घरमुंबईप्रदीप शर्मा उपरेच

प्रदीप शर्मा उपरेच

Subscribe

शर्मांच्या उमेदवारीवरून भाजपा, आगरी सेनेत दोन गट,नालासोपार्‍यासाठी भाजप आग्रही,आगरी सेनेचा स्वबळाचा नारा

प्रदीप शर्मा यांचे नालासोपार्‍यात आगमन झाल्याबरोबरच येथील राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. भाजपच्या एका गटाने मेळावा घेऊन नालासोपारा मतदारसंघ भाजपला सोडण्याची मागणी केली. तर आगरी सेनेतील एका गटाने शर्मा यांच्या उमेदवारीलाच थेट विरोध करीत स्वबळाचा नारा दिला आहे. शर्मा यांची उमेदवारी अधिकृतपणे जाहीर होण्यापूर्वीच भाजप आणि आगरी सेनेत दुही माजली आहे.

युतीची अद्याप घोषणा झालेली नाही. मात्र, सेनेने प्रदीप शर्मा यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले आहे. रविवारपासून शर्मांनी नालासोपारा मतदारसंघात प्रचाराला सुरुवात केली आहे. त्यानंतर नालासोपार्‍यातील वातावरण तापू लागले आहे. शर्मा यांची उमेदवारी जाहीर झाली नसली तर भाजपाचे जिल्हाध्यक्ष सुभाष साटम यांनी आपल्या समर्थकांसह शर्मा यांना पाठिंबा दिला आहे. दुसरीकडे, साटम यांचे पक्षातील विरोधक असलेल्या जिल्हा सरचिटणीस राजन नाईक यांच्या गटाने मात्र शर्मा यांची एन्ट्री झाली त्याच दिवशी नालासोपार्‍यात मेळावा घेऊन शक्तीप्रदर्शन केले. भाजपच्या अस्तित्वासाठी नालासोपार्‍याची जागा भाजपलाच सोडली पाहिजे. तसेच उमेदवारीही भाजपच्या स्थानिक माणसालाच दिली पाहिजे, अशी मागणी करीत तसा ठरावही संमत केला. या मेळाव्याशी भाजपचा काहीही संबंध नसल्याचे सांगत साटम यांनी विरोधाचा सूर लावला आहे.

- Advertisement -

याआधी डहाणू नगराध्यक्ष भरत राजपूत यांनीही नालासोपारा मतदारसंघ भाजपला सोडून ती जागा मला मिळायला हवी अशी मागणी केली होती. त्यानंतर राजपूत नालासोपार्‍यात भाजपच्या विविध कार्यक्रमांना हजेरी लावीत होते. तेव्हाही साटम यांनी त्यांना पाठिंबा दिला होता. त्यावेळी साटमविरोधी गटाने कोअर कमिटीची बैठक घेऊन स्थानिक उमेदवारच द्या, अशी मागणी करीत राजपूत यांना विरोध केला होता. यातून भाजपमधील अंतर्गत गटबाजी आता चव्हाट्यावर आली आहे.

दुसरीकडे, आगरी सेनेचे जिल्हाध्यक्ष जनार्दन पाटील यांनी शर्मा यांना पाठिंबा दिल्यानंतर आगरी सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष कैलास पाटील यांनी त्याला कडाडून विरोध केला आहे. नालासोपार्‍यात उपर्‍या उमेदवाराला आगरी सेना पाठिंबा देणार नाही. याठिकाणी आगरीच उमेदवार असेल. त्यासाठी स्वबळावर निवडणूक लढली जाईल, असे पाटील यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे शर्मा यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याआधीच भाजप आणि आगरी सेनेतील गटातटांच्या राजकारणाचा फटका बसू लागला आहे.

- Advertisement -

रविवारी झालेला मेळाव्याशी पक्षाचा काहीही संंबंध नाही. शर्मा यांची उमेदवारी अद्याप जाहीर झालेली नाही. पण, शर्मांसारखा सक्षम उमेदवारच ठाकूरांचा पराभव करू शकतो. याच भावनेतून आमचा त्यांना पाठिंबा आहे. युती जो निर्णय घेईल त्यानुसारच काम केले जाईल.
-सुभाष साटम, जिल्हाध्यक्ष (भाजप)

वसईत भाजपच्या अस्तित्वासाठी नालासोपारा मतदारसंघातून भाजपने निवडणूक लढवली पाहिजे. आणि त्यासाठी स्थानिक उमेदवारच दिला पाहिजे. अशा कार्यकर्त्यांच्या भावना आहेत.
-मनोज बारोट, नालासोपारा शहर सरचिटणीस ( भाजप)

शर्मा यांची उमेदवारी अद्याप जाहीर झालेली नाही. आगरी सेना म्हणून मी त्यांना पाठिंबा दिलेला नाही. विरार शहरात प्रथमच आलेल्या शर्मा यांनी माझ्या कार्यालयाला भेट दिली. त्यावेळी त्यांचे स्वागत केले. संघटना ज्याला पाठिंबा देईल, त्या उमेदवाराचे काम करणार.
-जनार्दन पाटील, जिल्हाध्यक्ष (आगरी सेना)

आगरी सेना विधानसभा निवडणूक स्वबळावर लढणार आहे. आगरी सेनेचा शिवसेना अथवा शर्मांशी काही संबंध नाही. आगरी सेनेच्या नावावर कुणी आपली पाठिंबा शर्मा यांना देत असेल तर तो त्याचा स्वतःच्या आर्थिक व राजकीय स्वार्थासाठी घेतलेला वेैयक्तिक निर्णय आहे. उपर्‍या उमेदवाराविरोधात आम्ही प्राणपणाने लढू आणि आपल्या हक्काचा भूमीपूत्र आमदार निवडून आणू.
-कैलास पाटील, प्रदेश उपाध्यक्ष (आगरी सेना)

प्रदीप शर्मा उपरेच
Shashi karpehttps://www.mymahanagar.com/author/shashi-karpe/
गेली २५ वर्षे मुंबईसह ठाणे आणि पालघर जिल्ह्यात पत्रकारिता. राजकीय, सामाजिक विषयांवर लिखाण. वृत्तपत्र क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -