२००० अश्लील मॅसेज पाठवून तरुणीचा विनयभंग

जोगेश्वरी येथील घटना; ऑटोमोबाईल इंजिनिअरला अटक

Mumbai
arrested
Arrest

अश्लील मॅसेज पाठवून एका 19 वर्षांच्या कॉलेज तरुणीचा विनयभंग झाल्याची घटना जोगेश्वरी परिसरात घडली. याप्रकरणी सिराज रजीउद्दीन सिद्धीकी असे या 22 वर्षांच्या तरुणाला मेघवाडी पोलिसांनी अटक केली आहे. सिराज हा ऑटोमोबाईल इंजिनिअर असून त्याने बोगस इस्टाग्रामवर तिला दोन हजार मॅसेज पाठविल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. अटकेनंतर त्याला सोमवारी अंधेरीतील स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले होते, यावेळी त्याची जामिनावर सुटका करण्यात आली आहे.

तक्रारदार तरुणी ही जोगेश्वरी परिसरात राहत असून ती कॉलेजमध्ये इंजिनिअरचे शिक्षण घेत आहे. दोन वर्षांपूर्वी तिची भायखळा येथे राहणार्‍या सिराजशी ओळख झाली होती. या ओळखीनंतर ते दोघेही चांगले मित्र झाले होते. सोशल मिडीयाच्या माध्यमातून ते दोघेही एकमेकांच्या संपर्कात होते. काही वेळा तो तिला भेटण्यासाठी येत होता. याच दरम्यान त्याने तिला प्रपोज केले होते, मात्र तिने तिचा प्रियकर असल्याने त्याला नकार दिला होता. त्याचा सिराजला प्रचंड राग आला होता. तिला त्रास देण्याच्या उद्देशाने त्याने बोगस मेलवरुन इस्ट्राग्रामवर तिचे बोगस अकाऊंट तयार केले होते. त्यात त्याने दुसर्‍याच व्यक्तीचा फोटो अपलोड केला होता. त्यानंतर तो याच अकाऊंटवरुन तिला अश्लील मॅसेज पाठवित होता.

तब्बल दोन हजार अश्लिल मॅसेज
ऑक्टोबर 2017 ते डिसेंबर 2018 या कालावधीत त्याने तिला सुमारे दोन हजार अश्लील मॅसेज पाठविले होते, त्यात त्याने तिच्या चारित्र्यावर अश्लील शेरेबाजी करुन तिच्यावर टिका केली होती. या मॅसेजनंतर तिने मेघवाडी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगून अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची सहाय्यक पोलीस आयुक्त ज्ञानेश देवडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदेश कालापाड यांनी गंभीर दखल घेत पोलिसांना तपासाचे आदेश दिले होते.

बोगस अकाऊंट उघडले
या आदेशानंतर सायबर सेलचे पोलीस उपनिरीक्षक बालाजी सानप, निलेश पाटील, विशाल पवार यांनी तपासाला सुरुवात केली होती. तांत्रिक माहितीवरुन पोलिसांनी सिराजला चौकशीसाठी ताब्यात घेतले, त्याची कसून चौकशी केल्यानंतर त्याने हा गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यानेच बोगस मेलवरुन इस्ट्राग्रामवर अकाऊंड उघडून तिला अश्लील मॅसेज पाठविल्याची कबुली दिली. त्यानंतर त्याला पोलिसांनी भादवीसह आयटी कलमांतर्गत पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला सोमवारी न्यायालयाने जामिनावर सोडून दिले आहे. तपासात सिराजने तक्रारदार तरुणीला फोन करण्यासाठी दुसर्‍या मोबाईलचा वापर केल्याचे उघडकीस आले. सिराज ऑटोमोबाईल इंजिनिअर असून तो सध्या नोकरीच्या शोधात आहे. मात्र त्याच्याविरुद्ध हा गुन्हा दाखल झाल्याने त्याला नोकरीसाठी आता अनेक अडचणी येणार असल्याचे बोलले जाते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here