घरदेश-विदेशPakistan : शाहबाज शरिफ दुसऱ्यांदा पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी, सोमवारी घेणार शपथ

Pakistan : शाहबाज शरिफ दुसऱ्यांदा पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी, सोमवारी घेणार शपथ

Subscribe

नवी दिल्ली : पीएमएल-एनचे वरिष्ठ नेते आणि पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांचे भाऊ शाहबाज शरीफ यांची दुसऱ्यांदा पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी निवड झाली आहे. शनिवार, 2 मार्च रोजी त्यांनी पंतप्रधानपदासाठी अर्ज दाखल केला होता. रविवार, 3 मार्च रोजी पाकिस्तानच्या पंतप्रधानपदाची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत पुन्हा एकदा शाहबाज शरीफ (Shehbaz Sharif) यांचा विजय झाला. शरिफ यांच्याशिवाय, उमर अयूब खान यांनीही पंतप्रधानपदासाठी अर्ज केला होता. मात्र, या निवडणुकीत उमर अयुब खान यांना पाठिंबा मिळाला नाही. शाहबाज शरीफ हे पाकिस्तानचे 33 वे पंतप्रधान आहेत.

सोमवारी घेणार शपथ

पीएमएल-एनने पीपीपी आणि एमक्यूएमसोबत आघाडी करून सरकार स्थापन केले आहे. सोमवारी राष्ट्रपती भवनात शाहबाज शरीफ यांचा शपथविधी सोहळा होणार आहे. शाहबाज शरीफ हे एप्रिल 2022 ते ऑगस्ट 2023 पर्यंत पाकिस्तानचे पंतप्रधान होते. त्यावेळीही त्यांनी पीपीपीसोबत आघाडी करत सत्ता स्थापन केली होती.

- Advertisement -

हेही वाचा – Maratha Reservation : ‘देवेंद्र फडणवीस भाजपमध्ये आहेत तोपर्यंत…’; मराठा समाजाने घेतली शपथ

बहुमताचा आकडा सहज केला पार

पंतप्रधान म्हणून निवडून येण्यासाठी शाहबाज शरीफ यांना 336 सदस्यीय सिनेटमध्ये 169 मतांची गरज होती. शाहबाज शरीफ यांनी हा आकडा सहजरित्या गाठला. पीएमएल-एन आणि पाकिस्तान पीपल्स पार्टी (पीपीपी) यांचे संयुक्त उमेदवार शाहबाज यांना 336 सदस्यांच्या सभागृहात 201 मते मिळाली. सध्या तुरुंगात असलेले माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) या पक्षाचे उमेदवार उमर अयुब खान यांना 92 मते मिळाली. यावेळी पीटीआय समर्थक खासदारांनी घोषणाबाजी केली.

- Advertisement -

हेही वाचा – Sunetra Pawar : “यंदा भाकरी फिरणार अन्…”; कार्यकर्त्यांच्या स्टेटसची जोरदार चर्चा

पीएमएल-एनचे प्रमुख नवाझ शरीफ गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये पाकिस्तानचे पंतप्रधान होण्याच्या आशेने तब्बल चार वर्षांनी पाकिस्तानात परतले. आपल्या पक्षाला स्पष्ट बहुमत मिळेल आणि ते चौथ्यांदा देशाच्या पंतप्रधानपदावर विराजमान होतील, अशी आशा नवाझ शरीफ यांना होती. तथापि, 8 फेब्रुवारी रोजी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत पीएमएल-एनला स्पष्ट बहुमत मिळाले नाही. तुरुंगात असलेल्या इम्रान खान यांच्या पक्षाने पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवारांना 90 पेक्षा जास्त जागा जिंकण्यात यश आले. तर पीएमएल-एनला 75 तर पीपीपीने 54 जागा जिंकल्या. कोणालाच स्पष्ट बहुमत न मिळाल्याने पीपीपी पक्षाचे बिलावल भुट्टो झरदारी यांनी पंतप्रधानपदाच्या शर्यतीतून माघार घेतली. आणि पीएमएल-एन सोबत आघाडी सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला. मुत्ताहिदा कौमी मुव्हमेंट पाकिस्तान आणि इस्तेहकाम-ए-पाकिस्तान पार्टीचाही या आघाडीत समावेश आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -