घरसंपादकीयओपेडसीटबेल्ट आवश्यक, पण अंमलबजावणीचा गुंता मोठा!

सीटबेल्ट आवश्यक, पण अंमलबजावणीचा गुंता मोठा!

Subscribe

कारमधील सर्वप्रवाशांना सीटबेल्ट बंधनकारकचा नियम खरंतर महामार्गांवरील चालकांसाठी होणे गरजेचा आहे. तेथे वाहनांची गती ही सरासरी ८० ते १००पेक्षा अधिक असते. मुंबई शहरात मात्र वाहनाचा वेग ४० ते ५० च्या आतच असल्यामुळे या नियमांची अंमलबजावणी शहरांबाहेर होणे गरजेचे आहे. मुंबई शहरात वाहनांच्या गर्दीमुळे वाहनांची गती ४० च्या आतच असते, चारचाकीचा अपघात झाला तरी त्यात मृत्यूमुखी पडण्याची संख्या कमी आहे आणि शहरात अपघातात मृत्यू होण्याचे कारण केवळ सीटबेल्टच नाही इतरही कारणे आहेत. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अनेकदा अपघात होतात. पावसामुळे अनेकदा रस्त्यावरचे डांबर, सिमेट वाहून गेलेले असते. रस्त्यांना भेगा पडलेल्या असतात, त्यामुळेही अपघातांना निमंत्रण मिळते. त्यामुळे येथेही लक्ष देणे गरजेचे आहे.

‘नियम म्हणजे नियम’. हे वाक्य आपण आत्तापर्यंत अनेकदा ऐकले आहे. नियम हे सर्वांसाठी सारखेच असतात. अगदी उच्चपदस्थ व्यक्तींपासून ते सर्वसामान्यांपर्यंत नियम हे सर्वांसाठीच असतात. नियम मोडल्यावर कारवाई होणारच, असा सल्ला अनेकांकडून ऐकण्यास मिळतो. कोणतीही व्यवस्था सुरळीतपणे सुरू राहण्यासाठी नियमांची आवश्यकता असते. मग ते कार्यालय असो किंवा अन्य काही ते व्यवस्थितपणे सुरू राहण्यासाठी नियमांची आवश्यकता भासतेच. नियमांमुळे शिस्तीचे पालन होते आणि व्यवस्था बिघडत नाही. म्हणूनच एखादा खेळ खेळायचा जरी झाला तरी त्यासाठी काही नियम बनविलेले असतात आणि त्याचे पालन करणे सर्वांसाठी आवश्यक असते. अन्यथा तो खेळही व्यवस्थितरित्या खेळला जात नाही.

म्हणूनच ‘नियम म्हणजे नियम’ हे एक समीकरण बनलेले असून ते मोडण्यास कोणालाही मुभा नसते. परंतु, नियम हे सर्वांसाठी असणे गरजेचे आहे, अन्यथा काहीजण नियमांच्या बंधनात आणि काही बंधनमुक्त असे असल्यास यावरून असंतोष उफाळणार, हे काही वेगळे सांगण्याची गरज नाही. कारमधील मागच्या प्रवाशांनाही सीटबेल्ट बंधनकारक करण्यात आल्यानंतर ‘नियमांचे बंधन केवळ आम्हालाच का’, मुंबईकरांकडून सध्या विचारण्यात येणारा हा सवाल, म्हणजे याचीच प्रचिती तर नाही ना? ही खरचं विचार करण्यासारखी गोष्ट आहे. कदाचित यामुळेच तर सीटबेल्ट बंधनकारक करण्याबाबत काहीसा सावध पवित्रा घेत आधी १० दिवस समज देऊन नंतरच कारवाईचा श्रीगणेशा करण्याचे प्रशासन दरबारी ठरले तर नाही ना? अशी शंकेची पाल चुकचुकल्याशिवाय राहत नाही.

- Advertisement -

प्रसिद्ध उद्योगपती सायरस मिस्त्री यांचे रस्ता अपघातात निधन झाले आणि त्यानंतर महामार्गावरील सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा अधोरेखित झाला. केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी यानंतर कारमधील मागच्या सीटमधील प्रवाशांनाही सीटबेल्ट बंधनकारक करण्याचे संकेत दिले. त्यानंतर या घोषणेच्या अंमलबजावणीसाठी लागलीच मुंबईत १ नोव्हेंबरपासून कारमधील मागच्या प्रवाशांनाही सीटबेल्ट बंधनकारक असेल, असे आदेश मुंबई पोलिसांकडून काढण्यात आले. केवळ कारमधील सर्व प्रवाशांनाच सीटबेल्ट सक्तीचा नव्हे तर एप्रिल-मे महिन्यात दुचाकीवरील सहप्रवाशाला हेल्मेट बंधनकारक करण्याच्या नियमांचा श्रीगणेशाही मुंबईतूनच करण्यात आला. वाढते रस्ते अपघात रोखण्यासाठी तसेच सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हा निर्णय घेण्यात आल्याचे शासनाकडून स्पष्ट करण्यात आले असले तरी यामध्ये अनेक मुद्यांवरून विसंगती आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. कारण, सीटबेल्ट बंधनकारक हे आत्तापर्यंत केवळ मुंबईतच बंधनकारक करण्यात आल्यामुळे नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी आहे.

सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आणि वाढते रस्ते अपघात रोखण्यासाठी हे नियम असतील तर ते इतरत्रही लागू व्हायला हवेत. अपघात केवळ मुंबईतच घडत नाहीत तर इतरत्रही होतात. तर मग नियमांचे बंधन केवळ मुंबईकरांनाच का? आत्तापर्यंत सीटबेल्ट सक्ती ही कारमधील चालकासह त्याच्या बाजूच्या सीटवर बसणार्‍या प्रवाशासाठी होती. परंतु, आता ती कारमधील सर्व प्रवाशांना बंधनकारक करण्यात आली आहे. मुंबईत अनेक गाड्या या जुन्या आहेत. जुन्या प्रकारच्या टॅक्सींमध्ये सीटबेल्ट बसवून घेणे भाग पडणार आहे. यासाठी खर्च वाढणार आहे. परंतु, त्यानंतरही समस्या सुटेल, असा काही भाग नाही. डावीकडच्या आणि उजवीकडच्या दाराजवळील प्रवाशांना सीटबेल्ट मिळेल. पण, मधल्या सीटवरील प्रवाशाचे काय? सीटबेल्ट नसल्यास भुर्दंड पडणार या भीतीने अनेक टॅक्सी चालकाकडून ४ च्या ऐवजी तीन प्रवासी घेण्यात येणार असल्यामुळे एकाच कुटुंबातील चौथ्याने वेगळी टॅक्सी करायची का? यामुळे टॅक्सीचालक आणि प्रवाशांमध्ये वादाचे प्रसंग उद्भवण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

वाहनांचे प्रत्येक नियम मुंबईतच लावले जातात. मुंबईप्रमाणेच इतर शहरांमध्ये मात्र हे नियम धाब्यावर बसवले जातात. कटु असले तरी हे वास्तव आहे. उदाहरण घ्यायचेच झाल्यास दुचाकीवरील हेल्मेटसक्तीचे घेता येईल. दुचाकीवरील प्रवाशांना हेल्मेट बंधनकारक करण्यात आले. मुंबईत काटेकोरपणे त्याची अंमलबजावणी होत आहे. परंतु, इतर शहरांमध्ये दुचाकी चालक या नियमांचे पालन करत नसल्यामुळे इंधन न देण्यापर्यंतचे कठोर नियम करावे लागले. मुंबईत मात्र ही परिस्थिती उद्भवली नाही. काही हुल्ल्डबाजांचा अपवाद वगळल्यास प्रशासनाकडून घालून देण्यात आलेल्या नियमांची अंमलबजावणी मुंबईकरांकडून उत्तमप्रकारे करण्यात येते. परंतु, नियम मानतात म्हणून वारंवार केवळ मुंबईकरांनाच नियमांच्या बंधनात अडकवणे योग्य नाही, याचाही विचार कोठे तरी होणे गरजेचे आहे.

कारमधील सर्वप्रवाशांना सीटबेल्ट बंधनकारकचा नियम खरंतर महामार्गांवरील चालकांसाठी होणे गरजेचा आहे. तेथे वाहनांची गती ही सरासरी ८० ते १००पेक्षा अधिक असते. मुंबई शहरात मात्र वाहनाचा वेग ४० ते ५० च्या आतच असल्यामुळे या नियमांची अंमलबजावणी शहरांबाहेर होणे गरजेचे आहे. मुंबई शहरात वाहनांच्या गर्दीमुळे वाहनांची गती ४० च्या आतच असते, चारचाकीचा अपघात झाला तरी त्यात मृत्यूमुखी पडण्याची संख्या कमी आहे आणि शहरात अपघातात मृत्यू होण्याचे कारण केवळ सीटबेल्टच नाही इतरही कारणे आहेत. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अनेकदा अपघात होतात. पावसामुळे अनेकदा रस्त्यावरचे डांबर, सिमेट वाहून गेलेले असते. रस्त्यांना भेगा पडलेल्या असतात, त्यामुळेही अपघातांना निमंत्रण मिळते. त्यामुळे येथेही लक्ष देणे गरजेचे आहे. केवळ सीटबेल्ट सक्ती बंधनकारक केल्यामुळे अपघात घटतील, हे कितपत योग्य मानायचे?

याबाबच अनेक टॅक्सी चालकांचे म्हणणे आहे की, वाहतूक पोलिसांनी हे नियम घालून दिल्यामुळे ते पाळल्याशिवाय पर्याय नाही. मात्र याचा परिणाम थेट आमच्या व्यवसायावर होऊ शकतो, याचाही विचार शासनाने करणे गरजेचे आहे. अनेक प्रवासी सीलबेल्ट लावण्यास इच्छुक नसतात. ते आमचे ऐकत नाहीत. वादावादी करतात. यामुळे अनेकदा हाणामारीचे प्रसंग उद्भवतात, अशावेळी काय करायचे? आमच्या सुरक्षेचे काय? आम्ही व्यवसाय करायचा की, या समस्यांना तोंड द्यायचे? सीलबेल्ट सक्तीमुळे चौथ्या प्रवाशाचा प्रश्न निर्माण होत असल्यामुळे यापुढे टॅक्सीमध्ये तीनच प्रवासी घेतले जातील. त्यामुळे रिक्शातही तीन आणि टॅक्सीतही तीन प्रवासी प्रवास करतील. टॅक्सीच्या तुलनेत रिक्षाचा प्रवास स्वस्त असल्याने प्रवासी संख्या तेथेच अधिक वळेल, त्यामुळे या नियमांचा परिणाम थेट आमच्या व्यवसायावर होणार आहे. अनेक टॅक्सीचालक हे शेअर्स टॅक्सीद्वारे व्यवसाय करतात. चार प्रवासी घेतले तरच त्यांना भाडे परवडते. सीटबेल्ट सक्तीमुळे आता तीनच प्रवासी घ्यावे लागणार असून भाडेवाढ करण्याशिवाय पर्याय नाही, असे टॅक्सीचालकांचे म्हणणे आहे.

अपघात रोखण्यासाठी आणि सुरक्षेच्या दृष्टिकोनातून चारचाकी वाहनांबाबत सीटबेल्ट बंधनकारक करण्यात आला. परंतु, मोठ्या गाड्यांचे काय? स्कूल बस, प्रवासी बस, ट्रक, टेम्पो, ट्रॅक्टर टॉली आदींमधून प्रवास करणार्‍यांच्या सुरक्षेचे काय? तेथे सीटबेल्ट सक्तीचे काय? असे अनेक प्रश्न अद्यापतरी अनुत्तरीत आहेत. टॅक्सी चालकांप्रमाणे स्कूल बसचालकांनीही यामुळे व्यवसायावर परिणाम होणार असल्याची ओरड सुरू केली आहे. स्कूल व्हॅनमध्ये ८ विद्यार्थ्यांची परवानगी मोटार परिवहन विभागाने दिलेली आहे. स्कूल व्हॅनमध्ये मागच्या सीटवर सीटबेल्ट नसल्यामुळे ते विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी बसवून घ्यावे लागणार आहेत. कोरोनामुळे दोन वर्षे हा धंदा पूर्णपणे बंद होता. आता कुठे गाडी पुन्हा रूळावर येत असताना नव्या नियमांमुळे आता पुन्हा ऐन महागाईत वाढीव खर्चाला सामोरे जावे लागणार आहे. खर्च वाढल्यामुळे स्कूल बसची भाडेवाढ करण्याशिवाय पर्याय नाही, असे स्कूल बसचालकांचे म्हणणे आहे.

कारमधील सर्व प्रवाशांना सीटबेल्ट बंधनकारक नियमांबाबत सध्याच्या घडीला विसंगती असली तरी वाढतेे अपघात रोखण्यासाठी आणि सुरक्षेच्या दृष्टिकोनातूनच हे नियम बंधनकारक करण्यात आल्याचे शासन दरबारी सांगितले जाते. हा निर्णय घेण्यामागे दिवसेंदिवस वाढत जाणारी अपघाताची आकडेवारीदेखील आहे. वस्तुत: भारतातील रस्ते अपघातांची आकडेवारी तशी धक्कादायकच आहे. नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोच्या (एनसीआरबी) आकडेवारीनुसार २०२१मध्ये १.५५ लाखांहून अधिक मृत्यू रस्ते अपघातात नोंदवले गेले आहेत. म्हणजे, एका तासात १८ जणांनी जीव गमावला. त्यावर्षी ४ लाख २२ हजार ६५९ अपघातांची नोंद झाली. २०२०मधील कोरोना उद्रेकामुळे देशात लॉकडाऊन लावण्यात आले होते.

तरीही त्यावर्षी ३ लाख ६६ हजार १३८ अपघात नोंदवले गेले आणि १.३३ लाखांहून अधिक लोकांनी जीव गमावला. त्यातही १८ ते ४५ वयोगटातील सर्वाधिक म्हणजेच ७० टक्के होते. या सर्व अपघातांमागचे कारणही समान आहे. हुल्लडबाजांची बेपर्वाई आणि बेदरकारपणा. दुचाकी असो किंवा चारचाकी गाड्या. हुल्लडबाजांच्या बेपर्वाई आणि बेदरकारपणामुळे अपघातांमध्ये भर पडत आहे. आधीच रस्त्यांची स्थिती वाईट आहे, त्यात या हुल्लडबाजांकडून वाहतूक नियम धाब्यावर बसवले जात असल्याचे पाहायला मिळते. सर्रासपणे एका दुचाकीवर तिघे जण बसलेले आढळतात. या गाड्या उलट्या दिशेनेही येतात. त्यामुळे अपघातांना निमंत्रण मिळते. याठिकाणी आधी कारवाई करण्याची गरज आहे.

सरकारने हेल्मेटसक्ती केली आहे, पण ते कोणी गांभीर्याने घेतलेले नाही. अनेक महाभाग असे आहेत की, दंड आकारला जाऊ नये, म्हणून ते हेल्मेट वापरतात. पण ते आपल्या सुरक्षेसाठी आहे, याचा विचारच केला जात नाही. पोलिसांचाही तसा धाक राहिलेला नाही. म्हणूनच तर दुचाकीवर तिघेजण आणि कसेही जाताना दिसतात. कारण केवळ चिरीमिरी दिल्यावर सुटता येते, हे गणित सर्वांच्याच लक्षात आले आहे. त्यात दुचाकींची संख्या जास्त असल्याने ही ‘कमाई’ देखील जास्तच होते. मुळात नियम हे तोडण्यासाठीच असतात असा ग्रह अनेकांनी करून घेतलेला आहे. हेल्मेट जवळ बाळगायचे पण ते हॅण्डलवरच्या आरशाला अडकवायचे. कोणी पोलीस दिसला तर, लगेच ते काढून डोक्यावर चढवायचे. पोलीसही काही पैसे हाती पडल्यावर सोडून देतात. सीटबेल्टच्या बाबतीतही तोच प्रकार आहे. हे सर्व आपल्या सुरक्षिततेसाठी आहे, याची चिंता पुढे बसलेल्यांना नसते. पोलीस दिसले तर चटकन सीटबेल्ट लावायचे आणि नंतर काढायचे. आपल्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सीटबेल्टच्या नियमांची अंमलबजावणी होत असल्याचे पाहायला मिळणे हे दुर्मिळच…

–रामचंद्र नाईक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -