घरदेश-विदेशलखीमपूर खेरी हिंसाचारावरुन लोकसभेत गदारोळ; दोन्ही सभागृहांचं कामकाज उद्यापर्यंत स्थगित

लखीमपूर खेरी हिंसाचारावरुन लोकसभेत गदारोळ; दोन्ही सभागृहांचं कामकाज उद्यापर्यंत स्थगित

Subscribe

लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी आज लोकसभेत स्थगन प्रस्तावाची सूचना दिल्यानंतर बराच गदारोळ झाला. त्यामुळे सभागृहाचे कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब करावे लागले. केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय टेनी यांना बडतर्फ करण्याची मागणी करत राहुल गांधी यांनी हा स्थगन प्रस्ताव दिला. त्याचवेळी खासदारांच्या निलंबनाच्या मुद्द्यावरून विरोधकांनी राज्यसभेत गदारोळ केल्याने सभागृहाचे कामकाज दुपारी १२ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले.

याशिवाय, लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी विरोधकांच्या गदारोळात आणि सततच्या घोषणाबाजीत प्रश्नोत्तराचा तास चालवण्याचा प्रयत्न केला. मात्र विरोधी पक्षांचा गोंधळ सुरूच होता. गदारोळ आणि घोषणाबाजीमुळे सभागृहाचे कामकाज विस्कळीत झाल्याने लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सभागृहाचे कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब केले.

- Advertisement -

त्यानंतर सभागृहाचे कामकाज सुरू होताच काँग्रेससह अनेक विरोधी पक्षांच्या नेत्यांनी लखीमपूर खेरी घटनेवरील एसआयटी अहवाल आणि मंत्रिपदाच्या राजीनाम्यासाठी दिलेली स्थगन प्रस्तावाची नोटीस यावर चर्चेची मागणी करत गदारोळ सुरू केला. विरोधी पक्षांचे खासदारही या मुद्द्यावरून सातत्याने घोषणाबाजी करत होते. या पार्श्वभूमीवर लोकसभा अध्यक्षांनी लोकसभेचे कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब केले होते. त्यानंतर पुन्हा एकदा सभागृहाचं कामकाज सुरु झाल्यानंतर विरोधकांनी घोषणाबाजी करायला सुरुवात केली. अखेर लोकसभा उद्या ११ वाजेपर्यंत स्थगित करण्यात आली.

राहुल गांधींच्या आरोपावर पियुष गोयल यांचं प्रत्युत्तर

लखीमपूर खेरी हिंसाचारावरील एसआयटीच्या अहवालाबाबत लोकसभेत बोलू न दिल्याच्या राहुल गांधींच्या आरोपाला उत्तर देताना केंद्रीय मंत्री आणि राज्यसभेतील सभागृह नेते पीयूष गोयल म्हणाले की, लखीमपूर खेरी प्रकरणाचा तपास सर्वोच्च न्यायालयाच्या आणि सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली करण्यात आला होता. स्थगन प्रस्तावाच्या राहुल गांधींच्या सूचनेला उत्तर देताना आणि त्यांना सभागृहात बोलू दिले जात नसल्याचा आरोपावर पियुष गोयल म्हणाले की, हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे आणि न्यायालयाच्या अंतर्गत प्रलंबित असलेल्या प्रकरणावर सभागृहात चर्चा होत नाही.

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -