घरठाणेनव्याने आरएमसी प्लांट उभारण्यास परवानगी नको

नव्याने आरएमसी प्लांट उभारण्यास परवानगी नको

Subscribe

आनंद परांजपे यांची पालिका आयुक्तांकडे मागणी, ठाण्यातील वाढत्या प्रदुषणाचा प्रश्न गंभीर

ठाणे शहरामध्ये दिवसेंदिवस खालावत चाललेल्या हवेच्या गुणवत्तेमुळे नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे लोकवस्तीच्या ठिकाणी असलेल्या आरएमसी प्लांटमध्ये होत असलेल्या सिमेंटचा वापर. यामुळे लोकवस्तीच्या ठिकाणी नव्याने आरएमसी प्लांट उभारण्यास परवानगी नाकारावी, अशी मागणी, राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते, ठाणे आणि पालघर समन्वयक, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्याकडे केली आहे. दिल्लीमध्ये हवेची गुणवत्ता खालावत चालली असून त्याचे मुख्य कारण म्हणजे प्रदूषणाच्या पातळीमध्ये झालेली वाढ हे आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर त्याचे गंभीर परिणाम होत आहेत, अशा बातम्या समोर येत आहेत. दिल्लीप्रमाणे मुंबई तसेच मुंबईलगत असलेल्या ठाणे शहरामध्ये देखील हवेची गुणवत्ता खालावत चालली असून त्यामुळे दिवसेंदिवस प्रदूषणामध्ये वाढ होत आहे. रोजच्या जगण्यासाठी करावी लागणारी धडपड तसेच सतत धावपळीचे जीवन जगणार्‍या नागरिकांना वाढलेल्या हवेच्या प्रदूषणाने साधा श्वास देखील नीट घेता येईना झाला आहे. हवेच्या प्रदूषणाने ग्रस्त झालेले नागरीक विविध आरोग्यविषयक समस्येला तोंड देत आहेत. आतापर्यंत केवळ दिल्लीमध्ये हवेच्या प्रदूषणाबाबतच्या बातम्या कानावर येत होत्या. परंतु आता महाराष्ट्रासह मुंबई, ठाणे शहर परिसरामध्ये देखील प्रदूषणामध्ये वाढ होत आहे, असे मत आनंद परांजपे यांनी व्यक्त केला आहे.

प्रदूषणवाढीसाठी महत्वाचे कारण असलेल्या मोठमोठ्या अनेक इंडस्ट्रीज सध्या बंद झाल्या आहेत. परंतु शहरामध्ये बांधकाम उद्योगामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत असून इमारत उभारणीसाठी मोठ्या कॉम्प्लेक्समध्ये आरएमसीचे प्लांट उभारण्यात येतात. यामध्ये सिमेंटचा मोठ्या प्रमाणावर वापर होत असतो. त्यामुळे सिमेंटसारख्या सर्वात कमी मायक्रॉनचे धूलीकण, त्यासोबत वाळू तसेच खडी यांचे धूलीकण हवेत मिसळल्याने धुरके तयार होते आणि ज्या ठिकाणी हे प्लांट उभारण्यात येतात त्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर प्रदुषणाची समस्या निर्माण होते. हे आरएमसी प्लांटधारक हा केवळ ज्या कॉम्प्लेक्ससाठी तो प्लांट उभारण्यात आला आहे, त्यासाठी त्याचा वापर न करता बाहेर देखील त्या मालाची विक्री करताना दिसत आहे. त्यामुळे वारंवार रस्त्यावर फिरणारी आरएमसीची वाहने, त्यामधून निघणारे धुलीकण हेसुद्धा प्रदूषणाला कारणीभूत ठरत आहेत. याचा परिणाम, ज्या परिसरामध्ये हे प्लांट उभारण्यात येतात त्या परिसरातील नागरिकांना श्वसनाच्या तसेच इतर आरोग्यविषयक समस्यांना तोंड द्यावे लागते, अशी माहिती आनंद परांजपे यांनी दिली.
आरएमसी प्लांट उभारण्यासाठी अनेक परवानग्यांची आवश्यकता असते. त्यानुसार प्लांटधारकाने संबंधित कायद्यानुसार परवानगी घेतली आहे का ? याची तपासणी होणे अत्यंत आवश्यक आहे. यापूर्वी दररोज ठाणे महानगरपालिकेमार्फत हवेची गुणवत्ता तपासणी केली जायची. ती आता दिसत नाही. त्यामुळे ठाणे शहरामध्ये प्रदूषण यंत्रणेची काय व्यवस्था आहे? हेच कळेनासे झाले आहे. या प्रकरणी आपण जातीने लक्ष घालून ठाणे महानगरपालिकेच्या प्रदूषण विभागाला, जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून विचार करता योग्य ती खबरदारी घेण्याचे आदेश द्यावेत. तसेच हवेच्या प्रदुषणाला कारणीभूत ठरणारे आरएमसी प्लांट ज्या ठिकाणी सुरु असतील त्या ठिकाणी संबंधीत प्लांट धारकाने आवश्यक त्या सर्व परवानग्या घेतल्या आहेत का? याची तपासणी करावी. तसेच जोपर्यंत ठाणे शहर प्रदूषणाच्या विळख्यातून बाहेर पडत नाही तोपर्यंत लोकवस्तीच्या ठिकाणी नव्याने आरएमसी प्लांट उभारण्यासाठी परवानगी देण्यात येऊ नये, असे स्पष्ट मत आनंद परांजपे यांनी व्यक्त केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -