घरठाणेआंबिवलीतील बाळकृष्ण पेपर मिल कारखान्यावर बंदची टांगती तलवार

आंबिवलीतील बाळकृष्ण पेपर मिल कारखान्यावर बंदची टांगती तलवार

Subscribe

उत्पादन प्रक्रिया बंद, तीनशे स्टाफ कर्मचारी बेरोजगार

विविध क्वालिटीचे कागदाचे पुठ्ठे निर्माण करणार्‍या कल्याण नजीक आंबिवली येथील बाळकृष्ण पेपर मिलला गेल्या काही महिन्यापासून घरघर लागली आहे. उत्पादन प्रक्रियेविना कारखाना सुरू असला तरी जवळजवळ 300 च्या आसपास स्टाफ मधील अधिकारी वर्गाला व्यवस्थापनाने घरचा रस्ता दाखविला आहे. परिसरातील एनआरसी पाठोपाठ बाळकृष्ण पेपर मिलच्या मालाला बाजारपेठेत योग्य भाव मिळत नसल्याने कारखाना बंद पडतो की काय? याबाबत कामगारांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

कल्याणनजीक असणार्‍या मोहने आंबिवलीत अनेक कारखाने बंद पडल्याने केवळ बाळकृष्ण पेपर मिल हा एकमेव कारखाना तग धरून मोठ्या दिमाखात उभा होता. मात्र गेल्या काही महिन्यापासून औद्योगिक बाजारपेठेत उत्पादित केलेल्या मालाला योग्य भाव मिळत नसल्याने कारखाना व्यवस्थापन आर्थिक संकटात सापडला आहे. या कारखान्यात कामगार नियमितपणे कामाला जात असून मात्र उत्पादन प्रक्रिया व्यवस्थापनाने बंद केलेली आहे. कारखान्यातील सुमारे 300 स्टाफ कर्मचार्‍यांना कामावरून काढण्यात आले असून काही अधिकार्‍यांनी राजीनामे देण्यास सुरुवात केली आहे. सध्या केवळ 25 ते 30 स्टाफ कर्मचारी कारखाना व्यवस्थापनात कार्यरत असल्याची माहिती मिळून आली आहे.
या कारखान्यात कागदापासून पुठ्ठा बनविला जात असून कायम आणि हंगामी असे मिळून 300 च्या आसपास कामगार या ठिकाणी कार्यरत आहेत. उत्पादन विना कारखाना सुरू असून कामगारांच्या हाताला कामच नसल्याने व्यवस्थापन दोन टप्प्यात वेतन अदा करीत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

- Advertisement -

कारखान्यात बनविण्यात येत असलेला मालाला बाजारपेठेत योग्य तो भाव मिळत नसल्याने व्यवस्थापनाने उत्पादन प्रक्रिया बंद करण्याचा निर्णय घेतला. यापूर्वी देखील उत्पादन प्रक्रियेत मालाच्या विक्रीत तोटा सहन करूनही उत्पादन सुरू ठेवण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. मालाचे भाव कोसळल्याने उत्पादन करणे कठीण होऊन बसले आहे.
उत्पादन प्रक्रिया विना कारखाना सुरू असला तरी भविष्यात कारखाना बंद पडणार असल्याच्या चिंतेने कामगार वर्गात एकंदरीत भीतीची परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र येत्या पाच सहा महिन्यात परिस्थिती सुधारेल अशी आशा व्यवस्थापनाकडून व्यक्त केली जात आहे. दरम्यान मोहने आंबिवली या औद्योगिक पट्ट्यात सर्वच मोठे कारखाने बंद पडत आहेत. त्यामुळे हजारोच्या संख्येने कामगार वर्ग येथे देशोधडीला लागल्याने केवळ एकमेव तग धरून राहिलेल्या बाळकृष्ण पेपर मिल या कारखानाही संकटात आहे.

–  सिद्धार्थ गायकवाड

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -