घरठाणेपालिका-ठेकेदार वादात वेतन रखडले

पालिका-ठेकेदार वादात वेतन रखडले

Subscribe

अंबरनाथमध्ये घंटागाडी चालकांचे आंदोलन

महिनाभरापूर्वी ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया न करणाऱ्या मोठ्या गृहसंकुलांचा कचरा उचलणे पालिकेने बंद केल्यामुळे शहरात कचरा कोंडीसदृश्य चित्र होते. तर आता पालिका व ठेकेदार यांच्या वादात घंटागाडी कर्मचाऱ्यांचे वेतन रखडल्याने पुन्हा शहरात कचराकोंडी होण्याची भीती व्यक्त होत आहे.
अंबरनाथ पालिकेच्या घंटागाड्यांवर काम करणाऱ्या जवळपास १५० कर्मचाऱ्यांना गेल्या तीन महिन्यांपासून वेतन मिळालेले नाही. त्यामुळे बुधवारी सकाळ पासून घंटागाडी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारत नगरपालिका कार्यालयाला घंटागाडीचा घेराव घातला. जोपर्यंत पगार मिळत नाही, तोपर्यंत काम करणार नाही, अशी भूमिका  कर्मचाऱ्यांनी घेतली होती.
या आंदोलनामुळे बुधवारी शहरातला कचरा सुद्धा उशिराने उचलला गेला. अंबरनाथ शहरात सध्या ६६ घंटागाड्या कार्यरत असून त्यावर १५० कर्मचारी कार्यरत आहेत. हे कर्मचारी ठेकेदारकडे काम करत असून ठेकेदाराला पालिकेकडून गेल्या सहा  महिन्यांपासून बिल मिळालेले नाही. त्यातही तीन  महिने ठेकेदारांने खिशातून कामगारांना वेतन दिले. मात्र पालिका पैसेच देत नसल्याने आता ठेकेदारालाही कर्मचाऱ्यांना वेतन देणे अशक्य झाले आहे. कर्मचाऱ्यांच्या वेतनासोबतच वाहनांच्या डिझेल व मेंटेनन्सचा खर्च भागविणेही अवघड जात आहे.
नगर पालिकेने शहरातील घनकचरा गोळा करण्याचे कंत्राट दिलेल्या या ठेकेदाराची मुदत सहा महिन्यांपूर्वी संपुष्टात आली. त्यामुळे नवा कंत्राटदार नेमण्यासाठी प्रक्रिया सुरू झाली. मात्र अद्याप ही प्रक्रिया पूर्ण न झाल्याने याच कंत्राटदाराला मार्च महिन्यापर्यंत मुदतवाढ देण्यात आली. मात्र सहा महिने उलटूनही त्याला कोणतेही बिल अदा केले नसल्याने नुकतेच या कंत्राटदाराच्या कामगारांनी पालिका कार्यालयात धडक दिली होती. मात्र पालिका प्रशासनाने बिल अदा करण्याचे आश्वासन देत त्यांना कामावर रूजू होण्यस सांगितले. त्यामुळे हे कामगार कामावर  परतले.

गेल्या सहा महिन्यांपासून आर्थिक कारणांमुळे कंत्राटदाराचे वेतन दिले  गेले नाही ही बाब खरी आहे. मात्र आम्ही कामावर परिणाम होऊ देणार नाही. बिलाचा प्रश्न लवकरच मार्गी लागेल.
– सुरेश पाटील, आरोग्य अधिकारी,  अंबरनाथ नगरपालिका.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -