घरठाणेजनतेला प्रभूरामाचे नाही तर विकासकामांचे दर्शन घडवा

जनतेला प्रभूरामाचे नाही तर विकासकामांचे दर्शन घडवा

Subscribe

राज ठाकरेंचा अमित शहांना टोला

इतकी वर्ष ज्या राज्यांमध्ये तुम्ही सत्तेत आहात तेथे काय विकास कामे केलीत? याचे दर्शन लोकांना दाखवा, प्रभू श्रीरामचे दर्शन काय घडवता, असा टोला मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना लगावला.
ते ठाण्यात पत्रकारांशी बोलत होते. आगामी कोकण पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर ठाण्यासह पालघर जिल्ह्यातील महत्वाच्या पदाधिकार्‍यांबरोबर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी गुरुवारी ठाण्यात चर्चा केली. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ठाकरे यांनी विरोधकांचा जोरदार त्यांच्या शैलीत समाचार घेतला. निवडणुकीच्या तोंडावर केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी राम लल्लाचे मोफत दर्शन घडविण्याची घोषणा केली आहे. त्यावर बोलताना राज ठाकरे म्हणाले, शाह यांनी टूर्स अँड ट्रॅव्हल्स नावाचे नवीन खाते उघडले असावे. वाजपेयी यांच्या काळातील भाजप वेगळी होती. आताची भाजप वेगळी आहे. सत्तेचा अमरपट्टा कोणीही घेऊन आलेला नाही. धाडी जास्त काळ टिकणार्‍या नसताता. त्या उलटून अंगावर येऊ शकतात, याची जाणीव भाजप नेत्यांना आता झाली असावी, असे खडे बोलही त्यांनी ऐकवले.

पदवीधरांनी ज्या उमेदवाराला मतदान करायचे तो शिकलेला असला पाहिजे, अशी अट नाही असे सांगत ठाकरे यांनी प्रमोद नवलकर जेव्हा उभे होते, तेव्हा त्यांनी उमेदवाराचा फॉर्म दाखविला होता. त्या उमेदवाराच्या फॉर्मच्या खाली सही किंवा अंगठा असे लिहिलेले होते, याची आठवण सांगितली. पदवीधरांच्या मतांवर एक आमदार निवडून आणायचा पण तो पदवीधर नसला तरी चालेल अशी कोणती निवडणूक आहे, याला लोकशाही म्हणतात, असा उपरोधिक सवाल ही राज यांनी केला. यावेळी ठाकरे यांनी न्यायालय फटाके कधी लावायचे ? सण कसे साजरे करायचे हे ठरवणार, मात्र न्यायालयाचे आदेश पाळले जात नाहीत. त्याकडे लक्ष देत नसल्याचे ते म्हणाले, राज्यातील राजकीय परिस्थिती संभ्रमावस्थेतील झालेली आहे. राजकीय पक्ष आणि उमेदवारांना मतदारांची भिती वाटायला हवी. परंतु राजकीय पक्ष उघडपणे मतदारांना मुर्ख समजतात. पाच वर्ष खड्डे, बेरोजगारी या विषयावर बोलून मतदान करताना वेगळ्याच मुद्द्यावर मतदान करायचे असे मतदारांनी केल्यास त्यांची किंमत काय राहणार? असा प्रश्न ठाकरे यांनी उपस्थितीत करून मतदार नुसता सुशिक्षित असून नाही तर सूज्ञ असावा लागतो असेही ठाकरे म्हणाले.

- Advertisement -

राष्ट्रवादीच्या स्थापने पासून राज्यात जातीयवाद वाढला
राज्यातील सद्य परिस्थितीवरून राज यांनी राष्ट्रवादीवर जोरदार हल्लाबोल केला. 1999 मध्ये राष्ट्रवादीची जेव्हा स्थापना झाली. त्यानंतर स्वत:च्या जातीपेक्षा दुसर्‍याच्या जातीबद्दल द्वेष निर्माण व्हायला लागला तर महाराष्ट्राचा उत्तर प्रदेश, बिहार होऊ शकतो अस मी त्यावेळीच सांगितले होते याची आठवण ही त्यांनी करून दिली . स्वार्थी राजकारणामुळे महाराष्ट्राची प्रतिमेची वाट लावण्याचे प्रकार सुरु असल्याचे ठाकरे यांनी सांगितले.

मला दाढी दिसतेय का ?
शिवसेनेत सुरू असलेल्या शाखा वादाबद्दल पत्रकारांनी विचारले असता मिश्कीलपणे ते म्हणाले की तुम्हाला मी दाढी असलेला दिसतो आहे का ? नाही ना मग ? दाढीचे प्रश्न दाढीला ( शिंदेंना) विचारा, मला कशाला विचारता? असे बोलून त्यांनी त्यांनी शिंदे ठाकरे वादात बोलण्याचे टाळले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -