळकर यांची मागणी

मुंब्रा अमृतनगर परिसरात मेहक नावाची तळ अधिक पाच मजली इमारत आहे. याच इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील सदनिका नंबर 203मध्ये आरिफ शेख हे भाडेकरू आहेत. त्याच सदनिकेच्या हॉलमधील छताचे प्लास्टर पडले असून त्यामध्ये इब्राहिम आणि अनुप हे किरकोळ जखमी झाले. घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन दल या विभागांनी धाव घेतली होती, असे आपत्ती व्यवस्थापन कक्षाने सांगितले.

- Advertisement -

दुर्घटनांचे सत्र सुरूच
ठाण्याच्या वागळे इस्टेट, राम नगर येथे मंगळवारी रात्री एका रिकाम्या केलेल्या चाळीतील घराची भिंत व काही भाग कोसळल्याची घटना घडली होती. रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास समोर झालेल्या घटनेत सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही. सुरक्षेच्या दृष्टीने बाजूच्या 3 कुटुंबांना शेजारच्या चाळीमध्ये तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतरीत करण्यात आले. तसेच, घरांचा आवश्यक तितका धोकादायक भाग पडण्यात आला असून घटनास्थळी चाळीतील तिन्हीही बंद रिकामी घरे धोकादायक स्थितीत असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली.

महिन्याच्या सुरुवातीला खोपटमध्ये प्लास्टर पडले
खोपट (प्रताप टॉकीजजवळ, ब्रम्हांड सेवा संघाच्या बाजूला) येथे तळ अधिक दोन मजली अशा सार्वजनिक शौचालयाच्या दुसऱ्या मजल्यावर राहण्यासाठी बांधण्यात आलेल्या रुमच्या छताचे प्लास्टर 5 जुलै 2023 रोजी सकाळी पावणेदहा वाजण्याच्या सुमारास पडले होते. त्यात दोन मुली जखमी झाल्या होत्या. गौरी संतोष गायकवाड या 13 वर्षीय मुलीच्या डोक्याला तर, शिखा सुनील कारतीया या 17 वर्षीय मुलीच्या उजव्या पायाला किरकोळ दुखापत झाली. हे शौचालय दहा वर्षे जुने होते.

हेही वाचा – खराब रस्त्यांची दुरुस्ती 12 तासांत करा, ठाणे पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांचे निर्देश

रुग्णालयातील पीओपी प्लास्टर कोसळले
ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील हृदयरोग विभागानजीकच्या कॅरिडॉरमधील पीओपी (प्लास्टर) सिलिंग पडल्याची घटना 25 जून 2023 रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास घडली होती. सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झालेली नाही. उर्वरित सिलिंग धोकादायक झाले असल्याने ते ठाणे महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या कर्मचाऱ्यांकडून काढण्यात आले होते.

सहा घरांचा सज्जा कोसळला
समता नगर, राजीव गांधी कंपाऊंड येथील पंचरत्न चाळीतील सहा घरांचा सज्जा पडल्याची घटना 27 जून 2023 दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली. यामध्ये सुरेश वाल्मिकी (33) हे जखमी झाले होते. त्याच्या पाठीला दुखापत झाली होती. ज्यावेळी सज्जा पडला, त्यावेळी ते सज्जावर उभे होते. पंचरत्न चाळ ही 25 वर्ष जुनी आहे. तळ अधिक एक मजला अशा या चाळीत 12 घरे आहेत. त्यापैकी सहा घरांचा सज्जा दुपारी अचानक कोसळला. हा सज्जा अंदाजे 50 फूट लांब 4 फूट रुंद होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -