‘बिग बास्केट’वर सायबर हल्ला; दोन कोटी भारतीयांची खासगी माहिती विक्रीला

चीनी गुंतवणूक असलेल्या ‘बिग बास्केट’ या ऑनलाईन किराणा माल विकणाऱ्या कंपनीवर मोठा सायबर हल्ला झाला आहे. तब्बल दोन कोटी भारतीय ग्राहकांची माहिती चोरीला गेली आहे. एवढेच नव्हे तर ही माहिती डार्कवेबवर ३० लाख रुपयांना विकली जात आहे. अमेरिकन सायबर सिक्युरिटी इंटेलिजन्स फर्म ‘सायबल इंक’ने याबाबतचा खुलासा केला आहे.

सायबल इंकने दिलेल्या माहितीनुसार, ग्राहकांची नावे, ई-मेल आयडी, पासवर्ड, पिन, मोबाईल क्रमांक, पत्ता, जन्मतारीख, आयपी Address आणि ठिकाणे आदी संपूर्ण माहिती चोरीली गेली आहे. बंगळुरूस्थित असलेल्या बिग बास्केट कंपनीने शहरातील सायबर क्राईम सेलमध्ये यासंदर्भात तक्रार दाखल केली असून कंपनी माहिती चोरल्याच्या दाव्याची पडताळणी करत आहे. तसेच माहिती चोरीला कशी गेली याचा अभ्यास करत आहे.

माहिती चोरीला गेल्यानंतर बिग बास्केटने स्पष्टीकरण दिले आहे. आम्ही ग्राहकांची खासगी माहिती आणि गोपनियतेला प्राधान्य देतो. ग्राहकांचा फायनान्शिअल डेटा आम्ही स्टोअर करत नाही, ज्यामध्ये क्रेडिट कार्ड्सचे नंबर, पीनकोड वैगरेंचा समावेश असतो. आम्ही खात्री देतो की ग्राहकांची फायनान्शिअल माहिती सुरक्षित आहे, असे बिग बास्केटने म्हटले आहे.