घरठाणेदुर्गाडी किल्ल्याची जागा हडपण्याचा डाव

दुर्गाडी किल्ल्याची जागा हडपण्याचा डाव

Subscribe

माळशेज नाणेघाट विकास समिती अध्यक्षाचा पोलिसांकडून शोध

सातवाहन राजाचे वंशज असल्याची, दुर्गाडी किल्ल्याच्या जमिनीची बनावट कागदपत्रे तयार करून त्या आधारे कल्याणातील ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्याची एक हेक्टर जागा महसूल विभागाची दिशाभूल करून माळशेज नाणेघाट वनक्षेत्र पर्यटन स्थळ विकास समितीच्या नावावर करणार्‍या माळशेज भागातील एका नागरिकाचा महात्मा फुले पोलीस ठाण्याचे पोलीस शोध घेत आहेत. इतिहास अभ्यासकांनी या प्रकाराबद्दल आश्चर्य व्यक्त केले आहे. सुयश शिर्के असे आरोपीचे नाव आहे. तो माळशेज नाणेघाट वनक्षेत्र व पर्यटन स्थळ विकास समितीचा अध्यक्ष आहे, असे पोलिसांनी सांगितले. कल्याणच्या महसूल विभागाच्या मंडळ अधिकारी प्रीती घुडे यांच्या हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीला आला आहे. घुडे यांनी तहसीलदार जयराज देशमुख यांच्या आदेशावरून बनावट कागदपत्रांचा आधार घेऊन, शासनाची दिशाभूल करून दुर्गाडी किल्ल्याची जागा स्वताच्या संस्थेच्या नावावर करून घेणार्‍या शिर्के विरुध्द महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.

पोलिसांनी बनावट कागदपत्रे तयार करणे, फसवणूक करणे, शासनाची दिशाभूल करणे अशा कायद्याने गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. पोलिसांनी सांगितले, दुर्गाडी किल्ल्याची जागा आपल्या संस्थेच्या नावावर करण्यासाठी सुयश शिर्केने महसूल विभागाकडे बनावट कागदपत्रे दाखल केली होती. या प्रकरणी कल्याण तहसीलदार कार्यालयात आरोपी शिर्के याने दस्त नोंदणी नसलेली, महसूल अधिकर्‍यांच्या खोट्या स्वाक्षरी, बनावट शिक्क्याची कागदपत्रे दाखल केली होती. ही कागदपत्रे मागील 10 वर्षातील होती. कागदपत्रांमध्ये त्याने आपण सातवाहन राजाचा वंशज असल्याचे म्हटले होते. दुर्गाडी किल्ल्यासंबंधी कागदपत्रे असल्याने कल्याण महसूल विभागाने या कागदपत्रांच्या सत्यतेसाठी ती जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविली होती. जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशावरून या प्रकरणाची चौकशी करण्यात आली. या चौकशीत दुर्गाडी किल्ल्याची जागा ऐतिहासिक आहे. शिर्के यांनी दस्त नोंदणी न करता साध्या अर्जाव्दारे किल्ल्याची जमीन स्वताच्या संस्थेच्या नावावर करण्यासाठी अर्ज दिला आहे. बनावट दस्तऐवज साक्षांकित नसलेले आणि गाव अभिलेखात अशी संस्था, इसमाचा उल्लेख नसल्याचे आढळून आले.

- Advertisement -

महसूल विभागाची चौकशी सुरू असताना बाजारपेठ पोलिसांनी जिल्हाधिकार्‍यांना पत्र पाठवून दुर्गाडी किल्ल्याची मालकी, बंदर हक्क सातवाहन राजाचे वंशज यांच्या मालकीचा आहे का अशी विचारणा केली. या कागदपत्रांमध्ये दुर्गाडी किल्ला, माळशेज नाणेघाट विकास पर्यटन स्थळ संस्था नावाचा सात बारा उतारा, फेरफार, तहसीलदारांची बनावट सही शिक्क्याची कागदपत्रे होती. कागदपत्रांची महसूल विभागाने तपासणी केली. त्यावेळी ती सर्व कागदपत्र दिशाभूल करणारी, संशयास्पद आढळून आली. ऐतिहासिक वारसा असलेल्या दुर्गाडी किल्ला जमिनीच्या अभिलेखात फेरबदल करून ती हडप करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल मंडळ अधिकारी प्रीती घुडे यांनी महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल आरोपीचा शोध सुरू केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -