घरक्राइमGujarat riots 2002 : बेस्ट बेकरी हत्याकांड प्रकरणात दोघांची निर्दोष मुक्तता

Gujarat riots 2002 : बेस्ट बेकरी हत्याकांड प्रकरणात दोघांची निर्दोष मुक्तता

Subscribe

मुंबई : गुजरातमधील 2002च्या (Gujarat riots 2002) दंगलीतील बेस्ट बेकरी प्रकरणात मुंबईच्या विशेष न्यायालयाने मंगळवारी दोन आरोपींची निर्दोष मुक्तता केली. हर्षद रावजीभाई सोलंकी आणि मफत मणिलाल गोहिल अशी त्यांची नावे आहेत. या घटनेत 14 जणांचा मृत्यू झाला होता.

- Advertisement -

वडोदरा येथील बेस्ट बेकरीवर 3 मार्च 2002 रोजी जवळपास एक हजाराच्या जमावाने हल्ला केला होता. यात, महिला आणि मुलांसह 14 लोकांचा आगीत होरपळून मृत्यू झाला होता. या प्रकरणी 21 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, पुराव्याअभावी वडोदरा कोर्टाने 2003मध्ये सर्वांची निर्दोष मुक्तता केली. यानंतर 2004मध्ये सर्वोच्च न्यायालयाने पुनर्विलोकन याचिकेवर सुनावणी करताना हे प्रकरण महाराष्ट्राकडे वर्ग केले. 24 फेब्रुवारी 2006 रोजी मुंबई न्यायालयाने 9 आरोपींना दोषी ठरवले आणि त्यांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली. तर अन्य 8 आरोपींची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. तर, या प्रकरणातील उर्वरित चार आरोपी फरार होते. त्यांना 2013मध्ये अटक करण्यात आली.

कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले. जुलै 2012मध्ये, उच्च न्यायालयाने नऊपैकी संजय ठक्कर, बहादूर सिंग चौहान, सनाभाई बारिया आणि दिनेश राजभर या चौघांची जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवली. तर राजू बारिया, पंकज गोसावी, जगदीश राजपूत, सुरेश ऊर्फ ​​लालू आणि शैलेश तडवी या पाचजणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली.

- Advertisement -

या प्रकरणात चार फरार आरोपींना 2013मध्ये अटक करण्यात आली होती, पण त्यातील दोघांचा खटल्याची सुनावणी सुरू असतानाच मृत्यू झाला. तर, हर्षद रावजीभाई सोलंकी आणि मफत मणिलाल गोहिल हे 10 वर्षांपासून आर्थर रोड तुरुंगात होते. त्यांचा खटला मुंबईच्या विशेष न्यायालयात सुरू होता. आता त्यांचीही निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

नरोडा दंगलप्रकरणात 11 जण निर्दोष

गुजरातमधील नरोडा गाव दंगलप्रकरणी एप्रिल 2023मध्ये विशेष न्यायालयाने 68 आरोपींची निर्दोष मुक्तता केली होती. यामध्ये गुजरातच्या माजी मंत्री आणि भाजपा नेत्या माया कोडनानी आणि बजरंग दलाचे नेते बाबू बजरंगी यांचा समावेश होता. 2002मध्ये गोध्राकांडानंतर गुजरातमध्ये दंगल उसळली होती आणि नरोडा दंगलीत 11 जणांचा मृत्यू झाला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -