घरमहाराष्ट्रराज्यात पोलिटिकल ट्वीस्ट? आता शरद पवार-सोनिया गांधी भेट होणार!

राज्यात पोलिटिकल ट्वीस्ट? आता शरद पवार-सोनिया गांधी भेट होणार!

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार रविवारी दिल्लीत सोनिया गांधींची भेट घेणार आहेत. या भेटीमध्ये राज्यातल्या राजकीय स्थितीवर चर्चा होण्याची शक्यता आहे.

राज्यातल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल २४ ऑक्टोबर रोजी लागले. शिवसेना-भाजप महायुतीला जनतेनं विजयाचा कौल देखील दिला. पण आठवडा उलटून गेल्यानंतर देखील कुणीही सत्तास्थापनेचा दावा केलेला नाही. उलटपक्षी राज्यात दररोज सत्तास्थापनेच्या या सारीपाटावर नवनवे ट्वीस्ट येत आहेत. कधी शिवसेना मुख्यमंत्रीपदाशिवाय चर्चा नाही असं म्हणते, तर कधी मुख्यमंत्री मीच मुख्यमंत्री होणार असं हट्टाने म्हणतात. कधी काँग्रेस पाठिंब्याचा प्रस्ताव आला तर पक्षश्रेष्ठींची चर्चा करू म्हणते, तर कधी शरद पवार शिवसेनेला पाठिंब्याचा प्रश्नच येत नाही असं ठामपणे सांगतात. पण या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आता एक नवा पोलिटिकल ट्वीस्ट आकार घेऊ लागला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत!

भाजप आणि शिवसेनेमध्ये मुख्यमंत्रीपदाचा तोडगा निघत नसल्यामुळे राज्यात युतीला बहुमत मिळून देखील त्रिशंकू निकालांसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे आता सर्वाधिक जागा जिंकलेल्या भाजपशिवाय सगळेच पक्ष किंगमेकर झाले आहेत. कुणीही कुणासोबतही जाऊन सरकार स्थापन करण्याची शक्यता आता सगळ्यांना वाटू लागली आहे. शुक्रवारी काँग्रेसच्या राज्यातल्या नेतेमंडळींनी दिल्लीला जाऊन सोनिया गांधींची भेट घेतली आणि त्यांच्याशी शिवसेनेला पाठिंब्यासंदर्भात चर्चा केली. मात्र, या बैठकीत काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी वेट अॅण्ड वॉचचीच भूमिका घेतल्याचं समोर आल्यानंतर आता थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारच सोनिया गांधींची भेट घेणार आहेत. ऐन सुट्टीच्या दिवशी म्हणजेच रविवारी शरद पवार दिल्लीला जाऊन सोनिया गांधींची भेट घेणार असून या भेटीमध्ये राज्यातल्या सत्तास्थापनेच्या नाट्यामध्ये विरोधकांनी नक्की कोणती भूमिका घ्यावी? याविषयी चर्चा होण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

हेही वाचा – अखेर सत्तेसाठी मुख्यंमत्रीच घेणार पुढाकार? मातोश्रीवरही जाण्याची शक्यता!

बहुमत देऊनही राज्यात त्रिशंकू!

भाजप किंवा शिवसेना, या दोघांचंही संख्याबळ स्वतंत्रपणे सरकार स्थापन करण्याइतपत नाही. त्यांना काँग्रेस किंवा राष्ट्रवादी यापैकी किमान एका पक्षाची मदत सरकार स्थापनेसाठी घ्यावी लागेल. मात्र, स्थिर सरकारसाठी हे दोन्ही पक्षच एकमेकांसोबत जाणं जास्त उपयुक्त ठरेल असं राजकीय जाणकारांचं मत आहे. पण शिवसेनेची मुख्यमंत्रीपदाची मागणी मान्य होत नसल्यामुळे शिवसेना भाजपला लांब ठेवत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या बाहेरून पाठिंब्यावर स्वबळावर सत्ता स्थापन करण्याची शक्यता निर्माण झाली आहे. संजय राऊत यांनी सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ‘शिवसेना शेवटच्या क्षणापर्यंत युतीसाठीच प्रयत्न करेल’, असं स्पष्ट जरी केलं असलं, तरी शरद पवारासारखा मुरब्बी राजकारणी आणि सोनिया गांधींसारखं काँग्रेसचं धोरणी नेतृत्व यांच्या चर्चेमधून राज्यात नवा पोलिटिकल ट्वीस्ट येण्याची शक्यता अजिबात नाकारता येणार नाही!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -