२५ वर्षानंतर फरार दरोडेखोराला अटक

Mumbai
अटक

९० च्या दशकात मुंबईत दरोड्याच्या गुन्ह्यातून जामिनावर बाहेर पडून फरार झालेल्या एका सराईत दरोडेखोराला मुंबई पोलिसांनी तब्बल २५ वर्षांनी सातार्‍यातून अटक केली आहे. मागील २५ वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणारा हा दरोडेखोर सध्या सातार्‍यातील राजकारणात सक्रिय होता, अशी माहिती समोर येत आहे. त्याला अटक होऊ नये म्हणून स्थानिक राजकीय पुढार्‍यांनी हस्तक्षेप केला होता, मात्र मुंबई पोलिसांनी त्याला स्थनिक पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेऊन मुंबईत आणण्यात आले आहे.

संजय बोधे (५१) असे अटक करण्यात आलेल्या दरोडेखोराचे नाव आहे. संजय बोधे याच्यावर एकट्या माटुंग्यात ६ दरोड्याचे गुन्हे दाखल आहेत. संपूर्ण मुंबईत त्याच्यावर बरेच गुन्हे दाखल असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ९०च्या दशकात जोगेश्वरी येथे राहणारा संजय बोधे याची दरोडेखोरांची टोळी मुंबईत सक्रिय होती. या टोळीने १९९० च्या दशकात मुंबईत अनेक ठिकाणी दरोडे टाकले होते. दरम्यान, या टोळीतील काही सदस्यांना पोलिसांनी अटक केली होती. दरोडेखोर संजय बोधे त्यालादेखील १९९१ मध्ये अटक करण्यात आली होती, मात्र न्यायालयाने जामिनावर सोडताच संजय बोधे हा फरार झाला होता. त्याने न्यायालयात येणे बंद केल्यानंतर न्यायालयाने त्याला अनेक वेळा समन्सदेखील पाठवले होते. बोधे जोगेश्वरी येथील घर सोडून गेल्यानंतर पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला.

बोधेचा शोध घेण्यासाठी पोलीस त्याच्या गावी सातारा जिल्ह्यातील दुधीगाव या ठिकाणीदेखील गेले, पण तो तिथे मिळाला नाही. अखेर त्याला अटक करण्याची जबाबदारी माटुंगा पोलिसांवर सोपवण्यात आली. माटुंगा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत भोईटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुयोग अमृतकर, पोलीस शिपाई, सुनील करपे आणि मंगेश जराड या पथकाने फरार दरोडेखोर संजय बोधे याची माहिती काढण्यास सुरुवात केली असता तो सातार्‍यातील श्री क्षेत्र माउली या ठिकाणी एका बंगल्यात राहत असल्याची माहिती मिळाली. पोलीस पथक बुधवारी पहाटे स्थानिक पोलिसांच्या मदतीने श्री क्षेत्र माउली येथे बोधे याच्या बंगल्यावर पोहचली. मात्र त्याने पोलीस आल्याचे बघून स्थनिक राजकारण्यांना फोन केले, अनेकांनी पोलिसांना विरोधही करण्याचा प्रयत्न केला. मात्र मुंबई पोलिसांनी त्यांची समजूत काढून बोधे याला ताब्यात घेऊन मुंबईत आणले. माटुंगा पोलिसांनी बुधवारी त्याला स्थनिक न्यायालयात हजर केले असता त्याला १८ मार्च प्रयत्न न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

पोलीस सूत्रांच्या म्हणण्यानुसार, संजय बोधे याने पोलीस चकमकीत ठार मारतील म्हणून तो गेल्या २५ वर्षांपासून सातारा येथे लपून बसला होता. तो आपले गाव सोडून सातार्‍यातील श्री क्षेत्र माउली गाव या ठिकाणी एका बंगल्यात कुटुंबासह राहत होता. त्यानंतर त्याने गुन्हेगारी सोडून तो राजकारणात सक्रिय झाला होता, अशी माहिती बोधे याने खुद्द पोलिसांना दिली असल्याचे समजते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here