घरक्रीडायुएईमध्ये आयपीएलच्या आयोजनास बीसीसीआयला सरकारची परवानगी!

युएईमध्ये आयपीएलच्या आयोजनास बीसीसीआयला सरकारची परवानगी!

Subscribe

भारताबाहेर ही स्पर्धा आयोजित करण्यासाठी बीसीसीआयला सरकारकडून हिरवा कंदील मिळणे अनिवार्य होते.

यंदा इंडियन प्रीमियर लीग (IPL) ही जगातील सर्वात मोठी टी-२० स्पर्धा युएईमध्ये आयोजित करण्यास भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (BCCI) भारत सरकारने परवानगी दिल्याची माहिती मिळत आहे. भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव अजूनही फारसा कमी झालेला नाही. त्यामुळे बीसीसीआयला आयपीएलचा यंदाचा मोसम परदेशात घेणे भाग पडले. मात्र, भारताबाहेर ही स्पर्धा आयोजित करण्यासाठी बीसीसीआयला सरकारकडून हिरवा कंदील मिळणे अनिवार्य होते. अखेर परराष्ट्र मंत्रालय आणि गृह मंत्रालय यांच्यासह विविध खात्यांकडून बीसीसीआयला परदेशात आयपीएल घेण्यासाठी परवानगी मिळाली आहे.

आठही संघ २० ऑगस्टनंतर युएईसाठी रवाना

बीसीसीआय किंवा आयपीएलने याबाबत अधिकृत घोषणा केलेली नसली तरी येत्या काही दिवसांत सरकारकडून लेखी परवानगी मिळेल असे समजते. परदेशात स्पर्धा आयोजित करण्यासाठी आम्हाला सरकारकडून परवानगी मिळाली आहे आणि या संदर्भातील आवश्यक कागदपत्रे आम्हाला येत्या काही दिवसांत मिळतील, असे बीसीसीआय सूत्रांचे म्हणणे होते. त्यामुळे यंदा युएईमध्ये आयपीएलच्या आयोजनासाठी बीसीसीआयचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यातच आता काही संघांनी आपल्या खेळाडूंना क्वारंटाईन करण्यास सुरुवात केली आहे. आठही संघ २० ऑगस्टनंतर युएईसाठी रवाना होणार आहेत.

- Advertisement -

दोन वेळा कोरोना चाचणी

यंदा आयपीएल होणार हे स्पष्ट झाल्यामुळे मुंबई इंडियन्स संघाने त्यांच्या भारतीय खेळाडूंना क्वारंटाईन करण्यास सुरुवात केली आहे. तसेच काही फ्रेंचायझीस आपल्या खेळाडूंच्या कोरोना चाचणी करण्याच्या तयारीला लागल्या आहेत. युएईला रवाना होण्यापूर्वी खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ सदस्यांची दोन वेळा कोरोना चाचणी होणे अनिवार्य आहे. मात्र, बहुतांश संघ आपल्या खेळाडूंची किमान चार वेळा कोरोना चाचणी करणार असल्याचे समजते.

आरोग्याची काळजी, कुटुंबीय सोबत नकोत

खेळाडू आणि सपोर्ट स्टाफच्या सदस्यांना कुटुंबियांना युएईमध्ये सोबत घेऊन जाण्याची परवानगी आहे. कुटुंबियांनाही खेळाडू आणि सपोर्ट स्टाफच्या सदस्यांप्रमाणे जैव-सुरक्षित वातावरण राहावे लागणार आहे. मात्र, कुटुंबियांच्या आरोग्याला धोका उद्भवू नये यासाठी त्यांना सोबत घेऊन जाण्यास काही खेळाडू फारसे उत्सुक नाहीत. याबाबत एका खेळाडूचे म्हणणे होते की, माझे मूल पाच वर्षाचे आहे आणि सध्याच्या परिस्थितीत मी कुटुंबाला सोबत घेऊन जाण्याचा धोका पत्करू शकत नाही. सध्याच्या घडीला आरोग्य सर्वात महत्त्वाचे आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -