घरसंपादकीयअग्रलेखआस्थेच्या अभावाचा गोंधळ!

आस्थेच्या अभावाचा गोंधळ!

Subscribe

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी मनाला वाटेल तशी विधाने राजकारणाशी संबंधित असलेल्या व्यक्तींकडून केली जात आहेत. खरे तर असल्या विधानांमुळे शिवरायांच्या थोरवीला कुठलीही बाधा येत नाही आणि आलेली नाही, हे आजवर अनेकदा दिसून आलेले आहे. कारण शिवरायांबद्दल आपल्या सोयीनुसार किंवा त्यांच्या संशोधनानुसार विधाने करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. असे अनेकदा अनेकांनी केलेले आहे. त्यामुळे काही काळ वातावरण तापले, वादावादी झाली, पण त्यामुळे शिवरायांच्या थोरवीला काही कमीपणा आलेला नाही. कारण जी माणसे मुळातच मोठी असतात, त्यांना काही लोक आपल्याकडील छोट्या फूटपट्ट्यांनी मापण्याचा प्रयत्न करतात. त्यातून ते लोकांचे आपल्याकडे लक्ष आकर्षित करून घेत असतीलही, पण त्यातून त्यांचेच हसे होत असते, हेच आजवर दिसून आलेले आहे.

२०१९ च्या निवडणुकीनंतर आपली सत्ता पुन्हा महाराष्ट्रात येणार या भाजपवाल्यांच्या आकांक्षेला उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत महाविकास आघाडी करून उधळून लावले. तेव्हा भाजपचा मोठा अपेक्षाभंग झाला. त्यातूनच पुढे मग राज्यातील भाजपची अस्वस्थता दिसून येऊ लागली. त्यातून राज्यपालपदी भाजपनेच नेमलेले सी. विद्यासागर राव यांच्या जागी राजकीय अनुभव असलेले आणि उत्तराखंडचे मुख्यमंत्री राहिलेले भगतसिंह कोश्यारी यांना महाराष्ट्राच्या राज्यपालपदी आणण्यात आले. कोश्यारी राज्यपाल झाल्यानंतर महाराष्ट्रातील राजकारणाचा नूरच बदलून गेला, कोश्यारी हे राज्यपाल म्हणून काम करत आहेत की, भाजपचे प्रतिमुख्यमंत्री म्हणून काम करत आहेत, अशी शंका यावी, इतपत त्यांचे भाजपविषयीचे प्रेम दिसून येऊ लागले. महाविकास आघाडी सरकारने राज्यपाल नियुक्त १२ आमदारांची पाठवलेली यादी राज्यपाल कोश्यारी यांनी अनेक कारणे देऊन मंजूर केली नाही. इतकेच नव्हे तर फडणवीस आणि शिंदे यांनी शिवसेनेला धक्का देऊन उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारला पायउतार व्हायला भाग पाडले तेव्हा या नव्या सरकारला पोषक ठरतील, अशा भूमिका राज्यपालांनी घेतल्याचे दिसून आले.

- Advertisement -

राज्यपाल इतक्यावरच थांबले असते तर ती एक राजकीय बाब म्हणून त्याकडे वेगळ्या दृष्टीने पाहता आले असते, पण ज्या राज्याचे आपण राज्यपाल आहोत, तेथील महापुरुषांविषयी बोलताना आपण भान राखायला हवे, कारण या महापुरुषांविषयी, समाजसुधारकांविषयी त्या राज्यातील जनतेच्या मनात विशेष आदराचे स्थान असते. याचा विसर पडून चालत नाही. राज्यपाल कोश्यारी यांनी शिवराय, महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांच्याविषयी जाहीरपणे जी विधाने केली, त्यामुळे राज्यभरातून कोश्यारी यांच्याविषयी संतापाची लाट उसळली. त्यात काही राजकीय पक्षांनी विरोधाच्या नावाखाली आपले उखळ पांढरे करून घेतले हेही जनतेला दिसून आले.

कारण आता राजकीय पक्षही आपल्या सोयीनुसार वाद निर्माण झालेल्या विषयांना हवा देत असतात. राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांवर कोश्यारींनी जी टिप्पणी केली, त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेेते जास्त आक्रमक झालेले दिसले, पण प्रत्यक्षात राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यांच्या ज्येष्ठ नेत्यांना शिवरायांबद्दल किती आस्था आणि आपलेपणा आहे हे सगळ्यांना माहीत आहे. राज्यपाल कोश्यारी हे शिवरायांबद्दल एकदा विधान करून थांबले नाहीत, त्यांनी शिवरायांशी आताच्या काळातील नेत्यांसोबत तुलना केली. याच राज्यपालांनी महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई यांच्या बालपणी झालेल्या विवाहाबद्दल खिल्ली उडवली. त्याबद्दल राज्यातून संताप व्यक्त करण्यात आला. अगोदरच विरोधकांच्या मनात राज्यपाल कोश्यारी यांच्याविषयी राग आहे, त्यात त्यांनी महाराष्ट्रातील महापुरुषांची मानहानी करणारी विधाने करून विरोधकांच्या हातात, आयते कोलीत दिलेले आहे. त्यातूनच आता कोश्यारी हटाव, या मागणीने जोर धरलेला आहे.

- Advertisement -

काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी सुरू केलेली ‘भारत जोडो’ यात्रा चांगली चालली होती. सर्वसामान्य लोकांना भेडसावणारे मुद्दे उपस्थित करून ते केंद्रातील मोदी सरकारला जाब विचारत होते, त्यामुळे लोकांनाही त्यांची भूमिका पटत होती. महाराष्ट्रात आलेल्या यात्रेला चांगला प्रतिसाद मिळत होता, पण महाराष्ट्राची सीमा पार करण्यापूर्वी दोन दिवस अगोदर राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी वादग्रस्त दावा करणारे माफीपत्र दाखवून अवलक्षण केले असेच म्हणावे लागेल. कारण त्यामुळे त्यांच्या चांगल्या चाललेल्या भारत जोडो यात्रेला वेगळेच वळण मिळाले. लोकांना त्यांच्या भूमिकेविषयी वाटणारी सत्यता गळून पडली. कारण राहुल गांधी यांना भारत जोडो करायचे आहे की, देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या महान विभुतींविषयी वाद निर्माण करून विरोधकांवर कुरघोडी करायची आहे, असा प्रश्न पडला. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल राहुल गांधी यांनी त्यांची प्रतिमा मलीन करणारी कितीही कागदपत्रे फडकावली तरी त्याचा काहीही उपयोग होणार नाही. कारण सावरकरांनी देशाच्या स्वांतत्र्यलढ्यात दिलेले योगदान सर्वांसमक्ष आहे.

उलट, राहुल गांधी यांनी सावरकरांवर आरोप करून जो वाद निर्माण केला त्यामुळे त्यांच्या यात्रेचे नुकसान झाले आणि महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांची त्यांनी गोची केली. कारण राहुल गांधी यांनी महाराष्ट्रात येऊन सावरकरांविषयी वादग्रस्त विधान केल्यामुळे लोकांना कसे सामोरे जायचे, अशी या नेत्यांची पंचाईत झाली. सावरकरांविषयी राहुल गांधींनी वादग्रस्त विधान केल्यानंतर भाजपचे मुख्य प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला माफीपत्रे पाठवली होती, त्यामुळे त्यात काही विशेष नाही, असे विधान केले, त्यामुळे महाराष्ट्रात त्याचे पडसाद उमटले. त्यानंतर प्रतापगडावर शिवप्रताप दिनाच्या कार्यक्रमानंतर भाजपचे राज्यातील पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी एकनाथ शिंदे यांच्या बंडाची तुलना शिवरायांच्या आग्र्याहून सुटकेशी केली. त्यामुळे पुन्हा वातावरणात तणाव निर्माण झाला.

शिवरायांच्या जीवनावर काढण्यात आलेल्या काही चित्रपटांमध्ये वादग्रस्त चित्रणे आणि संवाद असल्यावरून वाद उफाळून आला. या एकूणच घटनाक्रमावर नजर टाकल्यास असे दिसेल की, जनभावना दुखावल्या जातील अशी महापुरुषांविषयी विधाने करणार्‍या लोकांच्या मनात त्यांच्याविषयी आस्था नाही. कारण त्यांच्या मनात ती असती तर त्यांनी अशी विधाने केली नसती. छत्रपती शिवाजी महाराज, तसेच स्वांतत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी वाद निर्माण होईल, अशी विधाने करून काहींना राजकीय फायदा उठवायचा आहे, हेच स्पष्ट आहे. शिवरायांच्या जीवनात चमत्कार वाटाव्यात, अशा काही घटना आहेत, त्यामुळे त्यांच्याशी तुलना करण्याचा मोह अनेकांना होता, पण जनमनात शिवरायांचे काय स्थान आहे, त्याचा ही मंडळी विचार करत नाहीत. मुळात मनात आस्था असायला हवी, अशा लोकांच्या मनात महापुरुषांविषयी आस्था नसल्यामुळेच हा सगळा गोंधळ निर्माण झालेला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -