घरदेश-विदेशDer Spiegel : दिल्लीतील मेट्रो सर्वोत्कृष्ट, व्यंगचित्राबाबत जर्मनीच्या राजदूतांची प्रतिक्रिया

Der Spiegel : दिल्लीतील मेट्रो सर्वोत्कृष्ट, व्यंगचित्राबाबत जर्मनीच्या राजदूतांची प्रतिक्रिया

Subscribe

नवी दिल्ली : भारत नुकताच जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश बनला आहे. याची खिल्ली उडवत जर्मनीच्या डेर स्पीगल (Der Spiegel) या नियतकालिकाने एक व्यंगचित्र प्रकाशित केले. लोकसंख्येच्या बाबतीत भारत चीनला मागे टाकत असल्याचे व्यंगचित्रातून दाखवण्यात आले आहे. याबाबत केंद्र सरकारच्या वतीने आक्षेपही नोंदविण्यात आला होता. आता भारतातील जर्मनीचे राजदूत फिलिप अकरमन (German envoy to India Philipp Ackermann) यांनी देखील यावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.

- Advertisement -

हे व्यंगचित्र हास्यास्पदही नाही आणि योग्यही नाही, असे माझे वैयक्तिक मत आहे. मी या व्यंगचित्रकाराला माझ्यासोबत दिल्लीतील मेट्रोमध्ये (Delhi Metro) सफर करण्यासाठी आमंत्रित करू इच्छितो. जर्मनीतील अनेक मेट्रो या दिल्ली मेट्रोइतक्या चांगल्या नाहीत, असे मला वाटते. जर्मनीची रेल्वे व्यवस्थाही इथल्या तुलनेत तितकीशी चांगली नाही, अशी प्रतिक्रिया जर्मनीचे राजदूत फिलिप अकरमन यांनी डेर स्पीगल या जर्मन नियतकालिकात प्रकाशित झालेल्या व्यंगचित्रावर दिली आहे. तसेच, या व्यगंचित्रकाराने भारताबद्दल थोडी अधिक माहिती घ्यायला हवी. भारताची रेल्वेव्यवस्था किती अत्याधुनिक आहे हे समजून घ्यायला हवे, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.

डेर स्पीगल नियतकालिकातील व्यंगचित्रात दोन गाड्या दाखविण्यात आल्या आहेत. एका बाजूला माणसांनी खचाखच भरलेली जीर्ण जुन्या पद्धतीची भारतीय रेल्वे दाखवली आहे. या गाडीच्या छतावर लोक भारतीय तिरंगा घेऊन बसले आहेत. तर दुसरीकडे, चीनची बुलेट ट्रेन एका वेगळ्या ट्रॅकवर दिसत आहे. ज्यामध्ये फक्त दोन चालक बसलेले आहेत. या व्यंगचित्राच्या माध्यमातून चीनची तांत्रिक प्रगती देखील दाखवण्यात आली आहे, तर भारताच्या पायाभूत सुविधा ढासळत आहे, असे दाखवण्याचा प्रयत्नही या व्यंगचित्रात करण्यात आला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या आकडेवारीनुसार भारताची लोकसंख्या 142.86 कोटी झाली आहे. तर चीनची लोकसंख्या 142.57 कोटी आहे.

- Advertisement -

केंद्रीय राजीव चंद्रशेखर यांचा संताप
डेर स्पीगलमधील व्यंगचित्राबाबत केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञानमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी संताप व्यक्त केला आहे. डेर स्पीगलच्या व्यंगचित्रकारने भारताची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भारताविरुद्ध पैज लावणे शहाणपणाचे नाही. येत्या काही वर्षांत भारताची अर्थव्यवस्था जर्मनीपेक्षा मोठी होईल, असे ट्वीट त्यांनी केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -