घरमहाराष्ट्रसत्तास्थापनेचा दावा करण्याची हिंमत करू नये, संजय राऊतांचा सल्ला!

सत्तास्थापनेचा दावा करण्याची हिंमत करू नये, संजय राऊतांचा सल्ला!

Subscribe

‘महाराष्ट्राच्या जनतेला शिवसेनेचा मुख्यमंत्री पाहायचा आहे. जर उद्धव ठाकरे म्हणाले आहेत की राज्याचा मुख्यमंत्री शिवसेनेचा होणार, तर मी लिहून देतो की मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार. आम्ही जर ठरवलं, तर बहुमत सिद्ध करून आमचा मुख्यमंत्री होऊ शकतो. त्यामुळे ज्यांच्याकडे बहुमत नाही, त्यांनी सत्तास्थापनेचा दावा करण्याची हिंमत करू नये. भाजप फार मोठी माणसं आहेत, आम्ही त्यांना काय अल्टिमेटम देणार. आम्ही साधा पक्ष आहोत. त्यांचा पक्ष आंतरराष्ट्रीय आहे. जगभरात त्यांचे कार्यकर्ते, अनुयायी आहेत. आम्ही फक्त महाराष्ट्राबद्दल बोलतो’, अशा शब्दांत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपला खोचक टोमणा मारला आहे. राज्यात सध्या सुरू असलेल्या सत्तावाटपाच्या गोंधळासंदर्भात संजय राऊत यांनी सलग दुसऱ्या दिवशी पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेच्या मुख्यमंत्रीपदाबाबत सूचक वक्तव्य केलं आहे.

- Advertisement -

‘फडणवीसांनी आजही शपथ घ्यायला आमची हरकत नाही’

संजय राऊत यांनी यावेळी बोलताना भाजपला चांगलाच टोमणा लगावला. भाजपला तुम्ही अल्टिमेटम दिला आहे का? या पत्रकारांच्या प्रश्नावर बोलताना संजय राऊत म्हणाले, ‘आम्ही भाजपला अल्टिमेटम देणारे कोण? भाजप हा आंतरराष्ट्रीय पक्ष आहे. जगभरात त्यांचे कार्यकर्ते-अनुयायी आहेत. आमचा साधा पक्ष आहे. आम्ही राज्याबद्दलच बोलतो’, असं ते म्हणाले. तसेच, भाजपच्या बहुमताच्या दाव्यांचा देखील त्यांनी यावेळी समाचार घेतला. ‘शिवसेना आणि भाजपमध्ये युती आहे. हे दोन्ही पक्ष युतीत असताना त्यांनी सत्तास्थापनेसंदर्भात चर्चा का सुरू केली नाही? आणि जर त्यांच्याकडे बहुमत आहे, तर मग शपथविधीसाठी इतके दिवस का लावत आहेत. देवेंद्र फडणवीसांनी आजही मुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यायला आमची हरकत नाही’, असं संजय राऊत यावेळी म्हणाले.

‘आम्ही ठरवलं तर शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल’

यावेळी संजय राऊत यांनी शिवसेनेच्या मुख्यमंत्रीपदाच्या मागणीचा पुनरुच्चार केला. ‘आम्ही जर ठरवलं, तर आज सत्तास्थापनेचा दावा करून आमचा मुख्यमंत्री आणि शिवसेनेचं सरकार स्थापन करू शकू. आणि जर उद्धव ठाकरेंनी सांगितलं आहे की शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल, तर मी लिहून देतो की शिवसेनेचाच मुख्यमंत्री होईल’, असा ठाम विश्वास राऊत यांनी यावेळी व्यक्त केला.

- Advertisement -

हेही वाचा – भाजपकडे बहुमत असेल, तर खुशाल सत्ता स्थापन करावी-संजय राऊत

म्हणे ‘त्या’ ट्वीटमध्ये भाजपचा उल्लेख नाही’!

दरम्यान, यावेळी बोलताना संजय राऊत यांनी त्यांच्या ‘त्या’ ट्वीटवर देखील खुलासा केला. ‘साहिब, मत पालिए अहंकार को इतना, वक्त के सागर में कई सिकंदर डूब गए..!’ असं ट्वीट संजय राऊत यांनी आज सकाळी केलं होतं. मात्र, ‘या ट्वीटचा आणि भाजपचा काहीही संबंध नाही, मी ट्वीटमध्ये भाजपचा उल्लेख केलेला नाही’, असं म्हणत संजय राऊत यांनी थेट स्पष्टीकरण देणं टाळलं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -