घरदेश-विदेशदेशभरात अग्निपथ : नव्या लष्करी योजनेला ६ राज्यांत तीव्र विरोध

देशभरात अग्निपथ : नव्या लष्करी योजनेला ६ राज्यांत तीव्र विरोध

Subscribe

अग्निपथचा विरोध करताना गुरुवारी बिहारमधील मुंगेर, सफियासराय, जहानाबाद, बक्सर, आराह, भभुआ भागांत तरुणांनी तीव्र आंदोलन केले. जहानाबादमध्ये आंदोलकांनी राष्ट्रीय महामार्गावर जाळपोळ केली. बक्सर, मुजफ्फरपूरमध्ये जोरदार दगडफेकही करण्यात आली.

लष्करात भरतीसाठी केंद्र सरकारने आणलेल्या शॉर्ट टर्म अग्निपथ योजनेला देशभरातील तरुणांकडून जोरदार विरोध होत आहे. विशेषत: बुधवारी बिहारमधून सुरू झालेल्या या विरोधाचे लोण उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, हरियाणा, हिमाचल प्रदेश, दिल्ली अशा ६ राज्यांमध्ये पोहचले आहे. अनेक वर्षांपासून सैन्यात भरतीची तयारी करणारे तरुण अग्निपथ भरती योजनेला विरोध करीत आहेत. केवळ ४ वर्षांच्या अग्निपथ योजनेमुळे लष्करात दीर्घ कालावधीसाठी भरती होण्याची शक्यता मावळेल. ४ वर्षांनंतर लष्करातून बाहेर पडणार्‍या बहुसंख्य अग्निवीरांच्या हाताला काम राहणार नाही आणि बेरोजगारी वाढेल. त्यामुळे केंद्र सरकारने हा निर्णय मागे घ्यावा, या मागणीसाठी हे तरुण रस्त्यावर उतरले आहेत, तर दुसरीकडे अग्निपथ योजनेतून बाहेर पडणार्‍या ७५ टक्के अग्निवीरांना आसाम रायफल्स किंवा अन्य केंद्रीय सशस्त्र दलांच्या भरतीत प्राधान्य दिले जाईल, असे स्पष्टीकरण देत केंद्रीय गृह मंत्रालयाने तरुणांचा प्रक्षोभ थांबवण्याचा प्रयत्न केला आहे.

अग्निपथचा विरोध करताना गुरुवारी बिहारमधील मुंगेर, सफियासराय, जहानाबाद, बक्सर, आराह, भभुआ भागांत तरुणांनी तीव्र आंदोलन केले. जहानाबादमध्ये आंदोलकांनी राष्ट्रीय महामार्गावर जाळपोळ केली. बक्सर, मुजफ्फरपूरमध्ये जोरदार दगडफेकही करण्यात आली. बक्सर रेल्वे स्थानकावरून जाणार्‍या पाटलीपुत्र एक्स्प्रेसवर आंदोलकांनी दगडफेक केली. आंदोलकांनी छपरा आणि कैमूरमध्ये पॅसेंजर रेल्वेगाड्या जाळल्या. छपरा जंक्शन येथे सुमारे १२ गाड्यांची तोडफोड करीत ३ गाड्या जाळल्या, तर भभुआ स्थानकावर संतापलेल्या आंदोलनकर्त्यांनी पाटना भभुआ इंटरसिटी एक्स्प्रेसला आग लावली. नवाडा येथील भाजप कार्यालयावर हल्ला करण्यात आला. अराहमध्ये आंदोलनकर्त्यांना रोखण्यासाठी पोलिसांना अश्रूधुराच्या नळकांड्यादेखील फोडाव्या लागल्या.

- Advertisement -

हरियाणातील रोहतकमध्ये एका विद्यार्थ्याने नैराश्यातून आत्महत्या केली. पलवलमध्ये गोंधळ घालणार्‍या विद्यार्थ्यांनी पोलिसांची तीन वाहने जाळली. हिमाचल प्रदेशातील धर्मशाला येथे निवडणूक प्रचारासाठी मोदींच्या रॅलीला विरोध करण्यासाठी जाणार्‍या तरुणांना रोखण्यात आले. उत्तर प्रदेशातही आंदोलनकर्ते आणि पोलिसांमध्ये चकमक झाली. गुरुग्राममध्ये दिल्ली-जयपूर महामार्ग रोखण्यात आला.

विरोधामागची कारणे कोणती?
दीर्घ कालावधीसाठी लष्कर सेवेची संधी हुकणार
१४ वर्षांनंतर लष्कर सोडणारे २ टक्केच माजी सैनिक दुसरी नोकरी मिळवण्यात यशस्वी
४ वर्षांनंतर बेरोजगार होण्याची तरुणांना भीती
ट्रेनिंग कालावधी केवळ ६ महिन्यांचा असल्याने व्यावसायिक लष्कराच्या मानकांशी तडजोड
समाजाच्या लष्करीकरणाचा धोका निर्माण होईल
मोटिव्हेशन लेव्हल कमी होण्याची शक्यता
पहिल्या वर्षी कापून मिळणारे मानधन कमी

- Advertisement -

केंद्रीय गृह मंत्रालयाचा खुलासा
२०३०पर्यंत सैन्याचे सरासरी वय ३२ ते २४ वर्षांचे होईल.
भारतीय सशस्त्र दले सरासरी ४-५ वर्षे तरुण होतील.
लष्करात नवे चैतन्य येईल. सशस्त्र दले अधिक तंदुरूस्त आणि तंत्रस्नेही होतील.
पेन्शन आणि पगारावरील मोठा खर्च वाचेल.
लष्कराला चांगली शस्त्रे आणि तंत्रज्ञानावर खर्च करता येईल.
समाजाला लष्करातून आलेले शिस्तप्रिय नागरिक मिळतील.
लष्करातून बाहेर पडणार्‍या तरुणाच्या हाती १२ लाख रुपये असतील. त्यातून तो नवा व्यवसाय करू शकेल.

मानकांशी तडजोड नाही
युवावर्गाच्या अधिक समावेशामुळे लष्करात नवे चैतन्य निर्माण होईल आणि सशस्त्र दले अधिक तंत्रस्नेही होऊन परिवर्तन घडेल, जी काळाची गरज आहे. भरतीमध्ये किमान शारीरिक, वैद्यकीय आणि व्यावसायिक निकष सुनिश्चित करण्यासाठी सशस्त्र दल लागू असलेल्या मानकांशी कोणतीही तडजोड करणार नाही. या योजनेच्या अंमलबजावणीमुळे भारतीय सशस्त्र दले सरासरी ४-५ वर्ष तरुण होतील, असा अंदाज आहे. देशाला, समाजाला आणि देशातील युवा वर्गाला अल्प लष्करी सेवेचा मोठा लाभ होईल.
-अरविंद वालिया, चीफ ऑफ स्टाफ लेफ्टनंट जनरल, दक्षिण कमांड मुख्यालय

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -