घरदेश-विदेशनातेवाइकाशी हिंदीतून संवाद साधला आणि इंजिनिअरने नोकरी गमावली..., थेट कोर्टात दावा

नातेवाइकाशी हिंदीतून संवाद साधला आणि इंजिनिअरने नोकरी गमावली…, थेट कोर्टात दावा

Subscribe

न्यूयॉर्क : एका नातेवाइकाशी हिंदीतून संवाद साधल्याने आपल्याला नोकरी गमवावी लागल्याचा दावा येथील 78 वर्षीय अभियंत्याने केला आहे. हा अजब प्रकार गेल्यावर्षी घडल्याचे त्याने म्हटले आहे.

भारतीय-अमेरिकन अभियंता अनिल वार्ष्णेय (वय 78) यांनी मिसाईल डिफेन्स कॉन्ट्रॅक्टर पार्सन्स कॉर्पोरेशन आणि यूएस संरक्षण सचिव लॉयड ऑस्टिन यांच्याविरुद्ध खटला दाखल केला असून, कंपनीवर भेदभावपूर्ण कारवाई केल्याचा आरोप त्यांनी केला असल्याचे स्थानिक न्यूज वेबसाइटच्या वृत्तात म्हटले आहे.

- Advertisement -

अनिल वार्ष्णेय यांनी 26 सप्टेंबर 2022 रोजी, भारतातील आपल्या नातेवाईकाबरोबर फोनवरून सुमारे दोन मिनिटे संभाषण केले. हिंदी भाषेतून झालेले त्यांचे हे संभाषण एका अमेरिकन सहकाऱ्याने ऐकले. त्यानंतर त्यांना चुकीच्या पद्धतीने नोकरीवरून काढून टाकण्यात आले. त्यानंतर वार्ष्णेय यांनी कंपनीविरोधात खटला दाखल केला आहे.

वार्ष्णेय यांनी गोपनीय माहिती उघड करून सुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्याचा खोटा रिपोर्ट आपल्या सहकाऱ्याने जाणूनबुजून तयार केला, असा आरोप त्यांनी केला आहे. तथापि, आपण कोणतीही गोपनीय किंवा विशिष्ट माहिती दिलेली नाही. ज्या खोलीत त्याला व्हिडिओ कॉल आला ती खोली पूर्णपणे रिकामी होती. गोपनीय माहिती शेअर करता येईल, असे काहीही तेथे नव्हते, असे वार्ष्णेय यांचे म्हणणे आहे.

- Advertisement -

कॉल्सवर बंदी घालण्याचे कोणतेही धोरण नसतानाही आणि कोणत्याही तपासाशिवाय, प्रतिवादींनी वार्ष्णेय यांनी सुरक्षेचे गंभीर उल्लंघन केल्याचा दावा केला आणि त्यांना काढून टाकण्यात आले. ते एवढ्यावरच थांबले नाही तर, नोकरीवरून काढताना त्यांना काळ्यायादीत टाकले. त्यामुळे मिसाईल डिफेन्स एजन्सी (MDA) आणि अमेरिकन सरकारमधील त्यांची सेवा आणि कारकीर्द त्वरित संपुष्टात आली, असे वार्ष्णेय यांनी अलाबामाच्या उत्तर जिल्ह्यात जूनमध्ये दाखल करण्यात आलेल्या दाव्यात म्हटले आहे.

या खटल्याचा निकाल देतानाच आपल्याला, त्याच श्रेणीच्या पदावर रुजू करण्यात यावे, तसे करणे शक्य नसल्यास सर्व लाभांसह अग्रिम वेतन तसेच मानसिक छळ आणि भावनिक त्रासासाठी कंपनीकडून दंडात्मक कारवाई करावी तसेच वकिलाचे शुल्क देण्याची भरपाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

कंपनीने आरोप फेटाळले
संबंधित कंपनीने 24 जुलै रोजी न्यायालयात दाखल केलेल्या आपल्या उत्तरात सर्व आरोप फेटाळले आहेत. आमच्याकडून कोणतीही चुकीची कार्यवाही झाली नसल्याचा दावा मिसाईल डिफेन्स कॉन्ट्रॅक्टर पार्सन्स कॉर्पोरेशनने केला असल्याचे या वेबसाइटने म्हटले आहे. वार्ष्णेय यांनी जुलै 2011 ते ऑक्टोबर 2022पर्यंत पार्सन्स हंट्सविले कार्यालयात काम केले आणि त्यांना सिस्टम इंजिनिअरिंगमध्ये ‘कंत्राटदार ऑफ द ईयर’ म्हणून गौरविण्यात आले आणि त्यांना जमिनीवर आधारित क्षेपणास्त्र संरक्षण कार्यक्रमासाठी 5 दशलक्ष डॉलरची बचत केल्याबद्दल मिसाईल डिफेन्स एजन्सीकडून प्रशस्तीपत्रक प्रदान करण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -