घरक्रीडासोळा वर्षाखालील क्रिकेट संघ निवड प्रक्रिया वादात

सोळा वर्षाखालील क्रिकेट संघ निवड प्रक्रिया वादात

Subscribe

वशिलेबाजी आणि लॉबिंगचा आरोप

गेल्यावर्षी सोळा वर्षाखालील क्रिकेटपटूंच्या संघ निवडीचं धुमशान झाल्यानंतर निवड समितीतील काहींना घरचा रस्ता धरावा लागला मात्र त्यानंतरही निवड समिती आपले जुने अवगुण सोडायला तयार नाही. पुन्हा एकदा अशाच पद्धतीने वशिलेबाजी आणि काही माजी खेळाडूंकडून आपल्या मुलांसाठी केलेल्या लॉबिंग मुळे सोळा वर्षाखालील संघ निवड प्रक्रिया पुन्हा वादात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मुंबईच्या सोळा वर्षाखालील संभाव्य खेळाडूंमधील सहा खेळाडू वेगवेगळ्या कारणांसाठी अपात्र ठरल्यानंतर त्यांच्या जागी नवीन सहा खेळाडूंची निवड करण्यासाठी शनिवारी वांद्रे येथील इनडोअर सेंटरमध्ये निवड चाचणी घेण्यात आली. यासाठी जवळपास साठ युवा क्रिकेटपटूंनी हजेरी लावली होती. मुंबईत मुसळधार पाऊस असतानाही संघनिवडीसाठी हजर राहिलेल्या गुणी युवा खेळाडूंच्या पदरी निराशा हाती लागण्याचं चित्र या खेपेस ही दिसत आहे. सोळा वर्षाखालील निवड समितीचे अध्यक्ष मंदार फडके आणि मयूर कद्रेकर या दोघांनी संघनिवडीची ही जबाबदारी पार पाडली.

- Advertisement -

तिसरे सदस्य पियुष सोनेजी अनुपस्थित होते.तर संजीव जाधव यांना अद्याप अधिकृत पत्र मिळालेले नाही. मात्र गेल्या मोसमात संभाव्य खेळाडू मध्ये असलेल्या दोन क्रिकेटपटूंना यात थेट निवडण्यात आल्याचे सांगितले जात आहे.मात्र प्रत्यक्षात हे दोन्ही खेळाडू गेल्या मोसमात संभाव्य यादी मध्ये नसल्याची माहिती विश्वसनीयरीत्या समोर आली आहे. ह्या दोन खेळाडूंमधील एक मॅचफिक्सिंग मध्ये दोषी ठरलेल्या यष्टिरक्षकाचा भाचा आहे. तर दुसरा केंद्र सरकारच्या तेल कंपनीमध्ये नोकरीत असलेल्या एका माजी क्रिकेटपटूचा मुलगा आहे. हा मुंबईचा माजी खेळाडू आपल्या मुलासाठी विलक्षण दबावतंत्राचा वापर करत असल्याचं समिती सदस्यांच्या चौकडीत डोकावल्यावर समजत आहे.

तर दुसर्‍या खेळाडूने आपल्या जन्मतारखेच्या दाखल्याचाच घोळ घातला आहे. हे दाखला प्रकरण गुजरात मधील बडोद्यात शिजवण्यात आले. सध्या मुंबई क्रिकेट असोसिएशन मध्ये प्रशासनाच्या पातळीवर कमालीचा गोंधळ सुरू आहे. त्यामुळे युवा क्रिकेटपटूंमध्ये आधीच घबराट पसरली असताना आता सोळा वर्षाखालील या संघनिवडीच्या गोंधळामुळे खेळाडू, प्रशिक्षक आणि पालकांमध्ये संतापाचं वातावरण आहे. या संघनिवडीबद्दल भारताच्या काही माजी ज्येष्ठ क्रिकेटपटूंनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -