घरठाणेठाणे महापालिकेने विकत घेतले १६ हजार रेमडेसिवीर

ठाणे महापालिकेने विकत घेतले १६ हजार रेमडेसिवीर

Subscribe

मोजले दोन कोटी, तीन वेळा वेगवेगळ्या तीन पुरवठादारांकडून खरेदी

कोविड रुग्णांना उपयोगी ठरलेल्या रेमडेसिवीर या इंजेक्शनची ठाणे महापालिकेने तीन वेळा खरेदी केली आहे. तीही वेगवेगळ्या तीन पुरवठादारांकडून. त्या खरेदीसाठी महापालिकेने तब्बल दोन कोटी रुपये खर्च केले असून त्याचा प्रस्ताव येत्या ठामपाच्या सर्वसाधारण सभेच्या पटलावर मंजुरीसाठी ठेवला आहे.

कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये रेमडेसिवीर इंजेक्शनला मोठ्या प्रमाणात मागणी होती. हे इंजेक्शन मिळवण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांची फरपट सुरू होती. काही जणांनी तर जास्त रक्कम देऊन या इंजेक्शनची खरेदी करण्याची तयारी दर्शवली होती. एका रुग्णाला 5 ते 6 इंजेक्शनची आवश्यकता त्यावेळी भासत होती. त्यामुळे हे इंजेक्शन मिळावे यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांची अक्षरशः तारांबळ उडाली होती. याचवेळी एकमेव आधार असलेल्या ठाणे महापालिकेकडे देखील रेमडेसिवीरचा त्यावेळी तुटवडा निर्माण झाला होता. त्यामुळे आहे त्या किमतीमध्ये या इंजेक्शनची खरेदी करण्याची तयारी पालिकेने दर्शवली.

- Advertisement -

ठाणे महापालिकेची आरोग्य केंद्रे, रुग्णालये, दवाखाने, कोविड रुग्णालयांकरता आवश्यक असणार्‍या 327 बाबींकरता 13 कोटींच्या खर्चाला पालिका आयुक्तांनी मान्यता दिली असून या निधीमधून हा खर्च करण्यात आला आहे. ज्या पुरवठादारांकडून लस खरेदी करण्यात आल्या आहेत त्यापैकी मे.सिप्ला लि. कडून प्रति इंजेक्शन 1020. 32 या दराने 5000 इंजेक्शनची खरेदी करण्यात आली आहे. यासाठी 51 लाख पालिकेला खर्च करावे लागले आहेत. त्यानंतर मे. डेल्फा ड्रग्स आणि फार्मा.इंडिया तसेच मे.दीप इंटरप्रायजेस यांच्याशी वारंवार संपर्क करूनही त्यांच्याकडून इंजेक्शन उपलब्ध झाले नाही यासाठी बृहन्मुंबई महापालिकेला पत्र देऊन 500 इंजेक्शनची मागणी करण्यात आली होती.

त्यामुळे बृहन्मुंबई महापालिकेकडून केवळ 100 इंजेक्शन मिळाले असून प्रति इंजेक्शन 1568 या दराने 100 इंजेक्शनसाठी पालिकेने 17 लाख 24 हजार मोजले आहेत. तर मे. केडीला हेल्थकेअर या कंपनीकडून 1296.96 प्रति दराने 10 हजार इंजेक्शनची खरेदी करण्यात आली असून यासाठी 1 कोटी 29 लाख 69 हजार ठाणे महापालिकेने खर्च केले आहेत. आता हे सर्व खर्चाचे प्रस्ताव प्रशासनाने सर्वसाधारण सभेच्या मान्यतेसाठी अवलोकनार्थ सादर करण्यात आले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -