घरदेश-विदेशशिक्षेला स्थगिती नाहीच शिक्षेविरोधात राहुल गांधींची सुरत सत्र न्यायालयात धाव

शिक्षेला स्थगिती नाहीच शिक्षेविरोधात राहुल गांधींची सुरत सत्र न्यायालयात धाव

Subscribe

आव्हान याचिकेवर १३ एप्रिलला सुनावणी, पुढील सुनावणीपर्यंत जामीन कायम राहणार

मोदी आडनावाच्या बदनामीप्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सुरत महानगर दंडाधिकारी न्यायालयाने २ वर्षांची शिक्षा आणि १५ हजारांचा दंड ठोठावला होता. मुख्य न्यायदंडाधिकार्‍यांनी सुनावलेल्या या शिक्षेविरोधात सोमवारी राहुल गांधी यांच्या वतीने सुरत सत्र न्यायालयात आव्हान याचिका दाखल करण्यात आली. राहुल गांधींनी एकूण २ याचिका दाखल केल्या. त्यापैकी एक याचिका जामीन मिळण्याबाबत होती, तर दुसरी याचिका शिक्षेला आव्हान देणारी होती.

त्यापैकी जामीन अर्जावर सुनावणी करताना न्यायालयाने राहुल गांधींना १३ एप्रिल रोजी होणार्‍या पुढील सुनावणीपर्यंत जामीन कायम ठेवला आहे, मात्र त्यांच्या शिक्षेला अद्याप स्थगिती मिळालेली नाही. शिक्षा रद्द करण्याच्या याचिकेवर ३ मे रोजी सुनावणी होईल. न्यायालयाने याचिकाकर्त्याची बाजू ऐकल्याशिवाय सुनावणी करणार नसल्याचे स्पष्ट केले. परिणामी न्यायालयाने याचिकाकर्ते व भाजप नेते पूर्णेश मोदी यांना प्रत्युत्तर सादर करण्यासाठी नोटीस बजावली आहे. त्यावर १० एप्रिलपर्यंत त्यांना आपले प्रत्युत्तर सादर करायचे आहे.

- Advertisement -

सुरत सत्र न्यायालयात जाताना राहुल गांधी यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. यावेळी त्यांच्यासोबत काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी व कार्यकर्त्यांचा ताफा होता. तसेच राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल आणि हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुख्खूदेखील सुरतला पोहचले होते.

सर्व चोरांचे आडनाव मोदीच कसे, असे वक्तव्य राहुल गांधी यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात केले होते. याविरोधात पूर्णेश मोदी यांनी सुरत महानगर दंडाधिकारी न्यायालयात तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी दोषी धरत गेल्या महिन्यात सुरत न्यायालयाने राहुल गांधी यांना २ वर्षांची शिक्षा ठोठावली. त्यानंतर लगेचच न्यायालयाने राहुल गांधी यांना जामीन मंजूर केला. या शिक्षेविरोधात आव्हान याचिका दाखल करण्यासाठी न्यायालयाने राहुल गांधी यांना ३० दिवसांची मुदत दिली होती. दरम्यान, २ वर्षांची शिक्षा झाल्याने राहुल गांधी यांची खासदारकी लोकसभा सचिवालयाने रद्द केली. न्यायालयाने या शिक्षेला स्थगिती दिली तर राहुल गांधी यांच्या खासदारकीला संजीवनी मिळू शकते.

- Advertisement -

सत्र न्यायालयात शिक्षेला आव्हान दिल्यानंतर राहुल गांधी यांनी उद्योगपती गौतम अदानी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संबंधावरून ट्विट केले. मित्र काळाच्या विरोधात लोकशाही वाचवण्याची ही लढाई आहे. या संघर्षात सत्य हे माझे अस्त्र आहे आणि सत्याचाच मला आधार आहे, अशा आशयाचे ट्विट राहुल गांधी यांनी केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -