बिरवाडीतील नाले झाले कचरा कुंड्या!

प्रदूषणाकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष

Mumbai

तालुक्यातील बिरवाडी या श्रीमंत ग्रामपंचायत हद्दीतील नाले कचर्‍याने व्यापले असून, चिकन आणि मटण विक्रेत्यांकडून देखील त्यांचा कचरा नाल्यात टाकला जात असल्याने शेजारील बंधारा प्रदूषित होत आहे. या बंधार्‍यातील पाणी पिण्यासाठी वापरले जात असताना याकडे ग्रामपंचायतीचे मात्र अक्षम्य दुर्लक्ष झालेले दिसते.

औद्योगिक क्षेत्रामुळे बिरवाडी ग्रामपंचायतीला सुगीचे दिवस आले. गावची लोकसंख्या वाढत जाऊन ती २०२० पर्यंत ८ हजारावर पोहोचली आहे. परिसरात इमारतींचे जाळे वाढत गेले. बाजारपेठेत बदल झाला आणि परिसरातील नागरिकांना बाजारपेठ उपलब्ध झाली. वाढती लोकसंख्या पाहता ग्रामपंचायतीला मात्र सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात तितकेसे यश आलेले नाही. नियोजनाच्या अभावामुळे कचरा, सांडपाणी व्यवस्थापन आजही वार्‍यावर आहे. त्यामुळे जागा मिळेल तेथे कचरा टाकण्याकडे नागरिकांचा कल वाढत गेला आहे. कचरा थेट शेजारील नाल्यात जाऊन पडत आहे. परिणामी नाले देखील तुंबले आहेत.

गावातील मच्छी मार्केटमधील चिकन आणि मटण विक्रेते त्यांचा कचरा देखील नाल्याजवळ किंवा थेट नाल्यात टाकून देत आहेत. नाल्यात पडणार्‍या कचर्‍यात अधिक समावेश हा प्लास्टिकचा आहे. हे नाले शेजारील कोल्हापुरी पद्धतीच्या बंधार्‍याला जाऊन मिळत असल्यामुळे पाणी दूषित होण्याचा धोका गंभीर होत चालला आहे. गावाजवळून वाहत जाणार्‍या काळ नदीवर कोल्हापुरी पद्धतीचा हा बंधारा बांधण्यात आला आहे. त्याचा सिंचन आणि पिण्याचे पाणी असा दुहेरी वापर केला जात असून, पावसाळ्यानंतर नदीचे पाणी कमी होत झाले की झडपा लावून पाणी अडवले जाते. यामुळे बंधार्‍यातील पाणी साचत जावून बिरवाडीमधील नाल्यापर्यंत पोहोचते.

बंधारा भरल्यामुळे नाल्यातील पाणी देखील तुंबून राहते. यामुळे साचलेला कचरा याच ठिकाणी पाण्यावर पडून राहतो. या प्लास्टिक कचर्‍यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे. बिरवाडीमधील नागरिकांचे सांडपाणी याच नाल्यातून बंधार्‍याला जाऊन मिळत आहे. बंधार्‍यातील पाणी औद्योगिक क्षेत्रातही पिण्याकरिता वापरले जाते. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने यापूर्वी तालुक्यातील काही ग्रामपंचायती आणि शहराला घनकचरा, तसेच सांडपाणी व्यवस्थापनाबाबत नोटीस बाजवली आहे. मंडळाच्या नियमाप्रमाणे सांडपाणी आणि कचरा नदीमध्ये टाकणे किंवा येणे हे पर्यावरणास बाधक असल्याने याबाबत कार्यवाही केली जावी, अशा प्रकारच्या सूचना करण्यात आल्या होत्या. मात्र याकडे ग्रामपंचायत आणि शहरानेदेखील दुर्लक्ष केले आहे. या ठिकाणी मासे मृत पावल्याच्या घटना देखील यापूर्वी घडल्या होत्या.

बिरवाडी ग्रामपंचायतीला याबाबत प्रतिवर्षी नोटीस बजावली जाते. सांडपाणी थेट नाल्यात जावून पाणी दूषित होत आहे. याकरिता सांडपाणी व्यवस्थापन करणे आवश्यक आहे.
-जयदीप कुंभार, क्षेत्र अधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळ, महाड