घरक्राइममालाडमध्ये लुडो खेळण्यावरुन मित्रानेच मारहाण करुन केली हत्या

मालाडमध्ये लुडो खेळण्यावरुन मित्रानेच मारहाण करुन केली हत्या

Subscribe

आरोपी मित्राला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. 

लुडो गेम खेळण्यावरुन झालेल्या भांडणात तुकाराम नलावडे या ५१ वर्षांच्या व्यक्तीची त्याच्या मित्राने मारहाण करुन हत्या केली. याप्रकरणी मालाड पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवून आरोपी मित्र अमित राजपोपट ऊर्फ जिमी याला अटक केली असून याच गुन्ह्यात त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. विशेष म्हणजे तुकाराम नलावडे याचा नैसगिक मृत्यू झाल्याचा अहवाल त्याच्या नातेवाईकांनी एका डॉक्टरकडून घेऊन त्याच्यावर मालाड येथील हिंदू स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले. मात्र, तुकाराम व अमित यांच्यात मारामारी झाली आणि त्यातूनच त्याचा मृत्यू झाल्याचे दोन दिवसांनी नातेवाईकांना समजले होते. त्यानंतर तुकारामच्या मुलीच्या तक्रारीवरुन मालाड पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदविल्याचे पोलीस निरीक्षक सुधीर दळवी यांनी सांगितले.

तुकाराम हा मालाड परिसरात त्याच्या कुटुंबियांसोबत राहत होता. रात्री उशिरा त्याच्यासह त्याचे काही मित्र मालाड येथील दारुवाला कंपाऊंड, मोकळ्या मैदानात पैसे लावून लुडो गेम खेळत होते. यावेळी तुकाराम आणि त्याचा मित्र अमित यांच्यात गेम खेळण्यावरुन वाद झाला. या वादानंतर अमितने त्याला मारहाण करुन जमिनीवर पाडले. डोक्याला दुखापत झाल्यानंतर तुकाराम तेथून निघून गेला. मात्र, काही अंतरावर गेल्यावर तो खाली कोसळला, ही माहिती त्याच्या कुटुंबियांना समजताच त्यांनी त्याला संजीवनी रुग्णालयात दाखल केले. तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले.

- Advertisement -

त्यानंतर त्यांनी स्थानिक डॉक्टरच्या मदतीने नैसगिक मृत्यूचा अहवाल प्राप्त करुन त्याच्या मृतदेहावर मालाड येथील हिंदू स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले. दोन दिवसांनी तुकारामच्या मुलीला लुडो गेम खेळण्यावरुन अमित आणि तुकाराम यांच्यात भांडण झालेले, या दोघांनी मद्यप्राशन केले होते, दारुच्या नशेत अमितने तुकारामचे डोके जमिनीवर आपटले आणि त्यात त्याचा मृत्यू झाला होता, ही माहिती समजताच तिने मालाड पोलीस ठाण्यात अमितविरुद्ध तक्रार केली होती. तिच्या तक्रारीवरुन पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवून त्याला अटक केली. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -