मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या बैठकीत आदित्य ठाकरे कसे?

मुख्यमंत्र्यांच्या बैठकांतील उपस्थितीवर प्रश्नचिन्ह

Mumbai

मुंबईत लवकरच परदेशातील ‘सिम ओशन वर्ल्ड’च्या धर्तीवर जागतिक दर्जाचे मत्स्यालय उभे राहण्याची शक्यता आहे. यासंबंधी पर्यटन विभागाच्या अधिकार्‍यांसोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची एक बैठक नुकतीच पार पडली. विशेष म्हणजे, या बैठकीला उद्धव ठाकरे यांचे पुत्र आणि आमदार आदित्य ठाकरेही उपस्थित होते. या बैठकीबद्दल माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालय कार्यालयाकडून ट्विटद्वारे माहिती देण्यात आली. या फोटोंमध्ये मुख्यमंत्र्यांच्या बाजुच्या खुर्चीवर आदित्य ठाकरेही दिसत आहेत. त्यानंतर एका नव्या वादाला तोंड फुटले आहे. सचिवस्तरीय बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत आमदार आदित्य ठाकरेंची अनेकदा उपस्थित या वादाचा मुख्य विषय आहे.

एखाद्या विषयाबद्दल एखाद्या आमदाराने काही सूचना सुचवल्या असतील किंवा मागणी केली असेल तर त्या आमदारांना बैठकांना बोलावले जाते. या बैठकीसाठी युवासेना सचिव वरुण सरदेसाईही आदित्य ठाकरे यांच्या रांगेत बसलेले दिसत आहेत. त्यांच्यासोबत युवा सेनेचे पदाधिकारी या बैठकीला हजर होते. देश-विदेशातील पर्यटकांना आकर्षित करण्याच्यादृष्टीने बँकॉक इथल्या ‘सिम ओशन वर्ल्ड’च्या धर्तीवर मुंबईत जागतिक दर्जाचे मत्स्यालय उभारण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पर्यटन विभागाला दिल्या, असे माहिती व जनसंपर्क महासंचालनालय (डीजीआयपीआर) कार्यालयाकडून ट्विट करण्यात आले आहे. दरम्यान, यासंदर्भात वरुण सरदेसाई यांच्याशी संपर्क साधला असता, जे वृत्त चालविले जात आहेत, ते चुकीचे असल्याचे स्पष्टीकरण ‘आपलं महानगर’शी बोलताना त्यांनी दिले.