घरताज्या घडामोडीमातोश्रीसोबत एकनिष्ठ असल्यानेच एसीबीची नोटीस, ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांचा दावा

मातोश्रीसोबत एकनिष्ठ असल्यानेच एसीबीची नोटीस, ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांचा दावा

Subscribe

रत्नागिरी – शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजन साळवी यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नोटीस बजावली आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना मी मातोश्रीसोबत एकनिष्ठ असल्यानेच मला नोटीस बजावण्यात आली आहे, असा दावा राजन साळवी यांनी केला आहे. मला नोटीस बजावण्यामागे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हात असून हिंमत असेल तर मला अटक करून दाखवा, असे आव्हानही साळवी यांनी दिले आहे. राजन साळवी यांनी रविवारी पत्रकार परिषद घेऊन माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. एसीबीची नोटीस आल्यानंतर राजन साळवी यांनी १५ दिवसांची मुदत मागितली आहे. आज सोमवारी त्यांना अलिबाग येथे चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे.

पत्रकार परिषदेत आपली बाजू मांडताना राजन साळवी म्हणाले की, शिवसेनेत उलथापालथ झाली. तरीही मी निष्ठावंत राहिलो. मी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली नाही. म्हणूनच, मला एसीबीची नोटीस आली आहे. यंत्रणांचा गैरवापर करत नोटिसा दिल्या जात आहेत. ज्यांच्यावर बेहिशोबी मालमत्तांचा आरोप आहे ते भाजपमध्ये जात आहेत. मलादेखील तुम्हाला तुरुंगात डांबणार अशा धमक्या आल्या होत्या, पण मी एसीबीच्या नोटिसीला घाबरत नसून चौकशीला सामोरे जाणार आहे. नोटीस पाठवण्याइतके माझ्याकडे कोणते घबाड आहे, हाच प्रश्न मला पडला आहे, असे राजन साळवी म्हणाले.

- Advertisement -

शिवसेनेत फूट पडल्यानंतर कोकणातून उद्योगमंत्री उदय सामंत शिंदे गटात सामील झाले. त्याचसोबत नाणार रिफायनरी संदर्भात उद्योगमंत्री उदय सामंत यांनी घेतलेल्या बैठकीतही राजन साळवी उपस्थित होते. त्यानंतर आता राजन साळवीही शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या, मात्र आपण उद्धव ठाकरे यांच्यासोबत कायम राहणार असल्याचे राजन साळवी यांनी स्पष्ट केले. मी तुरुंगात गेलो तरी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची साथ सोडणार नाही, असे राजन साळवी यांनी स्पष्ट केले. याआधी अ‍ॅड. अनिल परब, वैभव नाईक यांनाही अशाच चौकशांना सामोरे जावे लागले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -