सर्व काही रामभरोसे, देशातील 63 पोलीस ठाण्यांकडे वाहनच नाही!

नवी दिल्ली : राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी संबंधित राज्यातील पोलिसांवर असते. कोठेही एखादी घटना घडली तर, पोलिसांना लगेचच घटनास्थळी पोहोचावे लागते. पण देशातील 63 पोलीस ठाणी अशी आहेत, जिथे वाहन देखील नाही. तरीही या पोलीस ठाण्यांचे काम सुरळीत सुरू आहे. एवढेच नव्हे तर, शेकडो पोलीस ठाणी आहेत, जिथे आजही टेलिफोन कनेक्शन नाही.

आजकाल वाढत्या गुन्ह्यांमुळे पोलीस दल आणि पोलीस ठाण्यांचे आधुनिकीकरण करण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. त्यामुळे अनेक पोलीस ठाण्यांमध्ये आता आधुनिक वाहने आणि इतर सुविधा उपलब्ध आहेत. अशा परिस्थितीत वाहनाशिवाय किंवा मोबाईल फोनशिवाय पोलीस ठाणे अस्तित्वात असू शकते, असा विचारही करू शकणार नाही. पण देशात अजूनही अनेक पोलीस ठाणी आहेत ज्यांच्याकडे ना स्वत:चे वाहन आहे ना वायरलेस सेट. केंद्र सरकारनेच लोकसभेत याबाबत माहिती दिली आहे.

देशातील 63 पोलीस ठाण्यांकडे स्वतःचे कोणतेही वाहन नाही. केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी मंगळवारी लोकसभेत ही माहिती दिली. देशात सुमारे 17,535 पोलीस ठाणी कार्यरत आहेत. त्यापैकी 628 पोलीस ठाण्यांमध्ये टेलिफोन कनेक्शन नाही. त्याचबरोबर 285 पोलिस ठाण्यांमध्ये वायरलेस सेट किंवा मोबाईल फोन नाहीत, अशी माहिती नित्यानंद राय यांनी एका लेखी प्रश्नाच्या उत्तरात दिली.

राज्यनिहाय आकडेवारी बघितली तर, झारखंडमध्ये वाहने नसलेल्या पोलिस स्टेशनची संख्या सर्वाधिक आहे. तिथे एकूण 564 पोलीस ठाण्यांपैकी 47 पोलीस स्टेशनमध्ये एकही वाहन नाही. टेलिफोन नसलेली बहुतांश पोलीस ठाणीही याच राज्यात आहेत. 211 पोलीस ठाण्यांमध्ये फोन नाहीत आणि 31 पोलीस ठाण्यांत मोबाईल फोन किंवा वायरलेस सुविधा उपलब्ध नाही. यानंतर मणिपूरचा क्रमांक येतो; जेथे एकूण 84 पोलीस ठाण्यांपैकी 7 पोलीस ठाण्यांमध्ये वाहन नाही. तसेच 64 पोलीस ठाण्यांमध्ये दूरध्वनी कनेक्शन नाही.