ठाण्यात हायप्रोफाईल डेंग्यू ; १६५ संशयितांपैकी ८ जणांना निदान 

गेल्या साडेसहा महिन्यात ठाणे शहरात डेंग्यूचे १६५ संशयित रुग्ण आढळले आहेत.

Thane
dengue in Mumbai
प्रातिनिधिक फोटो

गेल्या साडेसहा महिन्यात ठाणे शहरात डेंग्यूचे १६५ संशयित रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी ८ रुग्णांना डेंग्यू झाल्याचे तपासणीत निदान झाले आहे. विशेष म्हणजे झोपडपट्टी, चाळी आणि इमारतीपेक्षा ठाण्याच्या हायप्रोफाईल सोसायटीत डेंग्यूच्या रुग्ण अधिक आढळून आल्याची माहिती पालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागातून मिळाली आहे. त्यामुळे गोरगरीबांच्या वस्त्यांनाच आजारांची ठिकाणं मानणार्‍यांनाही चपराक बसली आहे.

आतापर्यंत पालिकेने तब्बल ४६ हजार २२२ घरांमध्ये कीटकनाशक फवारणी केली आहे. ज्या ठिकाणी डेंग्यूचे संशयित रुग्ण आढळले त्या परिसराची तपासणी करून फवारणी केली आहे. शहरातील वसंत विहार, सिद्धचल कॉम्प्लेक्स, लोढा कॉम्प्लेक्स, कल्पतरू, घोडबंदर रोड, हिरानंदानी इस्टेट या परिसरात अधिक रुग्ण आढळून आल्याचेही पालिकेकडून सांगण्यात आले. ठाण्यात डेंग्यू आणि मलेरियाच्या जनजागृतीसाठी मे महिन्यापासून पालिकेने सुरुवात केली. यामध्ये गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये ५२ हजार ६५१ मराठी तर १९ हजार ३९ हिंदी पत्रके वाटून आवाहन करण्यात आले. टायरची दुकाने असलेल्या १३६ तर नवीन इमारतींची कामे सुरू असलेल्या ४९ बिल्डरांना सतर्कते बाबत नोटिसा बजावण्यात आल्यात. तसेच ४ हजार ९९१ गृहनिर्माण सोसायटीमध्ये सार्वजनिक उपाययोजना संदर्भात माहिती देण्यात आली. ६५५ सार्वजनिक टॉयलेटच्या व्हेन पाईपला जाळी बसवण्यात आली. तर शहरातील रुग्णांची माहिती पालिकेला देण्यासाठी ११८ खाजगी रुग्णालयांना पत्र देण्यात आल्याची माहिती पालिकेने दिली.

रुग्णांची संख्या  (१ जानेवारी ते १२ जुलै २०१८)

डेंगू – १६५ (संशयित) – ८ रुग्णांचे निदान
डीसेन्ट्री – १०८
डायरिया – ५९१
मलेरिया – ३०१
कावीळ – १४
टायफाईड – ४०
लेप्टो – ०१
कॉलरा – ०
गॅस्ट्रो – ०
स्वाईन फ्लू – ०
चिकुन गुनिया – ०

या आहेत हायप्रोफाइल सोसायट्या

वसंत विहार, सिद्धचल कॉम्प्लेक्स, लोढा कॉम्प्लेक्स, कल्पतरू, घोडबंदर रोड, हिरानंदानी इस्टेट आदी.

महापालिका क्षेत्रात कुठलाही साथरोग नाही. घाबरण्याची परिस्थिती नाही. पावसाचे पाणी साचून राहिल्याने डेंग्यूच्या अळ्या होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मोठमोठ्या गृहसंकुल सोसायटीत डेंग्यूचे संशयित रुग्ण आढळले आहेत. पालिकेने बिल्डर, गॅरेज दुकान, गृहनिर्माण सोसायटी यांना नोटीस देऊन स्वच्छता, सांडपाण्याविषयी आवाहनही केले आहे. पालिकेकडून सतर्कता बाळगली जात असून, नागरिकांनीही दक्षता घ्यावी.- डॉ. आर.टी. केंद्रे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी, ठामपा