घरठाणेत्या 850 रिंग रूट बाधितांच्या पुनर्वसनापूर्वीच पालकमंत्र्यांचा सत्कार समारंभ?

त्या 850 रिंग रूट बाधितांच्या पुनर्वसनापूर्वीच पालकमंत्र्यांचा सत्कार समारंभ?

Subscribe

रिंग रूट मध्ये बाधित होणार्‍या रहिवाशांचे पुनर्वसन होण्यापूर्वीच राज्याचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या मुंबईतील हितचिंतक कार्यकर्त्यांनी बाधित होणार्‍या कल्याण जवळील अटाळी आंबिवलीतील नागरिकांकडून देसाई यांच्या सत्कार समारंभाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. संबंधित 850 बाधितांचे पात्र आणि अपात्रेविषयी अद्याप शासन दरबारी कोणताच निर्णय झालेला नसताना सत्कार समारंभाकरता येथील बाधितांकडून प्रत्येकी 2 हजार 200 जमा करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या बहुचर्चित रिंग रूट प्रकल्प गेल्या काही वर्षापासून अटाळी आंबिवलीत जैसे थे अवस्थेत पडून आहे. रिंग रूट मध्ये सुमारे साडेआठशे नागरिकांची घरे बाधित होत आहेत. रिंग रूटमध्ये अडचणी ठरल्या गेलेल्या घरांना कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने घरे रिकामी करण्याची नोटीस साधारण तीन ते चार वर्षांपूर्वी दिली होती. मात्र पुनर्वसन केल्याशिवाय घर रिकामे करणार नाही, असा निर्धार येथील बाधितांनी घेऊन मोठे जन आंदोलन उभे केले होते. यामुळे कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रशासनाला हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प अर्धवट स्थितीत सोडावा लागला होता.
साडेआठशे घरे रिंग रूटमध्ये बाधित होत असल्याने पुनर्वसनाबाबत मध्यंतरी तत्कालीन पालिका आयुक्त भाऊसाहेब दांगडे शासकीय अधिकारी तसेच अटाळी आंबिवली रहिवासी संघासमवेत ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी एक संयुक्त बैठक आयोजित करीत पालिका प्रशासनाला अगोदर बाधितांचे पुनर्वसन करण्याचे आदेश देत त्यानंतरच घरे तोडण्याचे सांगितले गेले होते.

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने अटाळी आंबिवली परिसरातील बाधित होणार्‍या घरांचा बायोमेट्रिक सर्वे केला होता. पात्र आणि अपात्र याबाबत मात्र बाधितांना अद्यापही झुलवत ठेवले गेले आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडून करण्यात आलेल्या या सर्वेत 160 घरांना बाद करण्यात आल्याची चर्चा बाधितांमध्ये ऐकवली जात असून 50 टक्के पेक्षा ज्यांची घरे रिंग रूट मध्ये बाधित होणार असतील अशांनाच पुनर्वसनात स्थान दिले जाणार असल्याची माहिती मिळून येत आहे. एकीकडे बाधितांचे पुनर्वसन शासन दरबारी तसेच महापालिकेत लोंबकळत ठेवले गेले असताना राज्याचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या निकटवर्तीय कार्यकर्त्यांनी बाधितांच्या पुनर्वसनापूर्वीच मंत्री महोदयांचा सत्कार समारंभ 30 नोव्हेंबर रोजी सावित्रीबाई फुले कला मंदिर येथे आयोजित केला आहे. या समारंभाकरता पालकमंत्र्यांच्या कार्यकर्त्यांनी प्रत्येकी 2200 जमा करण्याचा प्रकार बाधितांकडून घेण्याचा प्रकार सुरू केला आहे. या बदल्यात कार्यक्रमात अल्पोहार आणि चहा याचे कुपन देण्यात आले आहे. साडेआठशे लोकांची घरे वाचवली आणि अटाळी आंबिवली कल्याण रिंग रूट बाधितांच्या पुनर्वसनात राज्य शासनाकडून मान्यता मिळून दिल्याबद्दल शंभूराज देसाई यांचा सत्कार समारंभ होणार असल्याचे फलक येथे झळकू लागले आहेत. बाधितांच्या पुनर्वसनासंदर्भात कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने अद्याप कुठलीच भूमिका स्पष्ट केली नसल्याने येथील बाधित होणारे कुटुंब मात्र हवालदिल झाल्याचे दिसून येत आहे. या संदर्भात कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे सिटी इंजिनियर अर्जुन अहिरे यांच्याकडे पुनर्वसना संदर्भात वारंवार भ्रमणध्वनी करून विचारणा करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -