घरताज्या घडामोडीभाजपचा धुव्वा शिवसेनेचा भोपळा

भाजपचा धुव्वा शिवसेनेचा भोपळा

Subscribe

महाविकास आघाडीत एकीचे बळ

विधान परिषदेच्या सहा जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला केवळ एक जागा मिळाली. त्यांचा पुरता धुव्वा उडाला असून, सत्ताधारी असलेल्या शिवसेनेला भोपळाही फोडता आला नाही. मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारत प्रत्येकी दोन जागा जिंकल्या असताना महाविकास आघाडी म्हणून तिन्ही पक्ष एकत्र लढले तर भाजपला विजयापासून वंचित ठेवता येते हे दाखवून दिले आहे. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र लढत भाजपला चारीमुंड्या चीत केले. तर एकत्र आलेल्या तीन पक्षांविरोधात कोणत्या रणनीतीने लढायचे हे न समजल्याने गोंधळात पडलेल्या भाजपला आपल्या पराभवाची कारणमिमांसा करावी लागणार आहे. परंपरागत भाजपचे बालेकिल्ले असलेले पुणे आणि नागपूर हे गड ढासळले. या निकालामुळे राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार अस्थिर करण्याचे भाजपचे प्रयत्न आता थंडावण्याची शक्यता असून आघाडीच्या घटक पक्षांमध्ये कमालीचा आत्मविश्वास वाढीस लागला आहे.

पुणे आणि नागपूर पदवीधर हे भाजपचे हक्काचे मतदारसंघ मानले जातात. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुण्याचे दोन वेळा प्रतिनिधित्व केले आहे. तर नागपूर मतदारसंघ हा भाजपचा सलग ६० वर्षे बालेकिल्ला राहिला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही या मतदारसंघाचं नेतृत्व केलेले होते. तेव्हापासून नागपूर पदवीधर हा भाजपकडेच होता. पण यंदा या दोन्ही मतदारसंघात भाजपला जबरदस्त हादरा बसला असल्याचं पाहायला मिळते. विधान परिषदेच्या सर्व सहाही जागा आम्ही जिंकू आणि पुणे तर वनवेच, असे म्हणणार्‍या चंद्रकांत पाटील आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी हा पराभव मोठा धक्का मानला जात आहे.

- Advertisement -

अमरावतीत सरनाईक ठरले जेते
अमरावती शिक्षक मतदारसंघातही भाजपला आणि शिवसेनेचे विद्यमान आमदार श्रीकांत देशपांडे यांना मोठा धक्का बसला. पहिल्या पसंतीच्या मतांमध्ये अपक्ष उमेदवार किरण सरनाईक यांनी मोठी आघाडी घेतली आहे. सरनाईक यांना ६ हजार ५२८ मते मिळाली आहेत. तर महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीकांत देशपांडे यांना ५ हजार ४४७ मते मिळाली आहेत. शिक्षक आघाडीचे शेखर भोयर यांनाही ५ हजार २०५ मते मिळाली. मात्र, एकाही उमेदवाराने मतांचा कोटा पूर्ण केला नाही. त्यामुळे दुसर्‍या पसंतीच्या मतांची मोजणी करण्यात आली. यातही सरनाईक यांची सरशी झाली. अमरावती शिक्षक मतदारसंघात भाजप नेते आणि माजी कृषीमंत्री अनिल बोंडे यांच्या भगिनी अपक्ष उमेदवार संगीता शिंदे यांनाही पहिल्या पसंतीच्या मतांमध्ये भाजप उमेदवारापेक्षा जास्त मते मिळाली.

पुणे शिक्षक संघात आसगावकर
पुणे शिक्षक मतदारसंघातही भाजपला मोठा धक्का बसला. एलिमिनेशनच्या एकोणिसाव्या फेरीअखेर महाविकास आघाडीचे उमेदवार जयंत आसगावकर यांना २७ हजार ११७ मते मिळाली. तर अपक्ष उमेदवार दत्तात्रय सावंत यांना ११ हजार १६७ मते मिळाली. भाजप पुरस्कृत जितेंद्र पवार यांना अवघ्या ५ हजार ५७८ मतांवर समाधान मानावे लागले. एलिमिनेशनच्या सर्व फेर्‍या पूर्ण करुन, सर्वाधिक मते घेणार्‍या उमेदवाराला विजयी घोषित करण्यात आले. त्यात आसगावकर निवडून आले.

- Advertisement -

औरंगाबादेत चव्हाणांची हॅट्ट्रिक
औरंगाबाद पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सतीश चव्हाण यांनी विजयी हॅट्ट्रिक साधली. त्यांनी भाजपचे उमेदवार शिरिष बोराळकर यांचा सलग दुसर्‍यांदा पराभव केला आहे. मतांची वाढलेली टक्केवारी पाहता सतीश चव्हाण यांना धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात होती. तसा दावा भाजपकडूनही करण्यात आला होता. पण वाढलेली बहुतांश मते ही सतीश चव्हाण यांच्याच पारड्यात पडल्याचे निकालावरून स्पष्ट झाले. सतीश चव्हाण यांनी यापूर्वी सलग दोन वेळा औरंगाबाद पदवीधर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. यावेळीही त्यांनी भाजप उमेदवारावर मात करत विजयाची हॅट्ट्रिक साधली आहे.

धुळेमध्ये भाजपला दिलासा
धुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप उमेदवार अमरिश पटेल यांनी काँग्रेस उमेदवार अभिजित पाटील यांचा दारुण पराभव केला आहे. अमरीश पटेल विरोधकांची ११५ मतं फोडण्यात यशस्वी झाले आहेत. भाजपाच्या १९९ मतदारांनी तर महाविकास आघाडीच्या २१३ मतदारांनी मतदान केले होते. त्यात काँग्रेसच्या किमान ५७ मतदारांनी क्रॉस व्होटिंग केल्याचे स्पष्ट झाले. काँग्रेसचे संख्याबळ १५७ असतानाही अभिजित पाटील यांना फक्त ९८ मते मिळाली. तर महाविकास आघाडीच्या किमान ११५ मतदारांनी क्रॉस व्होटिंग केलं आहे.

कुणाला किती मते?
पुणे पदवीधर
अरुण लाड (राष्ट्रवादी) – १, २२, १४५
संग्राम देशमुख (भाजप) – ७३,३३१
अरुण लाड ४८, ८२४ मतांनी विजयी

नागपूर पदवीधर
अजित वंजारी यांना ५५, ९४७
संदीप जोशी (भाजप) 41 हजार 540 मते

औरंगाबाद पदवीधर
सतीश चव्हाण(राष्ट्रवादी) – १,१६,६३८
शिरीष बोराळकर(भाजप) – ५८,७४३
सतीश चव्हाण ५७,८९५ मतांनी विजयी

नागपुरात पहिल्यांदाच काँग्रेस
भाजपचा गेली ५५ वर्षे बालेकिल्ला असलेल्या नागपूर पदवीधर मतदारसंघातही भाजपला मोठा धक्का बसला. महाविकास आघाडीचे (काँग्रेस) उमेदवार अभिजित वंजारी यांनी विजयी आघाडी घेतली. पहिल्या पसंतीच्या मतांमध्ये वंजारी यांनी भाजप उमेदवार संदीप जोशी यांना मोठ्या फरकाने मागे टाकले. अजित वंजारी यांना ५५, ९४७ संदीप जोशी (भाजप) 41 हजार 540 मते मिळाली. त्यानंतर अभिजित वंजारी यांना विजयी घोषित केले. जोशी हे फडणवीस यांचे निकटवीर्तीय असल्याने हा पराभव भाजपच्या जिव्हारी लागला आहे.

पुण्यात अरुण लाड यांची सरशी
पुणे पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अरुण लाड यांनी विजयी पताका फडकावली. लाड यांनी भाजपचे उमेदवार संग्राम देशमुख यांना धूळ चारत विजय मिळवला आहे. पुणे पदवीधर मतदारसंघाचं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दोन वेळा प्रतिनिधित्व केले होते. यामुळे पुण्यात भाजपचाच विजय होणार, असा दावा पाटील करत होते. पुण्याची जागा वनवे येईल, असा विश्वास त्यांना होता. पण शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या एकजुटीने त्यांचे मनसुबे धुळीला मिळाले. तर महाविकास आघाडीच्या किमान ११५ मतदारांनी क्रॉस व्होटिंग केलं आहे.

विधान परिषद निवडणुकीचा निकाल हा महाविकास आघाडीच्या एकजुटीचा आणि गेल्या वर्षभरात केलेल्या कामाला मतदारांनी दिलेली पावती आहे. महाराष्ट्रातील चित्र बदलत आहे. या बदलाला महाराष्ट्रातील लोकांचा पाठींबा आहे.
-शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस.

विधानपरिषदेचा निकाल अपेक्षेपेक्षा वेगळा लागला. चांगल्या जागांची अपेक्षा होती पण एकच जागा मिळाली. ज्यांचा मुख्यमंत्री आहे त्यांना एकही जागा मिळाली नाही, याचे आत्मचिंतन करावे.
-देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते, विधानसभा.

विधान परिषद निवडणुकीचे निकाल राज्य सरकारला अधिक भक्कम करणारे आणि आत्मविश्वास वाढवणारे आहेत. या निकालांमुळे महाविकास आघाडीची महाराष्ट्र एक्सप्रेस अधिक गतिमान होणार आहे, हे नक्की.
-अशोक चव्हाण, सार्वजनिक बांधकाम मंत्री.

तीन चाकांच्या रिक्षाने आज बुलेट ट्रेनला हरवले आहे. तीन पक्ष एकत्र आले तर राज्यात काय निकाल लागू शकतात हे महाविकास आघाडीने पुन्हा एकदा दाखवून दिले आहे.
-अ‍ॅड. अनिल परब, परिवहन मंत्री.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -