घरदेश-विदेशरश्मिकाच्या 'त्या' व्हिडीओमुळे मोदी सरकार अॅक्शन मोडमध्ये; दोषीला होणार 3 वर्षांची शिक्षा...

रश्मिकाच्या ‘त्या’ व्हिडीओमुळे मोदी सरकार अॅक्शन मोडमध्ये; दोषीला होणार 3 वर्षांची शिक्षा आणि 1 लाखांचा दंड

Subscribe

रश्मिका मंदानाचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता मोदी सरकारने पुन्हा एकदा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर AI शी निगडित नियमांची आठवण करून देणारं स्मरणपत्र पोस्ट केलं आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसाठी एक एडवायजरी जारी केली आहे.

मुंबई: अभिनेत्री रश्मिका मंदाना हिचा एक बनावट डीपफेक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ AI चा वापर करून करण्यात आला आहे. त्यामुळे आता आर्टीफिशिअल इंटलिजन्सबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. रश्मिका मंदानाचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता मोदी सरकारने पुन्हा एकदा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर AI शी निगडित नियमांची आठवण करून देणारं स्मरणपत्र पोस्ट केलं आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसाठी एक एडवायजरी जारी केली आहे. यात अशा डीपफेक व्हिडीओ तयार करणाऱ्यावर कोणती कायदेशीर कारवाई केली जाणार तसंच किती दंड ठोठावला जाईल, याबाबत माहिती देण्यात आली आहे. (Modi government in action mode due to Rashmika Mandana s video 3 years imprisonment and 1 lakh fine)

प्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका मंदानाचा जो ‘डीपफेक व्हिडिओ’ तयार करण्यात आला आहे तो खरं तर एका ब्रिटीश-भारतीय सोशल मीडिया युजर झारा पटेलचा आहे. हा खरा व्हिडिओ समोर आल्यानंतर, ‘डीपफेक्स’ सारख्या प्रकरणांना सामोरे जाण्यासाठी कायदेशीर आणि नियामक फ्रेमवर्कची तातडीने गरज असल्याची चर्चा भारतात सुरू आहे. ‘गुडबाय’ चित्रपटातील मंदानाचे सहकलाकार अमिताभ बच्चन यांनी याप्रकरणी कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. यावर बच्चन यांनी सर्वप्रथम प्रतिक्रिया दिली.

- Advertisement -

आता केंद्र सरकारही यावर आक्रमक असल्याचे दिसून येत आहे. NDTV ने सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की सरकारने माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 च्या कलम 66D चा हवाला दिला आहे. या कलमानुसार, कोणत्याही दळणवळणाच्या साधनाद्वारे किंवा कम्प्युटरद्वारे असे व्हिडीओ तयार करुन फसवणूक केली तर त्या व्यक्तीला तीन वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा दिली जाईल आणि 1 लाख रुपयांपर्यंत दंडही होऊ शकतो.

सरकारने ही एडवायजरी रश्मिका मंदानाच्या व्हायरल व्हिडिओनंतर लगेचच जारी केली आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) वापरून या महिलेचा (झारा पटेल) चेहरा मंदानासारखा दिसण्यासाठी फेरफार करण्यात आला. ‘डीपफेक’ ही एक डिजिटल पद्धत आहे ज्याच्या अंतर्गत, AI चा वापर करून, वापरकर्ता सहजपणे एखाद्या व्यक्तीचा चेहरा दुसऱ्या व्यक्तीच्या चेहऱ्यासह बदलू शकतो.

- Advertisement -

मंदानाने सोमवारी इन्स्टाग्रामच्या माध्यमातून आपली चिंता व्यक्त केली. मंदाना म्हणाली की व्हिडिओ पाहिल्यानंतर तिला ‘खूप दु:ख झालं’, रश्मिकाने लिहिले की, आज एक महिला आणि अभिनेत्री म्हणून मी माझे कुटुंब, मित्र आणि हितचिंतक यांची आभारी आहे जे माझे संरक्षक आणि सपोर्ट सिस्टम आहेत. ती म्हणाली, “पण मी शाळा किंवा कॉलेजमध्ये असताना असे काही घडले असते, तर मी त्याला कसे सामोरे गेले असते याची मी प्रामाणिकपणे कल्पनाही करू शकत नाही. आपल्या अधिकांवर याचा परिणाम होण्याआधी आम्हाला कारवाई करणे आवश्यक आहे.

याशिवाय जिचा हा खरा व्हिडीओ आहे त्या झारा पटेलनेही मंदानाच्या डीपफेक व्हिडिओचा निषेध केला आणि क्लिपशी तिचा काहीही संबंध नसल्याचे सांगितले. पटेल हिने इंस्टाग्रामवर लिहिले की, नमस्कार, मला कळले की कोणीतरी माझ्या शरीराचा आणि एका लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्रीचा चेहरा वापरून डीपफेक व्हिडिओ बनवला आहे. डीपफेक व्हिडिओशी माझा काहीही संबंध नाही आणि जे काही घडत आहे त्याने मी खूप अस्वस्थ आणि निराश आहे. तिने लिहिले की, मला महिला आणि मुलींच्या भवितव्याबद्दल अधिक काळजी वाटते. पटेल म्हणाली की, तुम्ही इंटरनेटवर जे काही पाहता, ते तथ्य तपासा. इंटरनेटवरील सर्व काही खरे नाही. जे घडत आहे त्यामुळे मी खूप व्यथित झाले आहे.

(हेही वाचा: ‘टायगर ३’ च्या सेटवर अॅक्शन सीनदरम्यान सलमानला झाली होती दुखापत )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -