घरदेश-विदेशप्रेमासाठी आर या पार... बहुतांश प्रकरणात ताटातूट अन् तुरुंगवास!

प्रेमासाठी आर या पार… बहुतांश प्रकरणात ताटातूट अन् तुरुंगवास!

Subscribe

मुंबई : इंटरनेटमुळे जग जवळ आले आहे. माहितीच्या या महाजालामुळे देशाच्या सीमा गळून पडल्या आहेत. त्यात अनेकांचे प्रेमबंधही जुळून आले आहेत. प्रेमासाठी काय पण… म्हणत देशाच्या ओलांडणाऱ्यांची संख्या वाढत आहे. पण बहुतांश प्रकरणात त्याची परिणती ताटातूट आणि तुरुंगवासातच झाल्याचे पाहायला मिळाले आहे.

सध्या एकच प्रेमप्रकरण गाजत आहे. आपल्या प्रियकराला भेटण्यासाठी सीमा हैदर ही पाकिस्तानी नागरिक थेट भारतात आली आहे. ती एकटी आलेली नाही, सोबत आपल्या चार मुलांनाही तिने आणले आहे. पबजी गेम खेळताना 27 वर्षीय सीमा हैदरची ओळख ग्रेटर नोएडा येथे राहणाऱ्या 22 वर्षीय सचिन मीणा याच्याशी झाली. दोघे 2020पासून एकमेकांच्या प्रेमात होते. ती आपल्या चार मुलांसह मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात कराचीहून दुबईमार्गे नेपाळला पोहोचली. त्यानंतर तिने नेपाळमधील पोखरा येथून बेकायदेशीरपणे भारतात प्रवेश केला. सचिन आणि सीमाने लग्नासंदर्भात एका वकिलाशी संपर्क साधल्यानंतर पोलिसांना संपूर्ण प्रकरणाची माहिती मिळाली.

- Advertisement -

पोलिसांबरोबरच उत्तर प्रदेशचे दहशतवादविरोधी पथकाकडूनही (यूपी एटीएस) सीमा, सचिन तसेच त्यांच्या कुटुंबीयांची चौकशी सुरू आहे. मी हिंदू धर्म स्वीकारला आहे. हिंदू धर्म खूप छान आहे. मी मांसाहारही सोडला आहे. सचिनला सोडून जाण्यापेक्षा मी मरणे पसंत करेन, असे ती सांगते. पण आतापर्यंतच्या चौकशीतून तपास यंत्रणांचे अद्याप समाधान झालेले नाही. त्यामुळे पाकिस्तानी इकराप्रमाणेच सीमालाही भारताची सीमा ओलांडून पाकिस्तानत जावे लागण्याची शक्यता आहे.

मुलायम आणि इकराची प्रेमकहाणीही रंजक
गेल्यावर्षी ऑनलाइन ल्युडो खेळताना 19 वर्षीय पाकिस्तानी तरुणी इकराची उत्तर प्रदेशातील मुलायमसिंह या 25 वर्षीय तरुणाशी ओळख झाली. तो कालांतराने त्यांच्यात आधी मैत्री आणि नंतर या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. सिक्युरिटी गार्ड असलेल्या मुलायमने तिला नेपाळमध्ये बोलावले. तिथेच दोघांनी लग्न केले. भारतीय हद्दीत घुसल्यानंतर ते दोघे पाटण्याला गेले. तेथून तिला सोबत घेऊन मुलायमने थेट बंगळुरू गाठले. जुनासंद्रा येथे भाड्याच्या घरात ते दोघे राहू लागले. तिने आपल्या पालकांशी व्हॉट्सएप कॉलवरून संपर्क साधला आणि त्याचा तपशील पोलिसांना मिळाला. पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले. मुलायमसिंहची रवानगी तुरुंगात तर, इकराला मायदेशी पाठविण्यात आले.

- Advertisement -

उत्तर प्रदेशची अंजू पोहोचली पाकिस्तानात
एकीकडे पाकिस्तान सोडून आपल्या प्रियकराला भेटण्यासाठी भारतात आलेल्या दोघी चौकशीच्या फेऱ्यात अडकल्या. तर दुसरीकडे, उत्तर प्रदेशातील अंजू ही आपल्या मित्राला भेटण्यासाठी पाकिस्तानात दाखल झाली आहे. 2019मध्ये फेसबुकच्या माध्यमातून पाकिस्तानच्या नसरुल्लाह याच्याबरोबर तिची ओळख झाली. अंजू ही विवाहित असून तिला दोन मुले आहेत. तथापि, एका वृत्तसंस्थेनुसार, आम्ही दोघे लग्न करणार नसल्याचे नसरुल्लाह याने स्पष्ट केले आहे. तर, 20 ऑगस्ट 2023पर्यंत अंजूकडे पाकिस्तानचा व्हिसा असल्याने 21 ऑगस्ट 2023ला ती पुन्हा भारतात येणार आहे, अशी माहिती पाकिस्तानच्या पोलिसांनी दिली.

भारतच्या हामिदने पाकच्या तुरुंगात काढली 6 वर्षे
मुंबईतील वर्सोवा येथे राहणाऱ्या हामिद नेहाल अंसारी हा फेसबुक चॅटिंगमध्ये एका पाकिस्तानी मुलीच्या प्रेमात पडला. 2012मध्ये व्हिसाशिवाय तो तिला भेटण्यासाठी तो अफगाणमार्गे पाकिस्तानात दाखल झाला. पण तिथे त्याला लगेच अटक करण्यात आली. हेरगिरीच्या आरोपाखाली त्याच्यावर खटला चालवून त्याला तुरुंगात टाकण्यात आले. तत्कालीन परराष्ट्रमंत्री दिवंगत सुषमा स्वराज यांनी याचा पाठपुरावा करत, हामिदला पुन्हा भारतात आणले. तो तब्बल सहा वर्षे पाकिस्तानी कैदेत होता.

भारत आणि पाकिस्तानमधील आतापर्यंतचे संबंध लक्षात घेता, उभय देशांतील तरुण-तरुणीची प्रेमप्रकरणे जास्तकरून ताटातूट झाल्याची तसेच कोणाला तरी कारावसात राहावे लागल्याचे पाहायला मिळते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -