घरसंपादकीयअग्रलेखरेल्वे लोकलना सायडिंगचा शाप!

रेल्वे लोकलना सायडिंगचा शाप!

Subscribe

लांब पल्ल्यांच्या जलद रेल्वे गाड्यांना प्राधान्य देण्यासाठी विरार ते डहाणू दरम्यान लोकल गाड्यांना सायडिंगला काढून थांबवून ठेवण्याच्या कृतीला यापूर्वी गुजरातच्या वलसाड येथील नियंत्रण कक्षाला जबाबदार धरले जायचे, परंतु नियंत्रण कक्ष मुंबई सेंट्रल येथे आणल्यानंतरही लांब पल्ल्यांच्या गाड्यांना प्राधान्य दिले जात असल्याने लोकलचे वेळापत्रक विस्कळीत झालेले आहे. त्यामुळे हजारो प्रवाशांची दररोज रखडपट्टी होंते. विरार ते डहाणू दरम्यान उपनगरीय रेल्वे सेवा सुरू करण्यासाठी अनेक वर्षे आंदोलने झाली. त्यानंतर लोकल सेवा सुरू झाली असली तरी गाड्यांची संख्या कमी आहे. अजूनही दैनंदिन प्रवास करणार्‍या प्रवाशांना लांब पल्ल्यांच्या गाड्यांवर अवलंबून राहावे लागते.

यापूर्वी विरार ते डहाणू लोकल गाड्यांचे नियोजन गुजरातमधील वलसाड नियंत्रण कक्षातून केले जात असे. गाड्यांच्या विलंबाला प्राधान्यक्रम देण्यास वलसाड नियंत्रण कक्ष जबाबदार असल्याची सबब रेल्वेचे मुंबईतील अधिकारी करत असत. जानेवारीपासून वलसाड नियंत्रण कक्षातील अधिकारी, कर्मचार्‍यांना टप्प्याटप्प्याने मुंबई येथे स्थलांतरित करण्यात आले. तसेच २४ फेब्रुवारीपासून पश्चिम रेल्वेच्या वलसाड सुरतपर्यंतच्या गाड्यांचे नियंत्रण मुंबईहून होऊ लागले असले तरी गाड्यांच्या नियमिततेत विशेष फरक झाला नाही. मध्य रेल्वेवरही अशीच परिस्थिती आहे, लांब पल्ल्यांच्या गाड्यांना पुढे जाऊ देण्यासाठी लोकल गाड्यांना कल्याण येथे बाजूला थांबवण्यात येते. त्यामुळे प्रवाशांची रखडपट्टी होते.

- Advertisement -

पॅसेंजर, फ्लाईंग राणीसह इतर काही गाड्या तसेच उपनगरीय सेवांच्या नवीन वेळापत्रकामध्ये वेळेत बदल करण्यात आले असले तरी बदललेल्या वेळानुसार अधिक गाड्या धावत नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. अनेक लोकल गाड्या व पॅसेंजर गाड्या केळवे रोड अथवा वाणगाव येथे सायडिंगला काढून थांबवल्या जात आहेत. दोन ते चार जलद गाड्या, मालगाड्या पुढे प्राधान्याने काढण्यात येतात. त्यामुळे लोकल गाड्यांचं वेळापत्रकच बिघडून गेलं असून प्रवाशांना आपल्या नियोजित ठिकाणी पोहचण्यास विलंब होत आहे. यामुळे पश्चिम रेल्वेने वेळापत्रकात केलेले बदल अप्रभावी ठरल्याचे दिसून आले आहे. पश्चिम रेल्वे गाड्यांच्या सुरुवातीच्या स्थानकापासून त्याच्या अंतिम स्थानकापर्यंत पोहचणार्‍या वेळापत्रकातील वेळेनुसार गाडीच्या नियमिततेचा आढावा घेतला जातो.

वेळापत्रकात अनेकदा गाड्यांचा प्रवास वेळ अतिरिक्त वेळेत समाविष्ट होतो. प्रवासादरम्यान स्थानकांवर होणार्‍या विलंबाचा वेळ अभ्यासला जात असून प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आलं आहे. त्यानंतरही लोकल सेवेला रेल्वे प्रशासन दुय्यम स्थान देत असल्याचं दिसून येत आहे. विरार ते डहाणू रोड या पश्चिम रेल्वे मार्गावर लाखो प्रवासी प्रवास करतात. त्यांचा प्रवास सुलभ व्हावा यासाठी गाड्यांची आणि त्यांच्या फेर्‍यांची संख्या वाढवण्याची मागणी करण्यात आली होती, मात्र गाड्यांची संख्या वाढवण्यात ट्रॅक क्षमता मर्यादेचे कारण पुढे येत होते. त्यामुळे या मार्गाचे चौपदरीकरण करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाकडून घेण्यात आला.

- Advertisement -

या प्रकल्पासाठी भूसंपादनाचा प्रस्ताव पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात ऑगस्ट २०१७ मध्ये तयार करण्यात आला होता. साडेतीन हजार कोटी खर्चून होणार्‍या विरार-डहाणू चौपदरीकरणाचं काम सुरू आहे. विरार-डहाणू दरम्यानच्या स्थानकांमध्ये ८ ते १२ कि.मी.चे अंतर असल्याने चौपदरीकरणात आणखी काही स्थानके वाढवण्यात येणार आहेत. पश्चिम रेल्वेवरील लांब पल्ल्यांच्या मेल-एक्स्प्रेससह मालवाहतुकीला मोठा दिलासा मिळणार आहे. मुंबई शहरी वाहतूक प्रकल्प-३ मधील विरार-डहाणू रोड प्रकल्पाला निधी पुरवण्याबाबत जागतिक बँक आग्रही असल्याचं सांगितलं जातं. असं असलं तरी चौपदरीकरणाचं काम अगदीच कासवगतीने सुरू आहे. भूसंपादनात भूमी अधिग्रहणात येत असलेल्या अडचणींमुळे हे काम अवघे ३० टक्केच झाले आहे. त्यामुळे विरार-डहाणू रेल्वे चौपदरीकरण पूर्ण होण्यास अजून किमान एक वर्ष लागेल असे दिसते.

एकीकडे, चौपदरीकरणाचं काम भूसंपादनामुळे कासवगतीने सुरू असतानाच मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी भूसंपादनाला प्राधान्य देण्यात येत आहे. इतकंच नाही तर महाविकास आघाडीने रोखलेला बुलेट ट्रेनचा मार्ग आता शिंदे-फडणवीस सरकारने मोकळा केला आहे. त्यासाठी हजारो कोटी रुपयेही दिले आहेत. त्यामुळे बुलेट ट्रेनच्या कामाने गती घेतली आहे. पालघर जिल्ह्यातील स्थानिकांची हजारो हेक्टर जमीन ताब्यात घेण्यात आली आहे. त्यासाठी मोबदलाही भरघोस दिला गेला आहे. असं असलं तरी बुलटे ट्रेनचा या परिसरातील स्थानिकांना तसा काहीच उपयोग नाही. स्थानिक रोजगारासाठी मुंबईवर अवलंबून आहेत. त्यासाठी लोकल हीच त्यांची जीवनवाहिनी आहे, पण तिची गती धीमी करण्यात आल्याने स्थानिकांना फटका बसत आहे, याकडे रेल्वे प्रशासन दुर्लक्ष करताना दिसत आहे.

लांब पल्ल्यांच्या गाड्यांना विरारपलीकडील महत्वाच्या रेल्वे स्थानकांवर थांबा दिल्यास प्रवाशांची गैरसोय थोडी का होईना कमी होईल. उलट रेल्वे प्रशासनाने काही लांब पल्ल्यांच्या गाड्यांचे थांबेच बंद केले आहेत. ते सुरू करण्यासाठी अनेक पातळीवर प्रयत्न केल्यानंतर गेल्या आठवड्यात दोन गाड्यांना पालघर रेल्वे स्थानकात पुन्हा थांबा देणं सुरू केले आहे. बुलेट ट्रेनसाठी प्राधान्याने काम केलं जात असताना रेल्वे प्रशासन डबे उपलब्ध नसल्याचं कारण देत डहाणूपर्यंत लोकलच्या फेर्‍या वाढवण्याची मागणी टाळत आहे. विरार-डहाणू दरम्यान मोजक्याच लोकल धावत आहेत. दोन गाड्यांमधील वेळेचं अंतरही कमी केलं जात नाही. त्यामुळे होत असलेल्या जीवघेण्या गर्दीत प्रवाशांचा जीव मेटाकुटीस येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -