घरठाणेस्वागत कमानीची लादी पडून बालकाचा मृत्यू

स्वागत कमानीची लादी पडून बालकाचा मृत्यू

Subscribe

महानगरपालिका प्रशासन अनभिज्ञ

भिवंडी । भिवंडी शहरातील न्यू टावरे कंपाऊंड नारपोली या ठिकाणी महापालिका शाळेसमोर असलेल्या स्वागत कमानीला लावलेली संगमरवरी लादी कोसळून झालेल्या दुर्घटनेत त्या परिसरात खेळत असलेल्या एका चार वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आयुषकुमार शंकर प्रसाद कुशवाह (4 वर्षे) असे या दुर्दैवी बालकाचे नाव आहे.

तो शहरातील न्यु टावरे कंपाऊंड येथील पालिका शाळा क्रमांक 72 समोर स्वागत कमानीजवळ सायंकाळी सहा वाजता नेहमीप्रमाणे खेळत होता. त्यावेळी कमानीस लावलेली संगमरवरी लादी अचानकपणे कोसळून आयुषकुमार याच्या डोक्यात कोसळली. या घटनेनंतर तो बेशुद्ध पडला. या दुर्घटनेनंतर त्या अवस्थेतील बालकास घेऊन त्याची आई शहरातील इंदिरागांधी उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाली. परंतु डॉक्टरांनी आयुष कुमार यास मृत घोषित केले. या घटने बाबत महानगरपालिका प्रशासन अनभिज्ञ असून घटनेनंतर चार तास पालिका प्रशासन कडून घटनास्थळी कोणी फिरकलेच नाही. ही स्वागत कमान 14 वर्षांपूर्वी बनविण्यात आली असून स्वागत कमानी वरील अनेक लाद्या निखळून पडल्या आहेत.

- Advertisement -

या कमानीसमोर शाळा असल्याने अपघात घडू शकतो. या बाबत शाळा शिक्षकांसह स्थानिक माजी नगरसेवक भगवान टावरे यांनी पालिका प्रशासनाकडे तक्रार करून लाद्या काढून टाकण्याची मागणी केली. परंतु त्याकडे पालिका प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने या चिमुरड्याच्या अपघाती मृत्यूस पालिका जबाबदार असल्याचा आरोप भगवान टावरे यांनी केला आहे. त्यामुळे संबंधित पालिका अभियंत्यावर आणि प्रभाग समिती 4 च्या अभियंत्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -