बनावट कागदपत्रांच्या आधारे फसवणूक

फसवणुकीप्रकरणी एमबीए पदवीधर भामट्याला कोठडी

Mumbai
आरोपी सौद खलिफा दळवी

साकिनाका येथील चांदीवली परिसरात भाड्याने घर घेताना दिलेल्या कागदपत्रांचा गैरवापर करुन एका एमबीए पदवीधर भामट्याने दिडशेहून अधिक बँक तसेच वित्तसंस्थेकडे कर्जासाठी अर्ज करुन त्यांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी फसवणुकीच्या गुन्ह्यांत सौद खलिफा दळवी या भामट्याला साकिनाका पोलिसांनी अटक केली असून फसवणुकीच्या याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत आहे. तक्रारदाराच्या बँक खात्यातून कर्जाचे हप्ते जात असल्याचे निदर्शनास येताच हा संपूर्ण घोटाळा उघडकीस आल्याचे पोलिसांनी सांगितले.

यातील तक्रारदार मूळचे हैद्राबादचे रहिवाशी आहेत. काही महिन्यांपूर्वी, साकिनाका येथील चांदीवली, नाहक अमृत शक्ती अपार्टमेंटमध्ये एक फ्लॅट भाड्याने देण्याची जाहिरात त्यांच्या वाचण्यात आली होती. या जाहिरातीवरुन त्यांनी सौदला संपर्क साधला होता. त्याने डिपॉझिट म्हणून त्यांच्याकडून दोन लाख रुपये घेतले, तसेच त्यांच्याकडून पॅनकार्ड, आधारकार्ड, बँकेचे स्टेटमेंट तसेच इतर कागदपत्रे घेतली होती. या कागदपत्रांचा वापर करून विविध बँकेत क्रेडिट कार्ड आणि कर्जासाठी अर्ज केले होते. ऑगस्ट 2018 ते फेब्रुवारी 2019 या कालावधीत सौदने विविध बँक आणि वित्तसंस्थेकडे दीडशेहून अधिक अर्ज केले होते. या कागदपत्रांच्या आधारे त्याला काही बँकेतून क्रेडिट कार्ड मिळाले होते.

या कार्डवरुन त्याने लाखो रुपयांची खरेदी केली होती. फेब्रुवारी महिन्यांत तक्रारदारांच्या बँक खात्यातून पाच आणि तेरा हजार रुपयांच्या कर्जाच्या हप्त्याची रक्कम कमी झाली होती. त्यांनी कुठल्याही बँकेतून कुठलेही कर्ज घेतले नव्हते, त्यामुळे त्यांच्या बँक खात्यातून कर्जाचे हप्त्याची रक्कम कशी कमी झाली याबाबत त्यांनी शहानिशा सुरु केली होती.

कर्जाचे ईएमआय कापल्यानंतर हा संपूर्ण प्रकार उजेडात आला होता. या घटनेनंतर तक्रारदाराने साकिनाका पोलीस ठाण्यात धाव घेऊन तिथे उपस्थित पोलिसांना हा प्रकार सांगितला. त्यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी बोगस दस्तावेज बनवून फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला होता. या गुन्ह्यांचा तपास सुरु असताना पोलीस उपायुक्त नवीनचंद्र रेड्डी, एसीपी मिलिंद खेतले यांच्या मार्गदर्शनाखाली साकिनाका पोलिसांनी तीन दिवसांपूर्वी साकिनाका येथून सौद खलिफा दळवी याला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here