घरदेश-विदेशOnion export : ...मग उशिरा सुचलेल्या शहाणपणाचे ढोल बडवा, ठाकरे गटाने मोदी...

Onion export : …मग उशिरा सुचलेल्या शहाणपणाचे ढोल बडवा, ठाकरे गटाने मोदी सरकारला सुनावले

Subscribe

महाराष्ट्रातील शेतकरी आणि जनता तुमच्या या मखलाशीला अजिबात भुलणार नाही. तुमचे गुजरातप्रेमाचे पितळ कांद्याच्या निमित्ताने पुन्हा उघडे पडले. महाराष्ट्राची कांदा निर्यातबंदी हटवून तुम्ही येथील शेतकऱ्याला ‘गिफ्ट’ वगैरे काही दिलेले नाही, असे ठाकरे गटाने म्हटले आहे.

मुंबई : मोदी सरकारला महाराष्ट्राची कांदा निर्यातबंदी उठविणे भाग पडले आहे. मोदी सरकारला खरोखरच महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांना ‘गिफ्ट’ द्यायचे होते तर त्यांनी आधी फक्त गुजरातमधील पांढऱ्या कांद्यालाच निर्यातीची परवानगी का दिली? महाराष्ट्र आणि गुजरात असा वेगवेगळा न्याय का लावला? महाराष्ट्रावर विनाकारण लादलेली कांदा निर्यातबंदीदेखील गुजरातसोबतच का नाही उठवली? आधी या प्रश्नांची उत्तरे द्या आणि मग उशिरा सुचलेल्या या शहाणपणाचे ढोल बडवा, असे ठाकरे गटाने सुनावले आहे. (Lok Sabha Election 2024: Thackeray group criticizes Modi government over onion export)

कांदा निर्यातबंदी उठविण्यावरून सत्तापक्ष स्वतःच स्वतःची पाठ थोपटून घेत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना ‘गिफ्ट’ दिले, अशा पिपाण्या वाजवीत आहे. मात्र हे गिफ्ट वगैरे काही नाही. महाराष्ट्रातील जनक्षोभासमोर मोदी सरकारने घातलेले शेपूट आहे, अशी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने सामना दैनिकातील अग्रलेखात म्हटले आहे.

- Advertisement -

वस्तुस्थिती हीच आहे की, गुजरात आणि महाराष्ट्राला लावलेला वेगळा न्याय लोकसभा निवडणुकीत आपल्याला फटका देईल, मतांचा तराजू आपल्या बाजूने झुकणार नाही, या वास्तवाची जाणीव मोदी यांच्या महाराष्ट्रातील चेल्याचपाट्यांना झाली. येथील शेतकरी आणि विरोधकांच्या संतापाच्या ठिणग्यांचे चटके मोदी यांच्या महाराष्ट्रातील सभांना आणि आपल्या उमेदवारांना बसतील, हे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळेच फोनाफोनी झाली आणि घाईगडबडीत महाराष्ट्रातीलही कांदा निर्यातबंदी उठवल्याचे जाहीर करण्यात आले, असा दावा अग्रलेखात करण्यात आला आहे.

- Advertisement -

अर्थात, हे तुम्हाला उशिरा सुचलेले शहाणपण आहे. महाराष्ट्रातील शेतकरी आणि जनता तुमच्या या मखलाशीला अजिबात भुलणार नाही. तुमचे गुजरातप्रेमाचे पितळ कांद्याच्या निमित्ताने पुन्हा उघडे पडले. महाराष्ट्राची कांदा निर्यातबंदी हटवून तुम्ही येथील शेतकऱ्याला ‘गिफ्ट’ वगैरे काही दिलेले नाही, असे ठाकरे गटाने या अग्रलेखात म्हटले आहे.

केंद्रातील सत्ताधाऱ्यांचा त्यांच्या ‘होम स्टेट’बद्दलचा उमाळा आणि महाराष्ट्राविषयी असलेला द्वेष मागील दहा वर्षांत वेळोवेळी उफाळून आलाच आहे. देशाच्या प्रमुखासाठी देशाची जनता समान हवी. मात्र सध्याच्या राज्यकर्त्यांचे सगळेच उफराटे आहे. सत्तेत आल्यापासून त्यांचे पारडे कायम त्यांच्या मातृराज्याकडेच झुकलेले आहे. त्यातही गोष्ट महाराष्ट्राची असली की, गुजरातचे पारडे खाली आणि महाराष्ट्राचे पारडे वर, असेच त्यांचे धोरण राहिले आहे, अशी घणघाती टीका ठाकरे गटाने केली आहे.


Edited by Manoj S. Joshi

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -