घरताज्या घडामोडीभाजपसाठी उघडले दक्षिणेकडील प्रवेशद्वार!

भाजपसाठी उघडले दक्षिणेकडील प्रवेशद्वार!

Subscribe

हैदराबाद पालिकेत ४९ नगरसेवक विजयी

ग्रेटर हैदराबाद महापालिका निवडणुकीत भाजपने यंदा जबरदस्त कामगिरी करत महापालिकेच्या 150 जागांपैकी टीआरएसने ५६ जागांवर विजय मिळवत पहिला क्रमांक पटकावला. मात्र, दुसर्‍या क्रमांकावर भाजपने चार जागांवरून 4९ जागांवर मुसंडी मारत अनेपक्षित विजय मिळवला आहे. तर खासदार असदुद्दीन ओवेसी यांचा एमआयएम पक्ष ४३ जागांसह तिसर्‍या क्रमांकावर राहिला आहे. ओवेसींना त्यांच्या बालेकिल्ल्यातच धोबीपछाड व्हावे लागले असून अवघ्या चार नगरसेवकांच्या जीवावर निवडणूक लढवणार्‍या भाजपने मात्र आश्चर्यकारक झेप घेतल्याने सर्वांच्यांच भुवया उंचावल्या आहेत.

हैदराबाद निवडणुकीत भाजप दुसर्‍या क्रमांकावर पोहोचली असून दक्षिणेकडील त्यांचे दरवाजे उघडले आहेत. ग्रेटर हैदराबाद पालिका देशातील सर्वात मोठ्या पालिकेपैकी एक आहे. एकूण चार जिल्ह्यात ही पालिका आहे. त्यात हैदराबाद, मेडचल- मलकाजगिरी, रंगारेड्डी आणि संगारेड्डी जिल्ह्यांचा समावेश आहे. या चारही जिल्ह्यांमध्ये 24 विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यात तेलंगणाच्या लोकसभा सीटही येतात. त्यामुळेच पालिका ताब्यात घेण्यासाठी केसीआरपासून ते भाजप, काँग्रेस आणि ओवेसींनी जंगजंग पछाडले होते. मात्र गृहमंत्री अमित शहा यांनी सर्वांच्या स्वप्नांचा चुराडा करत भाजप दुसर्‍या क्रमांकावर नेला.

- Advertisement -

हैदराबाद पालिकेसाठी यंदा 46.55 टक्के मतदान झाले. 2009 च्या पालिका निवडणुकीत 42.04 टक्के तर 2016 मधील निवडणुकीत 45.29 टक्के मतदान झाले होते. मात्र, गेल्या दोन निवडणुकांपेक्षा यंदा सर्वाधिक मतदान झाल्याने या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

हैदराबादवर भाजपचे लक्ष का?
या पालिका निवडणुकीत भाजपने जोरदार प्रचार केला होता. हैदराबादमध्ये जम बसवण्यासाठी भाजपने बड्या नेत्यांची फौज उतरवून आक्रमक प्रचार केला होता. गेल्यावेळी केवळ चार जागा जिंकणार्‍या भाजपने या वेळी ४९ जागा जिंकल्या असून ते भाजपचे मोठे यश मानले जात आहे. हैदराबादमध्ये विधानसभेच्या 24 आणि लोकसभेच्या 5 जागा येतात. येथील लोकसंख्या 82 लाखांपेक्षा अधिक आहे. मुस्लिमांच्या तुलनेत हिंदूंची लोकसंख्याही या भागात मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे भाजपने हैदराबाद मिळवण्यासाठी व्यूहरचना आखली आहे. पालिका निवडणूक ही त्यांच्यासाठी लिटमस टेस्ट होती. हैदराबादेतील यशानंतर भाजपला तेलंगानाच्या दिशेनेही मोर्चा वळवायचा आहे. तेलंगनामध्ये विधानसभेच्या 119 जागा असून तेलंगनात भाजपचे केवळ दोनच आमदार आहेत. दुसरीकडे तेलंगनात लोकसभेच्या 17 जागा असून भाजपचे चार खासदार आहेत. त्यामुळे हैदराबाद जिंकतानाच तेलंगनातही पक्ष वाढवण्याच्या दृष्टीने भाजपसाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची असल्याची मानली जात आहे.

- Advertisement -

दक्षिण भारतात हातपाय रोवणे भाजपसाठी नेहमीच आव्हानात्मक राहिले आहे. अगदी मोदी लाटेतही त्यांना दक्षिणेवर स्वारी करता आलेली नाही. कर्नाटक वगळता आंध्र प्रदेश, तेलंगना, तामिळनाडू आणि केरळमध्ये भाजपचा म्हणावा तसा प्रभाव पडलेला नाही. मात्र आता हैदराबाद महापालिकेतील मोठ्या यशानंतर भाजपला दक्षिणेकडील प्रवेशद्वार उघडले आहे.

पक्ष – जागा
टीआरएस – ५६
भाजप – ४९
एमआयएम – ४३
काँग्रेस – ०२

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -